Monday, October 31, 2022

रस्ते अपघाताला रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

रस्ते अपघाताला रोखण्यासाठी कठोर

कायदेशीर कारवाईची आवश्यकता

-         जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

§  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघात स्थळांचा आढावा

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  नांदेड जिल्ह्यातून जात असलेल्या महामार्ग निर्मितीच्या कामामुळे वाहतूकीत निर्माण झालेले अडथळे, वाहन चालकाकडून न पाळले जाणारे नियम, अपघात प्रवण स्थळांबाबत  अपुरी असलेली सांकेतिक सुविधा आदी कारणाने अपघाताचे प्रमाण गंभीर होत चालले आहेत. याला आळा घालण्याच्या उद्देशाने आहे त्या स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, वाहतुक पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाने परस्पर समन्वयातून आप-आपल्या जबाबदाऱ्या व कायदेशीर बाबीचे कठोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.  


 

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत तोंडले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर,  राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 

वाहन चालविताना फोनवर बोलणे कायद्याने गुन्हा आहे. यात होणाऱ्या अपघातात जीवीत हानीचे प्रमाणही  वाढत आहे. वाहन चालकांना यांची माहिती असूनही जर ते फोनवर बोलत वाहने चालवित असतील तर अशा चालकांविरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी वाहतूक पोलीसांना दिले. यासाठी 250 ए कलमानुसार दंडही संबंधिताना लावला पाहिजे. रस्त्यात होणाऱ्या अपघाताला जखमीना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा दुताची संख्या वाढावी व लोकांच्या मनात याबाबत जर काही गैरसमजुती असतील तर त्या पोलीस व आरोग्य विभागानी दूर केल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


 

नांदेड मधील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षात घेता शाळा, महाविद्यालयामध्ये रस्ते सुरक्षिततेवर भर द्यावा लागेल. या जागृतीतून रस्त्यावर जबाबदार वाहतूक होवून अपघाताचे प्रमाण कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत चाकूर ते लोहा, लोहा ते वारंगा, वारंगा ते महागाव, अर्धापूर ते हिमायतनगर व जिल्हा अंतर्गत मार्गावरील ब्लाक स्पॉट अर्थात अती धोक्याच्या अपघात स्थळांची माहिती घेवून त्याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

0000

 

 

 

रदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एकता दौडचा शुभारंभ

 

सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी

 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एकता दौडचा शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम घेण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकता रॅलीचा शुभारंभ खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.


 

यावेळी महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी,  अप्पर पोलीस  अधिक्षक निलेश मोरे, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिका रेखा काळम-पाटील, प्रविण साले आदींची उपस्थिती होती.

 



जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु झालेली रॅली जुना मोंढयातील टॉवर येथील सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या  पुतळयापर्यत आयोजित करण्यात आली होती.  रॅलीच्या निमित्ताने महात्मा गांधी यांच्या पुतळयास आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितांना भ्रष्टाचार निर्मुलन व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवन कार्याची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. याचबरोबर  सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीचे अवलोकन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रलोभ कुलकर्णी यांनी मानले.


0000

 

 

 

जिल्ह्यातील 2427 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा 4 लाख 15 हजार 636 पशुधनाचे लसीकरण

 

जिल्ह्यातील 2427 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 15 हजार 636 पशुधनाचे लसीकरण

 नांदेड (जिमाका) दि. 31 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 872 बाधित गावात 2 हजार 427 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.

आतापर्यत 110 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 1 हजार 471 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 846 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 15 हजार 636 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

 

मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेसाठी संपर्क करण्याचे आवाहन

 

मागासवर्गीय विकास महामंडळाच्या

योजनेसाठी संपर्क करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 31 :-   राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीयाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे बाबतची योजना राबविण्यात येत आहे.

 

इतर मागास वर्गीय प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या दूरध्वनी  02462-220865 क्रमांकावर किंवा अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे.

 

अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्षे असावे. तो इमाव प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे कौटुबिंक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागासाठी 8 लक्ष रुपयापर्यंत असावी. अर्जदार इयता 12 वी मध्ये 60 टक्के गुणांसह उतीर्ण असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणांसह उतीर्ण असावा. पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उतीर्ण असावा. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, अर्जदार कोणत्याही वित्तिय संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा. बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरित केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000 

           

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...