Tuesday, April 7, 2020


किराणा, औषध विक्रीची दुकाने
सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु ठेवा  
-         सहाय्यक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे
            नांदेड, दि. 7 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांनी गुरुवार 2 एप्रिल 2020 रोजी प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेनुसार किराणा दुकाने व औषधी दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत चालु ठेवण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच आवश्यकतेनुसार सदर दुकाने 24 तास सुरु ठेवावीत, असे आवाहन नांदेड अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे  यांनी केले आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. अन्न व औषध प्रशासन नांदेड या विभागाच्यावतीने सुध्दा विविध उपाय योजना राबविल्या जात असून त्याचाच भाग म्हणुन अन्न आस्थापना व औषध विक्री दुकाने यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत.
तपासणीत औषधीसाठा, मास्क व सॅनिटायझर्स याबाबत पडताळणी करण्यात येत आहे. तसेच किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक पुरवठा ग्राहकांना व्हावा याबाबत प्रशासनाकडून तपासण्या करण्यात येत आहेत. आजपर्यंत प्रशासनाने औषध विक्री दुकाने व अन्न आस्थापना यांच्या एकुण  339  तपासण्या केल्या आहेत.
तसेच विविध ठिकाणी अन्न आस्थापना व औषध विक्रेते यांच्या बैठका घेऊन जीवनावश्यक वस्तुंचा व औषधे, मास्क, सॅनिटायझर्स यांचा काळा बाजार करु नये व शासनाने निधारीत केलेल्या किंमतीत वस्तूंची विक्री करावी याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती नांदेड अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त यांनी दिली आहे.
000000


किराणा, औषध विक्रीची दुकाने
सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु ठेवा  
-         सहाय्यक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे
            नांदेड, दि. 7 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांनी गुरुवार 2 एप्रिल 2020 रोजी प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेनुसार किराणा दुकाने व औषधी दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत चालु ठेवण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच आवश्यकतेनुसार सदर दुकाने 24 तास सुरु ठेवावीत, असे आवाहन नांदेड अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे  यांनी केले आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. अन्न व औषध प्रशासन नांदेड या विभागाच्यावतीने सुध्दा विविध उपाय योजना राबविल्या जात असून त्याचाच भाग म्हणुन अन्न आस्थापना व औषध विक्री दुकाने यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत.
तपासणीत औषधीसाठा, मास्क व सॅनिटायझर्स याबाबत पडताळणी करण्यात येत आहे. तसेच किराणा दुकानातून जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक पुरवठा ग्राहकांना व्हावा याबाबत प्रशासनाकडून तपासण्या करण्यात येत आहेत. आजपर्यंत प्रशासनाने औषध विक्री दुकाने व अन्न आस्थापना यांच्या एकुण  339  तपासण्या केल्या आहेत.
तसेच विविध ठिकाणी अन्न आस्थापना व औषध विक्रेते यांच्या बैठका घेऊन जीवनावश्यक वस्तुंचा व औषधे, मास्क, सॅनिटायझर्स यांचा काळा बाजार करु नये व शासनाने निधारीत केलेल्या किंमतीत वस्तूंची विक्री करावी याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती नांदेड अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त यांनी दिली आहे.
000000

सुधारीत वृत्त-


स्वारातीम विद्यापीठामधील ‘कोरोना प्रयोगशाळा’ नमुने तपासणीसाठी तयार
महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ होण्याचा बहुमान
एकाचवेळी दोन तासात ३८४ नमुने तपासणी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रामध्ये ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ तयार झाली आहे. येणाऱ्या दोन दिवसामध्ये आवश्यक त्या मान्यता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) प्राप्त होणार आहेत. त्यानंतर कोरोना संसर्गजन्य द्रवाचे नमुने तपासणी सुरु करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये एकाचवेळी दोन तासात ३८४ नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची प्रयोगशाळा निर्मिती करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिले ठरणार आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या समन्वयाने ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या इंक्य्युबेशन केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली सुसज्य प्रयोगशाळा असल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्याशी चर्चा करून ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ सुरु करण्याकरिता केंद्र सरकारच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) सादर केला होता. पुढील दोन दिवसात या बाबतची मान्यता मिळणार आहे.

विद्यापीठाच्या इंक्य्युबेशन केंद्रासाठी यापूर्वीच रुसा कडून रु.५ कोटी एवढा निधी मिळाला होता. त्यामुळे अत्याधुनिक अशा उपकरणाची उपलब्धता आहे. याशिवाय प्रयोगशाळेसाठी अजून आवश्यक असलेले उपकरणे व सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु.५२ लक्ष मंजूर केले आहेत. प्रयोगशाळेसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणा रियल टाईम पीसीआर उपलब्ध आहे. त्याद्वारे एकाचवेळी दोन तासात ३८४ कोरोना संसर्गाचे स्वॅबचे नमुने तपासता येतात. प्रयोगशाळेतील नमुने परीक्षणाचे काम इंक्य्युबेशन केंद्राचे समन्वयक डॉ.जी.बी.झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. इत्तरही लागणारे उपकरणे विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील वापरण्यात येणार आहेत. यासाठी लागणारे कुशल व अनुभवी मनुष्यबळ इंक्य्युबेशन केंद्रामध्ये काम करीत असलेल्या ‘स्टार्ट अप’मधील व्यक्तींची निवड केल्या जाणार आहे.  शिवाय बाहेरील प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येणार आहे.

कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या प्रयोगशाळेचा १०० मी अंतरापर्यंत कुणीही येणार नाही यासाठीची पूर्ण उपाययोजना करण्यात येणार आहे. इथे फक्त पूर्ण सुरक्षित कपड्यामध्ये प्रशिक्षित कर्मचार्यांनाच प्रवेश दिल्या जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे मराठवाडयातील आणि आजूबाजूच्या राज्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. कोरोना संशयितांच्या घशातील द्रवाची (स्वॅब) तपासणी लवकरात लवकर होईल. आणि कोरोणाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर तात्काळ औषोधोपचार करता येणार आहे.

या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, रुसा हर्बोमेडिसिन सेंटरचे समन्वयक डॉ.शैलेश वाढेर, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, डॉ.जी.बी.झोरे हे दिवसरात्र विशेष परिश्रम घेत आहेत. डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी लाभत आहे. कार्यकारी अभियंता अरुण पाटील, उपअभियंता अरुण धाकडे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी परिश्रम घेत आहेत.

चौकट : उच्च व तंत्रशिक्षण मंत्राकडून विद्यापीठाचे कौतुक :- सोमवार, दि.०६ एप्रिल रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. यामध्ये कोरोना प्रयोगशाळा उभारणी केल्याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आणि कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांचे विशेष कौतुक केले. आणि इत्तरही विद्यापीठांनी याबाबतीत पुढाकार घेण्याचे आवाहन केले.


नांदेडकरांच्या देणाऱ्या हातांचे
40 लाख 81 हजार 194 रुपयांचे मुख्यमंत्री सहायता निधीस योगदान ;
आणि पंतप्रधान सहाय्यता निधीस 53 हजार 551 रुपयांची मदत ;
एकूण निधी 41 लाख 34 हजार 745 रुपयांचे योगदान

           
नांदेड, दि. 7 :- देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाराचे हातही घ्यावे.....! कवि विंदा करंदीकरांच्या या ओळी नांदेडकरांनी शब्दशः सार्थ ठरवल्या आहेत. नांदेडकरांनी कोरोनाच्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  40 लाख 81 हजार 194 रुपयाची मदत नांदेडकरांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 53 हजार 551 रुपये एवढी मदत दिली आहे. असे एकूण 41 लाख 34 हजार  745 रुपयांचे योगदान नांदेडकरांनी दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली आहे. 
मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदतनिधी देणाऱ्या व्यक्ती व संस्था याप्रमाणे - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका 8 लाख 16 हजार 666 रुपये, रामदास होटकर  33 हजार 877 रुपये, ओमकार कन्स्ट्रक्शन एक लाख 11 हजार रुपये, अध्यक्ष व सचिव  सुखी सदस्य निधी गट, वसंतनगर नांदेड एक लाख रुपये, व्यंकटेश काब्दे माजी खासदार दहा हजार रुपये, सविता औसेकर जालना पाच हजार रुपये, आदिती काब्दे  पाच हजार रुपये, अजित व्यंकटेश काब्दे पाच हजार रुपये, सुरेश काब्दे ठाणे पाच हजार रुपये तसेच सुनील काब्दे, मंगला काब्दे, भानू देव काब्दे नांदेड या तिघांनी प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपये, नंदकिशोर उपरे, पाच हजार रुपये, राजेंद्र भागवत, पुसद, जिल्हा यवतमाळ पाच हजार रुपये, डॉ. अनंत भोगावकर, शिवाजीनगर पाच हजार रुपये तसेच डॉ. पुष्पा कोकीळ, शिवाजीनगर पाच हजार रुपये, सविता कलेटवाड, आंबेकरनगर पाच हजार रुपये, मारुती देगलुरकर  पाच हजार रुपये, आंबेकर नगरचे डॉ. गवई प्राचार्य, विज्ञान महाविद्यालय स्नेहनगर पाच हजार रुपये, डॉ. बालाजी कोंबाळकर पाच हजार रुपये, पीपल्स कॉलेज  तसेच लक्ष्मण शिंदे नागरिक कृती समिती सात हजार रुपये, ए. आर. इनामदार ,पीपल्स महाविद्यालय पाच हजार रुपये  राजेंद्र शुक्ला, सिद्धी कॉलनी पाच हजार रुपये, डॉ.एम. पी.शिंदे, सह्याद्रीनगर, कॅनाल रोड 21 हजार 100 रुपये, बालाजी टिमकीकर दोन हजार रुपये, माणिक नगर तरोडा बुद्रुक,आणि अशोक सिद्धेवाड पाच हजार रुपये, इंद्रप्रस्थ नगर, गुरुदेव पुरुष बचतगट जवळगाव तालुका हिमायतनगर दहा हजार रुपये.  अध्यक्ष व सचिव गुरुदेव पुरुष बचतगट जवळगाव तालुका हिमायतनगर 23 हजार 551 रुपये सत्यगणपती देवस्थान, ता.अर्धापुर  नांदेड द्वारा धर्मादाय उपायुक्त दोन लाख 25 हजार, अध्यक्ष कै. रामगोपाल को.इंडस्ट्री ज लिमिटेड नांदेड यांनी एक लाख,नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी एक लाख अशी  नांदेड जिल्ह्यातून आजतागायत मुख्यमंत्री सहायता निधी दिले आहेत  अशी एकूण  40 लाख 81 हजार 194 रुपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा झाली आहे.
पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत देणाऱ्यांची नावे- विवेक मोगडपल्ले, कैलास नगर ,नांदेड 51 हजार रुपये, अध्यक्ष व सचिव श्री गुरुदेव पुरुष बचत गट जवळगाव तालुका हिमायतनगर  दोन हजार 551 रुपये सहायता  निधीस दिले आहेत.  दोन्हीही सहायता निधीची रक्कम एकूण  41  लाख 34 हजार 745 रुपये जमा करण्यात आले आहेत. 
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ज्यांना आपले योगदान द्यावयाची इच्छा असेल अशा उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. या देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मदतीसाठी आवश्यक खाते क्रमांक व बॅंकेची माहिती
Chief Minister’s Relief Fund-COVID 19, Savings Bank Account number 39239591720, State Bank of India,Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023,Branch Code 00300, IFSC CODE- SBIN0000300 . 

मराठीत-
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720,स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023,शाखा कोड 00300,आयएफएससी कोड SBIN0000300
*********



देणाऱ्यांचे हात हजार.... लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनच्यावतीने
तीन लाख तीस हजार रुपयांच्या
जीवनावश्यक वस्तूंच्या सहाशे किटचे गरजू कुटुंबाना वाटप  
नांदेड दि-०७ - लॉक डाऊन मुळे हातावरचे पोट असणाऱ्यांच्या वसाहतींमध्ये प्रशासनाच्या सहकार्याने गरजूंच्या वस्तीत घरापर्यंत  कामगार,मजुरांच्या पालावर जाऊन लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनच्यावतीने जीवनावश्यक असलेल्या ५ किलो गहू पीठ, ५ किलो तांदूळ, १ किलो तूर डाळ, १ किलो मीठ, १ किलो तेल पाकीट, मिर्ची पावडर अशा वस्तू असलेल्या तीन लाख तीस हजार रुपये किमतीच्या ६०० किटचे वाटप लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनच्या सदस्यांच्या योगदानातून केले.
परप्रांतीय, गरजू तसेच पालावर राहणाऱ्या कामगार, रेशन कार्ड नसलेले व्यक्ती यांना शहरातील श्रावस्तीनगर,जवाहर नगर,आदी भागात तसेच ग्रामीण भागातील वानेगाव स्टेशन,धनेगाव,वाजेगाव आदी भागातील ६०० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊन चे अध्यक्ष योगेशकुमार जैस्वाल, सचिव अमरसिंग चौहाण,कोषाध्यक्ष नितीन लाठकर, प्रकल्प संचालक प्रेमकुमार फेरवाणी यांच्या संकल्पनेतून ६०० कुटुंबांचा किमान आठवडाभर तरी प्रश्न मिटावा यासाठी नियोजन करून नांदेड चे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. 
सदरील वाटप करताना लॉयन्स क्लबच्या सदस्यांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्स ठेवून वाटप करण्यात आले.लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनच्या या सामाजिक भान जपत मदत करण्याच्या या कार्यात लॉयन्स सदस्यांसह शहरातील मान्यवर दात्यांनीही खालील प्रमाणे प्रति किटचे योगदान दिले यामध्ये  डी .पी. सावंत-५०, योगेश जायसवाल-५०, नितीन लाठकर-२१, जयेश ठक्कर-१०, प्रवीण अग्रवाल-२०, डॉ देवसरकर-५०, राजेंद्र हुरणे-२५, प्रदीप चाडावार-२०, सचीन मानधने-१५, डी .डी महाजन-१०, नितीन ,माहेशवरी -१०, सतीश सामते-१०, शिरीष कासलीवाल-१०, आनंदी देशमुख-१०, कमल कोठारी-१०, सतीश शिरुरकर-१०, रवी शामराज-१०, सुधाकर चौधरी-१०,  रवी कडगे-१०, संदीप-१०,   अँड निरणे-१०,,ज्ञानेशवर थेटे-१०, गंगा प्रसाद तोषणीवाल-१०,   गणेश चांडक-१०,, जयप्रकाश काबरा-१०, भगवान मानधने-१०, कौस्तुभ फरांदे-१०, मुकेश अग्रवाल-१०,अशोक पाटणी-५,राजेश बियाणी-५,धनंजय डोईफोडे-५, अशोक कासलीवाल-५, नरेश व्होरा-५, मधुसुदन गुप्ता-५, इंदर सेठ खियाणी-५ , अक्षय बंग-५, डॉ दागडीया-५, सोनु कलत्री-५,लता मीरजकर-५,गीरीश ठक्कर-५,सुभाष कासलीवाल-५,सरताज सीग-५, विजय घई-५,प्रवीण दुधमाडे-५, सुबोध-५, साई रिसणगावकर-५, संजय पाटणी-५, शरद मोगडपलली-४, विश्व जीत राठोड-५, डॉ यशवंत चव्हाण-५. लौकडाउनच्या या काळात गेल्या सहा दिवसांपासून लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे सदस्य या कार्यात अविरत कार्य करीत आहेत. या सर्व मदत किटसाठीचे साहीत्य बन्सल कीराणा नांदेड यांनी रास्त भावात पुरविले ते कवठा  परिसरात संत निरंकारी भवन येथे एकत्र करूण  वाटपासाठी कीट तयार करुण देण्यात आल्या.
000000



यशकथा :


     
संवाद हृदयाशी आणि जीवलगाचं आतिथ्य

लातूर आणि उदगीर इथं कृषी महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी आलेले आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील विद्यार्थी. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेला लॉक डाऊन पाहता, आपल्या घराकडे निघाले. मूळचे कृषि पदवीधर असलेले हे विद्यार्थी म्हणजे देशाचे भावी कृषि शास्त्रज्ञच किंवा प्रगतिशील शेतकरीच म्हणा ना. लॉक डाऊन मुळे सर्वप्रवासी वाहने बंद झालेली. घरी जायची ओढ, घरच्यांचा जीव काळजीत. त्यामुळे हे बहाद्दर पायीच आपल्या गावाकडे निघाले. त्यांना तब्बल जवळपास 600 ते 700 किमी अंतर कापायचे होते. मजल दरमजल करीत ही मुलं नांदेड जिल्ह्यात पोहोचली 30 तारखेला. तोवर जिल्हाबंदी लागू झाली होती. नांदेड जिल्हा प्रशासनाने त्यांना अडवलं. ताब्यात घेतलं. ह्या मुलांचा घरी जाण्याचा आटोकाट प्रयत्न, पण प्रशासनाने समजावून सांगितलं, विज्ञानाची पुरेशी जण असणारे हे विद्यार्थी परिस्थितीच गांभीर्य ओळखून तिथंच थांबली.
आता त्यांची सगळी जबाबदारी ही नांदेड प्रशासनाची होती. हे सगळे मिळून 29 विद्यार्थी. जिल्हाधिकारी डॉ. वीपीन इटनकर यांनी आदेश दिले आणि या विद्यार्थ्यांची व्यवस्था देगलूरच्या शासकीय औद्योगिक संस्थेच्या इमारतीत केली. तिथं या विद्यार्थ्यांची निवास, भोजन आदी सर्वच बाबींची सोय करण्यात आली. त्यांची व्यवस्था पाहणारे अधिकारी कर्मचारी आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना काय हवं नको ते पहात आहेत. जणू त्यांचे मोठे भाऊच.
आतातर त्यांचे या आश्रय स्थानातील दिनचर्या एखाद्या शिबिराप्रमाणे झाली आहे. भल्या सकाळी उठून आन्हिक उरकून योगाभ्यास शिकवला जातोय. नंतर स्नान, चहा, नाश्ता, दोन वेळा पोटभर जेवण. शिबिरात वेळ घालवण्यासाठी मनोरंजनासाठी टीव्ही, मोबाईल वापरता यावा यासाठी संचार व्यवस्था.
आधी सगळ्यांची वैद्यकीय तपासणी झालीय. त्यांच्या प्रत्येकाच्या घरी त्यांनाच निरोप द्यायला लावून ते इथं सुखरूप असल्याचं कळवण्यात आलं. त्यामुळे घरच्यांचा जीव भांड्यात पडलाय.
इथं घेतली जात असलेली काळजी, इथल्या सर्व व्यवस्थांमुळे ही मुलं स्वतःला सुरक्षित समजत आहेत. भाषेची अडचण ही आता अडथळा राहिलेली नाही. जिथं शब्द संपतात तिथं माणुसकीचा संवाद सुरु होतो. हृदयाशी संवाद आणि जीवलगाच आतिथ्य असलं की हे कठीण दिवसही सुखकर होतात, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीय. आपत्तीत आपल्या कुटुंबाकडे पायपीट करायला निघालेल्या या विद्यार्थ्यांना इथल्या वास्तव्यात त्यांची काळजी घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या रुपाने नवे आप्तेष्ट भेटलेत हेच खरं.....
-          मीरा ढास , 
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...