Wednesday, June 26, 2019

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 26 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 जून 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 जून 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 जुलै 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000



अर्धापूर शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु



नांदेड, दि. 26 :-  अर्धापूर येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेचे अर्ज वाटप सुरु असून अर्धापूर तालुक्यातील गरीब, होतकरु विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या वसतिगृहात सन 2019-2020 या वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे. वसतिगृहात इयत्ता आठवी, 11 वी व पदवी प्रथम वर्षे या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरु आहे. येथील प्रवेशित विद्यार्थ्यांना नियमानुसार मोफत निवास, भोजन व्यवस्था, इतर भत्ता देण्यात येतो. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सरकारी दवाखाण्याजवळ अर्धापूर येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000

होमगार्डच्या 183 पुरुष, 179 महिला पदांसाठी मोफत नाव नोंदणी 15 जुलै पासून होणार



नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट व भोकर पथकातील 183 पुरुष व 179 महिला होमगार्ड पदांच्या जागांसाठी नाव नोंदणी 15 जुलै ते 17 जुलै 2019 या कालावधीत पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे मोफत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले आहे.
नांदेड पथकात- 100 पुरुष व 55 महिला, बिलोली- 17 पुरुष व 27 महिला, हदगाव- 16  पुरुष 26 महिला, मुखेड- 4 पुरुष 14 महिला, देगलूर- 8 पुरुष 7 महिला, कंधार- 23 पुरुष 24 महिला, किनवट- 5 पुरुष, 14 महिला, भोकर- 10 पुरुष 12 महिला या होमगार्डच्या रिक्त पदांसाठी ही नाव नोंदणी करण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी वयोमर्यादा 20 ते 50 वर्षे असून किमान दहावी उत्तीर्ण असावा. पुरुष उमेदवारासांठी उंची 162 सें.मी किमान, छाती न फुगवता 76 सेंमी, आणि फुगवून 81 सेमी असवी. 1 हजार 600 मीटर धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणी अनिवार्य असून उमेदवार सुशिक्षित बेरोजगार नसावा.
महिला उमेदवारांसाठी उंची किमान 150 सेमी असावी. आठशे मीटर धावणे व गोळाफेक ही मैदानी चाचणी घेण्यात येईल. उमेदवारास या चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रकारात कमीतकमी 40 टक्के गुण आवश्यक राहतील. या व्यतीरिक्त आटीआय प्रमाणपत्र, खेळाचे कमीतकमी जिल्हास्तरीय प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, एनसीसीबी किंवा सी प्रमाणपत्र, नागरीसंरक्षण सेवेत असल्याचे प्रमाणपत्र, जडवाहन चालविण्याचा परवाना या प्रमाणपत्रधारकांना तांत्रीक अर्हता गुण दिल्या जातील.
पोलीस मुख्यालय कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे सोमवार 15 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वाजेपासून नाव नोंदणी करण्यात येईल. सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत कागदपत्रांची तपासणी व शारिरीक चाचणी घेण्यात येईल. नाव नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असल्याचे मुळ प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे तीन कलर फोटो, रहिवाशी असल्याचा सक्षम पुरावा, इतर शैक्षणिक कागदपत्रे झेरॉक्स प्रतीसह सोबत आणावीत. शारिरीक चाचणीत पात्र ठरलेल्या पुरुष / महिला उमेदवारांची मैदानी चाचणी मंगळवार 16 जुलै 2019 रोजी सकाळी 5 वा. शहीद भगतसिंघ चौक असर्जन नाका विष्णुपुरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल.
होमगार्ड ही स्वयंसेवी संघटना आहे. होमगार्ड स्वयंसेवकांना कुठलाही नियमीत पगार किंवा मानधन दिल्या जात नाही. प्रशिक्षीत होमगार्डना कर्तव्यावर नेमण्यात येते तेव्हा त्यांना 570 रुपये कर्तव्य व 100 रुपये उपहार भत्ता तसेच कवयातीला उपस्थित राहिल्यास 90 रुपये भत्ता दिला जातो. नाव नोंदणीसाठी आलेल्या कोणत्याही उमेदवाराला कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. शारिरीक किंवा मैदानी चाचणीच्यावेळी कोणताही अपघात घडल्यास किंवा शारिरीक दुखापत घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही संबंधीत उमेदवारांची राहील.
काही तांत्रिक अथवा अपरिहार्य कारणास्तव नाव नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक यांना राहील. नाव नोंदणीसाठी पैशाची मागणी केल्यास लाचलूचपत प्रतिबंधक शाखा नांदेड यांचेकडे 02462-253312 या दुरध्वनीवर किंवा अपर पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड 02462-232961 किंवा जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय नांदेड 02462-254261 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा‍, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले आहे.
000000


राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
समता दिंडीस उत्स्फुर्त सहभाग

नांदेड, दि. 26 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या 145 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने " समता दिंडी "चे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला व राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
समाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकणारा चित्ररथ आणि सामाजिक न्याय बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या घोषणांमुळे दिंडी लक्षवेधी ठरली. या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते आय.टी.आय. नांदेड ते शासकीय विश्रामगृह समोरील मार्ग ते पावडेवाडी नाका ते राजर्षी शाहू महाराज पुतळा येथे समता दिंडीचा समारोप राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आला.  
यावेळी समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, समाज कल्याण अधिकारी अशोक गोडबोले, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, समता दूतचे प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदिंची यावेळी उपस्थिती होती.
*****


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...