वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
मतदारांनी 30 सप्टेंबरपूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
नांदेड(जिमाका), दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आज दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रारूप मतदार यादी सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच संबंधित मतदान केंद्रांवर नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रारूप मतदार यादीसोबत अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदार यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत https://nanded.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दावे व हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची तारीख 31 ऑगस्ट 2026 असून, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 असा आहे. दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदारांनी यादीतील नाव तपासावे
जिल्ह्यातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. मतदारांना आपले नाव भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर किंवा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://voters.eci.gov.in किंवा https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तपासता येईल. तसेच संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), तहसील कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातही मतदार यादीची पाहणी करता येईल.
नवमतदारांसाठी विशेष संधी
ज्या नागरिकांचे वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण होत आहे, ते नवमतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. पात्र नागरिकांनी नमुना 6 चा अर्ज घोषणापत्रासह व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
मतदारांसाठी विविध नमुना अर्जांची तरतूद करण्यात आली आहे. नमुना 6 नवीन मतदार नोंदणीसाठी, नमुना 6A परदेशस्थित भारतीय मतदारांच्या नोंदणीसाठी, नमुना 7 मतदार यादीतील नावाला हरकत घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी, तर नमुना 8 नाव, वय, पत्ता आदी तपशीलात दुरुस्ती, अपंगत्वाचे चिन्हांकन किंवा मतदाराचे नाव स्थलांतरित करण्यासाठी वापरता येईल.
नोटीस प्राप्त मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहावे
मतदार यादीतील नाव, वय, इतर तपशीलातील विसंगती किंवा अनमॅपिंगच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीस उपस्थित राहताना जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे आवश्यक कागदपत्र सादर करावे. 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःसोबत वडील किंवा आई यांची जन्मतारीख आणि जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 2 डिसेंबर 2004 नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःसोबत वडील व आई यांची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास मतदाराच्या जन्माच्या वेळी संबंधित व्यक्तीचा वैध पासपोर्ट व व्हिसाची प्रत सादर करणे आवश्यक आहे. भारताबाहेर जन्म झाल्यास विदेशस्थित भारतीय दूतावास किंवा मिशनने जारी केलेल्या जन्म नोंदणीच्या पुराव्याची प्रत, तर नोंदणीकरण अथवा नागरिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले असल्यास नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.
मान्य कागदपत्रांमध्ये विविध पुराव्यांचा समावेश
जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी सूचक व सर्वसमावेशक नसलेल्या कागदपत्रांच्या यादीमध्ये केंद्र व राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकांना दिलेले ओळखपत्र अथवा निवृत्तीवेतन प्रदान आदेश, शासन किंवा स्थानिक प्राधिकरण, बँका, टपाल विभाग, एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांनी भारतात निर्गमित केलेले दिनांक 1 जुलै 1987 पूर्वीचे ओळखपत्र अथवा दस्तऐवज, सक्षम प्राधिकरणाचे जन्म प्रमाणपत्र, पारपत्र, मान्यताप्राप्त मंडळ अथवा विद्यापीठाचे मॅट्रिक्युलेशन/शैक्षणिक प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, इतर मागासवर्गीय/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अथवा इतर जात प्रमाणपत्र, लागू ठिकाणी राष्ट्रीय नागरिक नोंदवही, शासकीय अधिकाऱ्यांनी जतन केलेली कौटुंबिक नोंदवही तसेच शासनाकडून निर्गमित जमीन/घर वाटप प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे.
आधारबाबत भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. 23/2025-ERS/Vol. II दिनांक 9 सप्टेंबर 2025 (परिशिष्ट-II) अन्वये निर्गमित निर्देश लागू राहतील.
पात्र नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा
“लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः तरुण नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील व परिसरातील सर्व पात्र मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. नजरचुकीने एखादा पात्र मतदार वगळला गेला असल्यास नमुना 6 चा अर्ज घोषणापत्रासह व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. कोणतीही त्रुटी अथवा नाव वगळले असल्यास 30 सप्टेंबर 2026 पूर्वी संबंधित बीएलओ किंवा पोर्टलवर दावे व हरकती नोंदवाव्यात.”
मतदार यादीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.
****



