Wednesday, July 22, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करण्यात आली आहे.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शुभारंभ

·         ७ जिल्ह्यांतील  पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी जाहीर

-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

मुंबई, दि. २२ : राज्य शासनाने शेतकरी हितासाठी  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना  २०२६’ जाहीर केली आहे.  या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करताना राज्यातील सात जिल्ह्यांमधील कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करीत आहोत असे बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

 

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि  दिवंगत उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून   प्रातिनिधिक स्वरूपात  यादी जाहीर करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने   सुमारे ५६ लाख पात्र शेतकरी कुटुंबांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून, ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ  आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे.

 

ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नाही  तर शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या जोमाने शेती करण्यास सक्षम बनविण्यासाठी असल्याचे सांगत सहकार मंत्री पाटील म्हणाले,  सहकार विभाग सातत्याने यासाठी युद्धपातळीवर काम करीत  आहे. २ जून २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली होती. तसेच १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेच्या निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली.

 

योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता घटकाच्या अंमलबजावणी साठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खाजगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे.

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील सर्व कर्जखात्यांची माहिती सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची माहितीही पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीचे संगणकीय विश्लेषण करून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.  पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील ५३२ पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहितीही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील  यांनी यावेळी दिली.

 

 प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र विशिष्ट क्रमांक देण्यात येणार असून, आधार क्रमांक किंवा त्या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपले आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन करीत सहकार मंत्री म्हणाले, राज्यातील सुमारे ३२ हजार 'आपले सरकार सेवा केंद्रां' मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक वर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात लाभाची रक्कम डीबीटी द्वारे थेट जमा करण्यात येणार आहे.

 

राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया ३१ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यानंतर व्यापारी बँकांतील पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरणाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

 

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, या  योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे तसेच सहकार विभागाची संपूर्ण यंत्रणा सातत्याने आढावा घेऊन जिल्हास्तरावर आणि बँकांच्या स्तरावर नियोजन करत आहेत. अत्यल्प कालावधीत ही महत्त्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार विभाग समर्पित भावनेने कार्य करत आहे, अशा शब्दात  सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील यांनी विभागाचे अभिनंदन केले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

वृत्त क्रमांक 

'महाराजस्व समाधान' महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एकाच छताखाली शासकीय सेवांचा लाभ; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण

शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – आमदार भीमराव केराम

नांदेड दि.२२ जुलै : राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' अंतर्गत बुधवारी (दि. २२) सकाळी 11 वाजता किनवट येथील गोकुंदा रोडवरील एन. के. गार्डन येथे भव्य महाशिबिर उत्साहात पार पडले. 

महसूलसह विविध शासकीय विभागांनी एकाच छताखाली नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्याने शेकडो नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेतला, तर अनेकांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले.

महाशिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव रामजी केराम होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. बी. सरवनन, किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप, किनवटच्या नगराध्यक्ष सौ. सुजाता एंड्रलवार, किनवट पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. जयश्री वाघमारे, माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारीज्ञानेश्वर टाकरस, किनवटचे मुख्याधिकारी मुगाची काकडे, माहूरचे मुख्याधिकारी विवेकानंद कांदे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

महाशिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, महावितरण, भूमी अभिलेख, परिवहन, पशुसंवर्धन, सहकार आदी विभागांच्या माध्यमातून उत्पन्न, जात व निवासी दाखले, विविध प्रमाणपत्रे, अर्ज स्वीकारणे, तक्रार निवारण, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन अशा विविध सेवा देण्यात आल्या. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला, तर अनेक नागरिकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ सोडविल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार भीमराव केराम म्हणाले, "राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला कोणत्याही अडथळ्याशिवाय शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. "

"महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून एकाच छताखाली नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या महाशिबिराचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे," असे किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

महाशिबिरादरम्यान नागरिकांनी विविध शासकीय योजनांविषयी माहिती घेतली, आवश्यक कागदपत्रांसाठी अर्ज दाखल केले तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या समस्या मांडल्या. शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने महाशिबिरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी केली. आभार प्रदर्शन माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन उत्तम कानींदे यांनी केले.

०००००














वृत्त क्रमांक 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे ओम गार्डन कौठा येथे शिबिराचे आयोजन

नांदेड दि. 22 जुलै :- मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ओम गार्डन, कौठा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. 

विविध शासकीय विभागांनी एकाच ठिकाणी नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, मार्गदर्शन व विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून दिला. या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजना विभाग, पुरवठा विभाग (तहसील कार्यालय नांदेड), तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पंचायत समिती ग्रामविकास विभाग, सायबर सेल व भरोसा सेल (जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड), जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय, अनुलोम संस्था, अमृत विभाग, महावितरण विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग तसेच पीएम स्वनिधी योजना आदी विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

एकूण ३ हजार ४२९ नागरिकांनी विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन शासकीय योजनांची माहिती व सेवा घेतल्या. त्यात जिवंत सातबारा वाटप, महिला शेतकरी प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कर्जवाटप, महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटांना कर्जवाटप, लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्राधान्य गट लाभार्थींना शिधापत्रिका वाटप, बेबी किट वाटप, अमृत प्रशिक्षण योजना, भूमी अभिलेख विभागाची स्वामित्व योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना व सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला.

यावेळी पात्र ८६० लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यामध्ये उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान-५०, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)-६०, प्रमाणपत्र/आधार सेवा-१००, रेशन कार्ड-१००, पीएम स्वनिधी-२०, पंचायत समिती-१००, तालुका आरोग्य अधिकारी-३०, रमाई आवास-५०, अमृत विभाग-३०, सीडीपीओ (ग्रामीण)-२०, सीडीपीओ (शहर)-५०, तालुका कृषी अधिकारी-५०, महावितरण विभाग-५०, सहकार विभाग-५० तसेच परिवहन विभागामार्फत १०० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

शिबिरादरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा ३ हजार ४१६ नागरिकांनी लाभ घेतला. हा उपक्रम डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

याचबरोबर शिबिरामध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या तत्काळ सोडविणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे सहकार्य लाभले.

या  कार्यक्रमास बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ. हेमंत पाटील, महापौर कविता मुळे, आमदार आनंदराव बोंढारकर, उपमहापौर दीपकसिंग रावत, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नगरसेवक काकडे, शीतल खंडेल, जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख) सीमा देशमुख, मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी महेश वडदकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बळवंत मस्के, धम्मदीप ढवळे, माविमचे राहुल शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे, सीडीपीओ शिवगंगा पवार, कैलास तिडके, पीएम स्वनिधी योजनेचे किशन कदम, महावितरणचे सुशीलकुमार वाघमारे, आवास योजनेचे प्रकाश कांबळे, सामाजिक वनीकरण विभागाचे लाखेकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, सायबर पोलीस सेलचे पोलीस निरीक्षक विलास सप्रे, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, भरोसा सेलच्या रूपाली कानगुले, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कंकावार, अनुलोम सामाजिक संस्थेच्या पूजा गोडघासे, आपले सरकार सेवा केंद्राचे विजय जोंधळे तसेच नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार प्रमुख दिग्विजय नरंगले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासह नांदेड दक्षिण मतदार संघातील हजारो नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट व प्रभावी निवेदन मुरलीधर हंबर्डे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, पुरवठा अधिकारी रवींद्र राठोड, मंडळ अधिकारी सोपान गुंडाळे, मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, मंडळ अधिकारी रूपाली वाठोरे, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमटे, मंडळ अधिकारी संतोष आस्कुलकर, मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन, मंडळ अधिकारी मधुकर फुलवळे, पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड, तसेच देविदास जाधव, शिवानंद स्वामी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, सर्व ग्रामसेवक व सर्व कृषी सहाय्यक, सर्व ग्राम महसूल सेवक  यांच्यासह नांदेड तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000




वृत्त क्रमांक   मतदारांनी गणना पत्र विहित मुदतीत बीएलओंकडे जमा करावे - डॉ. सचिन खल्लाळ ‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (SIR) अनुषंगाने राजकीय पक्ष...