Tuesday, May 19, 2026

वृत्त क्रमांक 

हवामान विभागाच्या सूचना जिल्ह्यात 20 मे रोजी येलो अलर्ट जारी

नांदेड, दि. 19 मे : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २० मे २०२६ या दिवशी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक २० मे २०२६ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट असण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

उष्मालाट असताना :

काय करावे :

तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृतविषयक आजारांमुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे. 

ओआरएस (ORS) म्हणजेच तोंडान घ्यावयाचे शरीरातले पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळाच पाणी घ्या. हलक्या रंगाचे, वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा.

घराबाहेर असाल तर डोके झाका. एखादे कापड वापरा, टोपी घाला किंवा छत्री वापरा. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीन वापरा.

अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्या. 

काय टाळावे: 

उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते ०३ मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. दारं खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील हे बघा. अल्कोहोल म्हणजे दारू, चहा, कॉफी, शीतपेये टाळा त्यातून शरीरातले पाणी कमी होते. उच्च प्रथिनयुक्त मिठाचं प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका. शिळंपाकं खाऊ नका. चारचाकी वाहन लावून ठेवताना त्यात लहान मुले किंवा प्राणी ठेऊ नका. चमकणारे दिवे किंवा बल्ब्ज वापरू नका, त्यातून अनावश्यक उष्णता निर्माण होते.

00000

वृत्त क्रमांक 

नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज

नांदेड, दि. 19 मे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, निवडणुकीची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ असून, अर्जांची छाननी २ जून रोजी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी २२ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या प्रतिनिधींमधून या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सध्या मतदारसंघात एकूण १७ कार्यरत स्थानिक प्राधिकारी संस्था असून, मतदारांची संख्या ४३२ इतकी आहे. अंतिम यादीपर्यंत या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या 8 राहणार असून, नांदेड जिल्ह्यातील सर्व उप विभागाच्या मुख्यालयी तहसिल कार्यालयात प्रत्येकी एक मतदान केंद्र राहणार आहे. 

यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांनी नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक, मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम २०२६ बाबत सविस्तर माहिती दिली. मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि पडताळणी प्रक्रियेबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व संबंधितांना केले. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता राजकीय पक्ष, स्थानिक संस्था आणि प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

00000







वृत्त  

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी

द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून 2026 रोजी होणार मतमोजणी
मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र विधान परिषदेतील 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान 75 टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. हे निकष पूर्ण न झाल्यामुळे या मतदारसंघांतील निवडणुका यापूर्वी घेता आल्या नव्हत्या. मात्र, आता या सर्व 16 मतदारसंघांमध्ये आवश्यक निकष पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आयोगाला दिल्यानंतर आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
या निवडणुकीसाठी सोमवार, 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, 1 जून 2026 असेल. मंगळवार, २ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून गुरवार, ४ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
या निवडणुकांसाठी मतदान गुरूवार, 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार, 22 जून रोजी करण्यात येईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरूवार, 25 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे त्यामध्ये प्रशांत परिचारक (सोलापूर), अरुणकाका जगताप (अहमदनगर), रवींद्र फाटक (ठाणे), चंदुभाई पटेल (जळगाव), मोहनराव कदम (सांगली-सातारा), अमरनाथ राजूरकर (नांदेड), दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ), अनिल भोसले (पुणे), डॉ. परिणय फुके (भंडारा-गोंदिया), अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), नरेंद्र दराडे (नाशिक), रामदास आंबटकर (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली), प्रवीण पोटे (अमरावती), सुरेश धस (उस्मानाबाद-लातूर-बीड), विप्लव बाजोरिया (परभणी-हिंगोली) आणि अंबादास दानवे (औरंगाबाद-जालना) यांचा समावेश आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000

वृत्त क्रमांक 

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन

नांदेड, दि. 19 मे : ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट यांच्या वतीने 20 मे 2026 रोजी एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी औषध व अन्न प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त (औषधे) अ.तु. राठोड (मो. 8369027068), अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शि.व. श्रीरामे (मो. 8080108818) तसेच लिपिक टंकलेखक श्रीमती अ.रा. पाटील (मो. 8446318983) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बंदच्या कालावधीत गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास अथवा अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांनी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असेही अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.
00000

वृत्त क्रमांक   हवामान विभागाच्या सूचना  जिल्ह्यात 20 मे रोजी येलो अलर्ट जारी नांदेड, दि. 19 मे : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांन...