Wednesday, December 9, 2020

 

14 कोरोना बाधितांची भर तर

30 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  बुधवार 9 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 14 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 30 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 आजच्या 954 अहवालापैकी 936 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 689 एवढी झाली असून यातील 19 हजार 606 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 334 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 13 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 554 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 7, किनवट कोविड रुग्णालय 1, माहूर तालुक्यांतर्गत 1, कंधार तालुक्यांतर्गत 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, मुखेड कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 30 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.76 टक्के आहे. 

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 2, कंधार तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, आंध्रप्रदेश 1 असे एकुण 5 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 3, मुखेड तालुक्यात 2, देगलूर 1, अर्धापूर 1, माहूर 1, बीड 1 असे एकुण 9 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 334 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 35, मुखेड कोविड रुग्णालय 23, भोकर कोविड केअर सेंटर 2, किनवट कोविड रुग्णालय 1,  हदगाव कोविड रुग्णालय 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 58, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 143, खाजगी रुग्णालय 24 आहेत.  

बुधवार 9 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 180, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 67 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 60 हजार 381

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 35 हजार 620

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 689

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 606

एकुण मृत्यू संख्या-554

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.76 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-520

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-334

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-13.  

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

000000

 

राष्ट्रीय लोकअदालतीत कोवीड-19 अनुषंगाने

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत कोवीड-19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी नागरिकांकरीता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

यात नागरीकांनी येतांना मास्क लावून येणे. सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. ज्या व्यक्तीची तडजोडी करीता आवश्यकता आहे. त्यांनीच न्यायालयात लोकन्यायालयाकरीता उपस्थित रहावे. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तापमापकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोविड-19 या संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्याकरिता शासनाने नेमुन दिलेल्या नियमांचे व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीराम आर. जगताप व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्यायधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे. 

न्यायालयात प्रलंबित असलेले दावे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली निघावेत यासाठी लोकअदालतीत व्हॉटसअप व्हिडिओ कॉलींग या सुविधेच्या वापरास राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी परवानगी दिलेली आहे. कोरोना काळात ज्यांना न्यायालयात येणे अशक्य असेल त्यांनी व्हॉटस अप सारख्या सोशल मिडियाचा वापर करुन तडजोड घडवून आणता येईल. त्याकरीता पक्षकाराची ओळख पटवून न्यायालयात तडजोड होऊ शकते. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता पक्षकारानी आपल्या वकीलांना फोन करुन यासुविधेचा लाभ पक्षकारांना घेता येईल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

अध्ययन अध्यापनात उच्च तंत्रज्ञानाचा

अधिकाधिक वापर शिक्षकांकडून व्हावा

-         प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- आधुनिक काळात अध्ययन आणि अध्यापनाच्या कार्यपद्धतीत अनेक बदल झाले आहेत. यात उच्च तंत्रज्ञानाची पडलेली भर व यामुळे शिक्षणाच्या कार्यपद्धतीत झालेली सुलभता दुर्लक्षून चालणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता शिक्षकाने काळानुरुप अध्ययन-अध्यापन प्रक्रीयेत तंत्रज्ञानाचा वापर करुन याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. सुनंदा गो. रोडगे यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एडच्या अंतिम संपर्क सत्राचा समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  हा कार्यक्रम ऑनलाईन झूम ॲपद्वारे घेण्यात आला.   

प्रास्ताविक बी.एड समन्वयक प्रा.डॉ. विठ्ठल घोनशेटवाड यांनी केले. स्वागतगीत जयश्री मुंडे यांनी केले तर मनोगत तेलंग तर सुत्रसंचलन मिनाक्षी अंबोरे यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. शैला सारंग, डॉ. वनिता रामटेके, डॉ. मंजुषा भटकर, डॉ. सरस्वती गिरी, डॉ. संजिवनी राठोड व सर्व बी.एड प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन स्मिता नादरे यांनी मांडले.

0000

 

विकेल ते पिकेल या मंत्रातच शेतकऱ्यांची प्रगती

-         जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर

स्मार्ट प्रकल्पाबाबत एक दिवशीय प्रयोगशाळा 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- निसर्गाच्या असमतोलाशी सतत संघर्ष करीत उभ्या असलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी स्वत: शेतीत थांबून लक्ष दिले तरच त्याला त्यातून सावरता येते. येथे ऑनलाइन काम करायचे ठरविले तर त्याच्या हाती काहीही लागणार नाही. त्याच्या जर हाती काही लागले नाही तर समाजाला अन्नाशिवाय जगता येणार नाही. शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या पारंपारिक पिकांना छेद देवून विकेल तेच पिकेल या मंत्राचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्‍हा नियोजन सभागृह येथे विकेल ते पिकेलअभियानातंर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाबाबत जिल्‍हास्‍तरीय एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी नांदेड जिल्ह्यातून आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. यात सोयाबिन पिकाच्या बियाण्यांपासून ते अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा वेळेवर पंचनामा व्हावा व त्यांना शक्य तेवढी शासकिय मदत कशी उपलब्ध करुन देता येईल इथपर्यंत त्यांनी स्वत: मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले. 

शासनाच्या कृषि क्षेत्रातील निगडीत असलेल्या योजनांची माहिती एकत्रितपणे शेतकऱ्यांना मिळावी व विकेल ते पिकेल या नव्या आत्मविश्वासातून शेतकऱ्यांच्या प्रगतीचे द्वारे खुली व्हावीत या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती एकाच व्यासपिठावरुन देता येत असल्या कारणाने मला याचा आनंद असून लवकरच बांधा-बांधावर सहभागी शेतकरी याचे खरे अर्थाने प्रात्याक्षिकरुपाच्या माध्यमातून आपआपले मॅडेल विकसित करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकरी म्हटले की एरवी महसूलच्या दृष्टिकोणातून अथवा जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या भूमिकेतून जागेचे तंटे, बांधा-बांधावरुन झालेले वाद आदी बाबींशी निगडित निवाडे करावे लागतात. या कार्यशाळेने एक सकारात्मक व शेतकऱ्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

इस्राईल सारखा आपल्या जिल्ह्याएवढा देश केवळ शेतीच्या प्रगतीतून संपूर्ण जगावर मोहिनी घालू शकतो. तिथले शेतकरी विपरीत परिस्थिती असूनही प्रगतीचे शिखर गाठू शकतात. याला कारण म्हणजे तिथे शेतकऱ्यांची एकसंघ असलेली शक्ती व उच्च तंत्रज्ञान ! आपल्या शेतकऱ्यांनीही विकेल ते पिकेल या भावनेतून एकसंघ होऊन गटशेतीच्या माध्यमातून, एफपीओच्या माध्यमातून शेतीला आधुनिक व व्यावसायिकतेची जोड दिली तर आपणही कुठे कमी पडणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना दिला. तुम्ही तुमच्या घामातून पिकविलेल्या शेती उत्पादनांना चांगले स्वत:च पॅकेजिंगचे साहित्य वापरुन उत्पादक झाले पाहिजे. जे उत्पादक तुम्ही बाजारपेठेसाठी लागणाऱ्या पॅकेजिंगच्या कौशल्यासह तयार कराल त्यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरत्या विक्रीसाठी विविध गटांना विभागून तात्पुरती जागा उपलब्ध करु असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा म्हणून आपण शेतीकडे पाहतो. जोपर्यंत शेतकऱ्यांना आपण ह्रदयाच्या जागी पाहणार नाही तोपर्यंत या कण्याला अर्थ येणार नाही, हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ह्रदयाची जागा घ्यायची असेल तर यापुढे विकेल तेच पिकेल हा मंत्र घेऊन अधिकाधिक व्यावसायिक तंत्र जवळ करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी केले. शेतीशी निगडीत शासन स्तरावर अनेक विभाग आहेत. या विभागांसहीत आता महिला विकास, केबीके, कापूस उत्पादक संघटना, प्रगतशील शेतकरी, गटशेती करणारे विविध गट या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. 

यावेळी नाबार्ड, स्मार्ट प्रकल्प, एक जिल्हा एक उत्पादन, अन्न प्रक्रिया योजना, पोकरा अंतर्गत शेतकरी गट / उत्पादक कंपन्या प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक कर्ज मंजुरीसाठी लागणारे कागदपत्र आदी बाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

0000







वृत्त क्रमांक   513 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश नांदेड दि. 19 मे :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नद...