Wednesday, December 9, 2020

 

विकेल ते पिकेल या मंत्रातच शेतकऱ्यांची प्रगती

-         जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर

स्मार्ट प्रकल्पाबाबत एक दिवशीय प्रयोगशाळा 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- निसर्गाच्या असमतोलाशी सतत संघर्ष करीत उभ्या असलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी स्वत: शेतीत थांबून लक्ष दिले तरच त्याला त्यातून सावरता येते. येथे ऑनलाइन काम करायचे ठरविले तर त्याच्या हाती काहीही लागणार नाही. त्याच्या जर हाती काही लागले नाही तर समाजाला अन्नाशिवाय जगता येणार नाही. शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या पारंपारिक पिकांना छेद देवून विकेल तेच पिकेल या मंत्राचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्‍हा नियोजन सभागृह येथे विकेल ते पिकेलअभियानातंर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाबाबत जिल्‍हास्‍तरीय एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी नांदेड जिल्ह्यातून आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. यात सोयाबिन पिकाच्या बियाण्यांपासून ते अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा वेळेवर पंचनामा व्हावा व त्यांना शक्य तेवढी शासकिय मदत कशी उपलब्ध करुन देता येईल इथपर्यंत त्यांनी स्वत: मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले. 

शासनाच्या कृषि क्षेत्रातील निगडीत असलेल्या योजनांची माहिती एकत्रितपणे शेतकऱ्यांना मिळावी व विकेल ते पिकेल या नव्या आत्मविश्वासातून शेतकऱ्यांच्या प्रगतीचे द्वारे खुली व्हावीत या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती एकाच व्यासपिठावरुन देता येत असल्या कारणाने मला याचा आनंद असून लवकरच बांधा-बांधावर सहभागी शेतकरी याचे खरे अर्थाने प्रात्याक्षिकरुपाच्या माध्यमातून आपआपले मॅडेल विकसित करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकरी म्हटले की एरवी महसूलच्या दृष्टिकोणातून अथवा जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या भूमिकेतून जागेचे तंटे, बांधा-बांधावरुन झालेले वाद आदी बाबींशी निगडित निवाडे करावे लागतात. या कार्यशाळेने एक सकारात्मक व शेतकऱ्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

इस्राईल सारखा आपल्या जिल्ह्याएवढा देश केवळ शेतीच्या प्रगतीतून संपूर्ण जगावर मोहिनी घालू शकतो. तिथले शेतकरी विपरीत परिस्थिती असूनही प्रगतीचे शिखर गाठू शकतात. याला कारण म्हणजे तिथे शेतकऱ्यांची एकसंघ असलेली शक्ती व उच्च तंत्रज्ञान ! आपल्या शेतकऱ्यांनीही विकेल ते पिकेल या भावनेतून एकसंघ होऊन गटशेतीच्या माध्यमातून, एफपीओच्या माध्यमातून शेतीला आधुनिक व व्यावसायिकतेची जोड दिली तर आपणही कुठे कमी पडणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना दिला. तुम्ही तुमच्या घामातून पिकविलेल्या शेती उत्पादनांना चांगले स्वत:च पॅकेजिंगचे साहित्य वापरुन उत्पादक झाले पाहिजे. जे उत्पादक तुम्ही बाजारपेठेसाठी लागणाऱ्या पॅकेजिंगच्या कौशल्यासह तयार कराल त्यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरत्या विक्रीसाठी विविध गटांना विभागून तात्पुरती जागा उपलब्ध करु असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा म्हणून आपण शेतीकडे पाहतो. जोपर्यंत शेतकऱ्यांना आपण ह्रदयाच्या जागी पाहणार नाही तोपर्यंत या कण्याला अर्थ येणार नाही, हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ह्रदयाची जागा घ्यायची असेल तर यापुढे विकेल तेच पिकेल हा मंत्र घेऊन अधिकाधिक व्यावसायिक तंत्र जवळ करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी केले. शेतीशी निगडीत शासन स्तरावर अनेक विभाग आहेत. या विभागांसहीत आता महिला विकास, केबीके, कापूस उत्पादक संघटना, प्रगतशील शेतकरी, गटशेती करणारे विविध गट या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. 

यावेळी नाबार्ड, स्मार्ट प्रकल्प, एक जिल्हा एक उत्पादन, अन्न प्रक्रिया योजना, पोकरा अंतर्गत शेतकरी गट / उत्पादक कंपन्या प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक कर्ज मंजुरीसाठी लागणारे कागदपत्र आदी बाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

0000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...