Monday, August 7, 2017

रोजगार मेळाव्याचे बुधवारी
नांदेड येथे आयोजन 
नांदेड दि. 7 :-  बेरोजगार तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने रोजगार मेळावा- 1 महात्मा फुले मंगल कार्यालय, फुले मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे बुधवार 9 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास जिल्ह्यातील रहिवासी व गरीब होतकरु तरुणांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.
या मेळाव्यात नवभारत फर्टीलायझर, शोध ॲडव्हॅनटेक औरंगाबाद, दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद, सिट्रस प्रोसेसिंग इंडिया लि. कंपनीत पुढील पदांसाठी फिल्ड ऑफीसर, क्वॉलिटी कंट्रोलर क्वॉलिटी ॲनलायसिस रिसर्च डेव्हलपर प्रोडक्शन, हेल्पर, सेक्युरिटी गार्ड, आयटीआय ट्रेनी, शिफ्ट इनचार्ज, असोसिएट, असोसिएट इनस्ट्रयुमेन्टेशन, असोसिएट इलेक्ट्रीकल, मॅनेजरफ्रुट प्रोक्रुमेंट, असिसटंट मॅनेजर अग्रोनोमिस्ट, सेल्स पोसिशन मुंबई भरती होणार आहे.
मेळाव्यास येतांना आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दहावी टिसी / सनद, जातीचा दाखल (असल्यास) यांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात. यावेळी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व अण्णासाहेब पाटील बीज भांडवल योजना विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे ( दुरध्वनी 02462- 251674 ) संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

000000
वाचनालयासाठी शाळा दत्तक उपक्रम
 जिल्हा ग्रंथालय कार्यालयात बुधवारी शुभारंभ 
            नांदेड दि. 7 :- क्रांतीदिन भारतीय ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रगंनाथन यांच्या जन्म दिनानिमित्त बुधवार 9 ऑगस्ट 2017 रोजी नांदेड जिल्हयातील सर्व शासनमान्य सार्वजनिक वाचनालयासाठी शाळा दत्तक उपक्रम सुरु करण्यात येत आहे. जिल्हा ग्रंथालय कार्यालय नांदेड येथे सकाळी 10 वा. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे हस्ते होणार आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, साहित्यिक डॉ. सुरेश सांवत, शिक्षणाधिकारी जयश्री गोरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने, कार्यवाह निर्मलकुमार सुर्यवंशी यांचप्रमुख उपस्थिती राहणार आहे, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी कळविले आहे.
मराठवाडयामध्ये प्रथमच नांदेड जिल्हयाया उपक्रमाचा शुभारंभ होत आहे. शालेय मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन भविष्यातील सुदृढ समाज निर्मितीसाठी भावी वाचक घडविणे. वाचन संस्कृती रुजविणे, जोपासणे वृध्दीगंत करण्यासाठी हा उपक्रम जिल्हा स्तरावर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासनमान्य  सार्वजनिक वाचनालये आपल्या गावातील, परिसरातील प्राथमिक माध्यमिक शाळांना या उपक्रमातर्गंत दत्तक घेणार आहेत. यामध्ये शासनमान्य सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथपाल आठवडयातील ठराविक दिवशी संबंधी शाळेजाऊन शालेय मुलांच्या वयोगटानुसार वाचन ग्रंथ ज्यामध्ये बालवाङमय, चरित्रमय, बोधमय, ज्ञानमय प्रेरणादायी असे ग्रंथ मुलाना नि:शुल्क वाचण्यासाठी देण्यात येतील. शालेय मुलासोबतच शिक्षकाना त्यांचे आवडीनुसार ग्रंथ दिले जातील. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना तसेच  शिक्षकांना ग्रंथ वाचावयास मिळतील सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथांना हक्काचा नियमित वाचक वर्ग मिळेल. या प्रकारचा उपयोगी उपक्रम पूर्वी विदर्भा 4- योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आला होता. मागील वर्षापासून हा उपक्रम सोलापूर जिल्हयात परिणामकारकरित्या राबविण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी दिली आहे.

0000000
राजा राममोहन रॉय ग्रंथालय योजनेसाठी   
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 7 :-  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे  www.rrlf.nic.in  हे संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी समाननिधी असमाननिधी योजनेसाठी विहित पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह इंग्रजी, हिंदी भाषेमधील प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास गुरुवार 24 ऑगस्ट 2017 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालक किरण धांडेारे यांच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयासाठी कार्यन्वित असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी असमान निधी योजनमध ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्यासंदर्भातील नियम, अटी अर्जाचा नमुना www.rrlf.nic.in  या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी केले आहे.
समान निधी योजना 2016-17 साठी राज्य शासनाच्या 50 टक्के प्रतिष्ठानच्या 50 टक्के अर्थसहाय्य राहील. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार, बांधणीसाठी अर्थसहाय्य कमाल मर्यादा 10 लाख आहे. असमान निधी योजना 2016-17 2017-18 साठी ग्रंथालय सेवा देणा-या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य यामध्ये प्रतिष्ठानचे 75 टक्के इच्छूक ग्रंथालय 25 टक्के हिस्सा असेल. सार्वजनिक ग्रंथालयातील बाल विभाग, महिला विभाग, ज्येष्ठ नागरिक विभाग, नवसाक्षर विभाग, स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग आदीसाठी तसेच बाल विभाग स्थापन करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय्य प्रतिष्ठानकडून 100 टक्के  राहील. महोत्सवी वर्ष जसे 50, 60, 75, 100, 125, 150 वे वर्ष साजरे करण्यासाठी प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य. शारिरिकदृष्टया विकलांग व्यक्तीसाठी विभाग स्थापन करण्यासाठी ग्रंथालयांना प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य राहील.

0000000
आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी
ॲटोरिक्षा परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 7 :- आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने संबंधित शेतकऱ्यांच्या विधवांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वावलंबन योजनेतून ॲटोरिक्षांचे परवान्यासाठी काही विशेष बाबी शिथील करण्यात आलेल्या आहेत. परवान्यासाठी अर्ज देऊन इरादापत्र घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करुन ऑटोरिक्षा परवाना प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्यातील काही भागातील टंचाई, गारपीट, अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा कर्जफेडीचा तगादा या कारणामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी मयत शेतकऱ्यांच्या  परिवारास चरितार्थ कायमस्वरुपी  साधन  उपलब्ध होण्याच्या दृष्टिने अशा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या  विधवा पत्नीसाठी  विशेष बाब म्हणून विधवा पत्नीच्या नावे ऑटोरिक्षा परवाना वितरित करण्यास हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वालंबन योजनेद्वारे  21 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयान्वये  मान्यता दिलेली आहे. या शासन निर्णायाद्वारे विशेष बाबी पुढील प्रमाणे शिथील करण्यात आलेल्या आहेत.
ऑटोरिक्षा  खरेदी करण्यासाठी अशा विधवा महिलांकडे  आर्थिक तरतूद नसल्याचे बाब विचारात घेऊन त्यांना शंभर टक्के कर्ज पुरवठा होणे आवश्यक असल्याने हे कर्ज पुरवठा राज्यातील वित्त पुरवठा करणाऱ्या बँका व तत्सम वित्त संस्था करणार आहेत. या योजनेसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटुंबास शासनाने तातडीची मदत मिळण्यासाठी पात्र कुंटुंब म्हणून घोषित करुन महसूल व वन विभागाच्या दि. 19 डिसेंबर 2005 आणि 22 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयानुसार 1 लाख सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा  त्यासाठी पात्र ठरविले आहे अशाच शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला ऑटोरिक्षा परवाना मिळण्यासाठी पात्र राहतील.
ऑटोरिक्षा परवाना जारी करताना परवाना धारकांकडे ऑटोरिक्षा लायसन्स व बॅज असणे आवश्यक आहे. तथापि या योजनेद्वारे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसाठी जारी करण्यात येणाऱ्या परवान्यांच्या बाबतीत अशा विधवांना या अटीमधून सूट देण्यात आली आहे.
अशा आत्महत्या  केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासनाने दिलेल्या एक लाख सानुग्रह अनुदानापैकी पोष्ट / बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेच्या जमा असलेली 70 हजार रुपयाची ठेव रक्कम बँकेकडून कर्ज पुरवठा करताना सदर लाभार्थी कर्जासाठी हमी म्हणून वापरु शकतील.
या योजनेद्वारे विधवा महिलांना परवाना वितरीत केल्यानंतर त्याबाबतचे पालकत्व संबंधित स्थानिक प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे राहील. त्यांनी सदर ऑटोरिक्षा चालविण्यासाठी पात्र व्यक्तीची अथवा त्रयस्त व्यक्तीची निवड करण्यासाठी विधवा महिला परवाना धारकांना मदत, मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
ऑटोरिक्षा परवान्यासाठी
अर्ज करण्याचे आवाहन  
           नांदेड दि. 7 :- ऑटोरिक्षा परवान्यावरील स्थगिती उठविली असून इच्छुक अर्जदारांनी ऑटोरिक्षा परवान्यासाठी www.parivan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज, शुल्क भरुन परवाने प्राप्त करुन घ्यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 7 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000
राष्ट्रीय विरता पुरस्कारासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
           नांदेड, दि. 7 :- अपघातग्रस्त, संकटात सापडलेल्या व्यक्तीचा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धाडसाने, शौर्याने जीव वाचविणाऱ्या मुलांचा गौरव करण्याच्यादृष्टीने केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय विरता पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो.
            त्याअनुषंगाने 1 जुलै 2016 ते 30 जु2017 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील वय 6 ते 18 वर्षाखालील बालकांनी अतुलनीय शौर्य दाखून अलौकीक कार्य केलेले असेल अशा बालकांचे विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 24 गणेशकृपा इमारत, शास्त्रीनगर नांदेड यांचेकडे बुधवार 20 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...