Monday, August 7, 2017

आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी
ॲटोरिक्षा परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 7 :- आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने संबंधित शेतकऱ्यांच्या विधवांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वावलंबन योजनेतून ॲटोरिक्षांचे परवान्यासाठी काही विशेष बाबी शिथील करण्यात आलेल्या आहेत. परवान्यासाठी अर्ज देऊन इरादापत्र घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करुन ऑटोरिक्षा परवाना प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्यातील काही भागातील टंचाई, गारपीट, अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा कर्जफेडीचा तगादा या कारणामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी मयत शेतकऱ्यांच्या  परिवारास चरितार्थ कायमस्वरुपी  साधन  उपलब्ध होण्याच्या दृष्टिने अशा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या  विधवा पत्नीसाठी  विशेष बाब म्हणून विधवा पत्नीच्या नावे ऑटोरिक्षा परवाना वितरित करण्यास हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वालंबन योजनेद्वारे  21 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयान्वये  मान्यता दिलेली आहे. या शासन निर्णायाद्वारे विशेष बाबी पुढील प्रमाणे शिथील करण्यात आलेल्या आहेत.
ऑटोरिक्षा  खरेदी करण्यासाठी अशा विधवा महिलांकडे  आर्थिक तरतूद नसल्याचे बाब विचारात घेऊन त्यांना शंभर टक्के कर्ज पुरवठा होणे आवश्यक असल्याने हे कर्ज पुरवठा राज्यातील वित्त पुरवठा करणाऱ्या बँका व तत्सम वित्त संस्था करणार आहेत. या योजनेसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटुंबास शासनाने तातडीची मदत मिळण्यासाठी पात्र कुंटुंब म्हणून घोषित करुन महसूल व वन विभागाच्या दि. 19 डिसेंबर 2005 आणि 22 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयानुसार 1 लाख सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा  त्यासाठी पात्र ठरविले आहे अशाच शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला ऑटोरिक्षा परवाना मिळण्यासाठी पात्र राहतील.
ऑटोरिक्षा परवाना जारी करताना परवाना धारकांकडे ऑटोरिक्षा लायसन्स व बॅज असणे आवश्यक आहे. तथापि या योजनेद्वारे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसाठी जारी करण्यात येणाऱ्या परवान्यांच्या बाबतीत अशा विधवांना या अटीमधून सूट देण्यात आली आहे.
अशा आत्महत्या  केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासनाने दिलेल्या एक लाख सानुग्रह अनुदानापैकी पोष्ट / बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेच्या जमा असलेली 70 हजार रुपयाची ठेव रक्कम बँकेकडून कर्ज पुरवठा करताना सदर लाभार्थी कर्जासाठी हमी म्हणून वापरु शकतील.
या योजनेद्वारे विधवा महिलांना परवाना वितरीत केल्यानंतर त्याबाबतचे पालकत्व संबंधित स्थानिक प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे राहील. त्यांनी सदर ऑटोरिक्षा चालविण्यासाठी पात्र व्यक्तीची अथवा त्रयस्त व्यक्तीची निवड करण्यासाठी विधवा महिला परवाना धारकांना मदत, मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...