Friday, November 16, 2018


महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे अध्यक्ष 
न्यायाधिश के. यु. चांदीवाल यांचा दौरा
नांदेड दि. 16 :- महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष न्यायाधिश के. यु. चांदीवाल हे 3 नोव्हेंबर 2018 ते 2 डिसेंबर 2018 या कालावधीत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण औरंगाबाद येथे असून सदर कालावधीत या न्यायाधिकरणातील बेंच क्रमांक 1 सदस्य (न्यायीक) रिक्त असल्याने बेंच क्रमांक 1 च्या प्रकरणामध्ये मा. अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत, अशी माहिती औरंगाबाद महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे उपप्रबंधक यांनी दिली.
00000



नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द साहित्यीक सुरेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्रताप सुर्यवंशी, संजय कर्वे, को. मा. गाडेवाड आदी. 


"रस्ता सुरक्षा महा वॉकेथॉन"चे रविवारी आयोजन
नांदेड दि. 16 :- रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन होण्याचे दृष्टीकोनातून परिवहन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, CASI CSR Diary यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 18 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 8 वा. "रस्ता सुरक्षा महा वॉकेथॉन"  आयोजन करण्यात आले आहे.
सदर महावॉकेथॉन कॅम्ब्रीज स्कूल शिवाजीनगर नांदेड येथून आरंभ होणार असून ती यशवंत अर्बन सोसायटी ते आयटीआय पेट्रोलपंप ते कुसुम सभागृह ते यशवंत कॉलेज रोड ते सार्वजनिक बांधकाम विभाग ते आयटीआय येथे संपन्न होणार आहे. सदर महावॉकेथॉन मधील सहभागी व्यक्ती 2 किमी अंतर चालतील.
या महावॉकेथॉनद्वारे सुरक्षात्मक जबाबदार ड्रायव्हींगद्वारे रस्ता सुरक्षा, ध्वनीप्रदूषणावर निर्बंध याबाबत संदेश देऊन जनजागृती करण्याबाबतचा प्रयत्न केला जाणार आहेत. सर्वांनी या महावॉकेथॉनमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


 कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :- शासन परिपत्रकानुसार 19 ते 25 नोव्हेंबर 2018 या कालावधी जिल्ह्यात कौमी एकता सप्ताह म्हणून व 20 नोव्हेंबर हा अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व निमशासकीय, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आदींसह विविध यंत्रणांनी दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या सप्ताहात 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस, 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस, 21 नोव्हेंबर भाषिक सुसंवाद दिवस, 22 नोव्हेंबर दुर्बल घटक दिवस, 23 नोव्हेंबर सांस्कृतिक एकता दिवस, 24 नोव्हेंबर महिला दिन आणि 25 नोव्हेंबर 2017 रोजी पर्यावरण जोपासना दिवस साजरा करण्यात येणार आहे.
19 नोव्हेंबर रोजी शासनाच्या सर्व कार्यालयातून तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात येणार आहे. हा सप्ताह साजरा करण्यासाठी संबंधितांनी अल्पसंख्याक विकास विभाग 14 नोव्हेंबर 2017 रोजीच्या शासन परिपत्रकाचे अवलोकन करावे व आपल्या अधिनस्त यंत्रणांद्वारे सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे.
000000


राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी
 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 16 : केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाययाच्या विविध योजना राबविण्यात येतात. असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यान्वित असलेल्या अर्थसहायाच्या असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालयामार्फत दरवर्षी अर्थसहाय करण्यात येते. यासंदर्भातील नियम, अटी आणि अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलबध आहे.
असमान निधी योजनेअंतर्गत सन 2018-19  साठी ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम आणि इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहायय देण्यात येणार आहे. याशिवाय राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आणि जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय,दिव्यांग वाचकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठीचे अर्थसहायय, हस्तलिखिताचे कॉपीराईट, दुर्मिळ ग्रंथ व दस्ताऐवज, जुनी नियतकालिके, ऐतिहासिक रेकॉर्डस आणि सामग्री यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी अर्थसहाय, डिजिटल माहिती सेवा विभाग प्रस्थापित करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक ग्रंथालयासाठी अर्थसहाय देण्यात येणार आहे.
राजा रामामोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यांलयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी असमान निधी योजनेसाठी विहित पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी आणि हिंदी भाषेमधील प्रस्ताव चार प्रतीमध्ये संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत करावेत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करन परिपूर्ण प्रस्ताव शिफारशींसह 10 डिसेंबर 2018 पर्यंत सहाययक ग्रंथालय संचालक यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे. तसेच सहाययक ग्रंथालय संचालक कार्यालयांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडून प्राप्त प्रस्तावांची बारकाईने तपासणी करुन विहित नमून्यातील परिपूर्ण प्रस्ताव शिफारशींसह दिवप्रतीत 21 डिसेंबर 2018 पर्यंत ग्रंथालय संचालनालयास सादर करणे आवश्यक असल्याचे ग्रंथालय संचालनालयाचे संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकादवारे सूचित केले आहे.
000000



  पत्रकारांनी आचारनिति पाळावी
- शंतनू डोईफोडे
नांदेड, दि. 16 :- डिजीटल युगामाध्ये वृत्तपत्रातील बातमीला महत्व आहे. सर्वसमान्य नागरिकांचा बातमीवर विश्वास असल्याने पत्रकारांची जबाबदारी अधिक असते. त्यामुळे पत्रकारांनी आचारनिती पाळावी, असे प्रतिपादन प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी केले.
नांदेड जिल्हा माहिती कार्यालय आणि एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. डोईफोडे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोविंद हंबर्डे तर प्रमुख पाहूणे म्हणून नांदेड शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फसके, प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना डोईफोडे म्हणाले, प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात येवून घटनात्मक अधिकार देण्यात आले. त्यामुळे वृत्तपत्राचे स्वातंत्र्य अबाधित आहे. पत्रकारांनी जबाबदारीपूर्वक वृत्तांचे लिखान केले पाहिजे. नवीन युवा पत्रकारांनी या क्षेत्रामध्ये येतांना भान ठेवून आले पाहिजे. मोजक्याच पत्रकारांनी समाज मान्यता मिळते. त्यामुळे आचारनिती पाळूनच वृत्तपत्र क्षेत्रामध्ये लिखान करावे. डिजीटल युगामध्ये विदेशातील वृत्तपत्रांना परिणाम झालेला आहे. परंतु आपल्याकडे वृत्तपत्रांचे महत्व कमी होणार नाही, असे म्हणत त्यांनी मराठवाड्याचे भूषण अनंतराव भालेराव यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच जेष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्या अग्रलेखावर आधारीत व्याख्यानमाला आयोजित करावी, असे देखील ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फसके म्हणाले, लोक बोलण्यावरती विश्वास ठेवत नाहीत तर वृत्तपत्रातून आलेल्या बातमीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे पत्रकारांनी चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य गोविंद हंबर्डे म्हणाले, वाचन संस्कृती डिजीटल युगामुळे लोप पावत आहे असे म्हटले जाते. परंतु डिजीटल ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक वाचक जोडले गेलेले आहेत. युवा पत्रकारांनी निकोप समाज जीवन घडविण्यासाठी अनंतराव भालेराव आणि जेष्ठ संपादक सुधाकरराव डोईफोडे, गोविंद तळवळकर यांचे अग्रलेख वाचावेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी म्हणाले की, 16 नोव्हेंबर, 1966 पासून राष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. जेष्ठ संपादक सुधाकरराव डोईफोडे यांच्या नावाने राज्य शासनाने उत्कृष्ट लेख लिखान करणाऱ्या पत्रकारांना 51 हजारांचा पुरस्कार देण्याचे घोषित केले आहे. ही बाब नांदेडसाठी निश्चित अभिनंदनाची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगत राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्व विस्तृतपणे सांगितले. छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी नवोदित पत्रकारांना राष्ट्रीय पत्रकार दिन व छायाचित्राचे महत्व सांगितले. 
कार्यक्रमात एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून यश मिळविल्याबद्दल अश्विनी केवटे, अनिता गायकवाड, नितेश कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषिकेश कोंडेकर यांनी केले तर आभार विवेक डावरे यांनी मानले.
यावेळी उमाकांत जोशी, डॉ. प्रवीणकुमार सेलूरकर, प्रा. राजपाल गायकवाड, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, पत्रकार प्रशांत गवळे, सुरेश अंबटवार, शिवाजी शिंदे यांच्यासह पत्रकार व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, श्रीमती अलका पाटील, महमद युसूफ यांनी केले.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...