Thursday, March 24, 2022

 होट्टल सांस्कृतिक महोत्सवाच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड जिल्ह्यातील चालुक्यीन परंपरेचा वारसा लाभलेले, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यांच्या सिमावर्ती भागात असलेल्या होट्टल नगरी येथील महोत्सवाची परंपरेचे हे तीसरे पुष्प एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे गुंफले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन 9, 10 व 11 एप्रिल 2022 रोजी पर्यटन संचलनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जाहिर करण्यात आले आहे. 

होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022 च्या नियोजनात्मक आयोजनाकरीता स्थानिक स्तरावर विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 22 मार्च 2022 रोजी महोत्सव आयोजनाच्या प्राथमिक बैठकीत हे निर्देश दिले होते. 

या समित्यांमध्ये मुख्य नियंत्रण समिती, स्वागत समिती, व्यासपीठ-मंडप-स्टॉल उभारणी समिती, सुरक्षा समिती, प्रसिद्धी व वार्तांकण समिती, निमंत्रण पत्रिका समिती, सांस्कृतिक व कार्यशाळा कार्यक्रम समिती, भोजन व जलपाण व्यवस्थापन समिती, नियामक समिती, वैद्यकीय सेवा-स्वच्छता समिती यांचा समावेश आहे. या समित्यांचे संचलन सुयोग्यरित्या करण्यासाठी समिती प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या आदेशात नमूद करण्यात आलेल्या समित्यांसमवेत समन्वय साधण्याची जबाबदारी देखील समिती प्रमुखांवर देण्यात आली आहे. 

समिती प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना या कामी नियुक्त करावयाचे आहे. नियुक्तीचे आदेश, त्यात केलेले बदल, बदललेले भ्रमणध्वणी क्रमांक या अनुषंगाने वेळोवेळी मुख्य नियंत्रण समितीच्या निदर्शनास आणून द्यावेत. यात कुठलीही नियुक्ती नियमबाह्य व परस्पर होणार नाही याची समिती प्रमुख यांनी खात्री करावी. 

प्रत्यक्ष महोत्सवाच्या तारखा म्हणजे 9 ते 11 एप्रिल 2022 या कालावधीत सर्व समिती प्रमुखांनी त्यांच्या समिती मधील आदेशाव्यतिरिक्त जास्तीत-जास्त 10 अधिकारी-कर्मचारी (प्रती समिती) यांची नियुक्ती होट्टल येथील कार्यक्रम स्थळी करावी. त्याबाबत मुख्य समिती व भोजन-जलपान व्यवस्था समिती यांना 5 एप्रिल 2022 पूर्वी अवगत करण्याची तसदी घ्यावी, जेणेकरून व्यवस्थापनातील एकसंघता कायम राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.   

समितीचे सदस्य व समितीकडे सोपविण्यात आलेले कार्य पुढील प्रमाणे आहेत. यात मुख्य नियंत्रण समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे या समितीचे प्रमुख असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, औरंगाबाद पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, जिल्हा नियोजन अधिकारी एस. के. आडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी प्रशांत तातोडे, उपचिटणीस मकरंद दिवाकर हे सदस्य आहेत. या समितीचे कार्यात कार्यक्रमासाठी आवश्यक ती समिती स्थापन करणे, कार्यक्रमासाठी आवश्यक निधी संकलनाचे काम, कार्यक्रमाचे आयोजन निश्चित करणे, प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचे आदेश निर्गमीत करणे, निधी संकलनासाठी आमदारांची मान्यता प्राप्त करून घेणे, विविध विषयांच्या निविदा प्रक्रिया अंतिम करणे, नियोजीत कार्यक्रमासाठी मुंबई येथील पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक यांची परवानगी घेणे, नियोजन विभागाकडील निधी मंजुरी संबंधाने पत्रव्यवहार व मंजुरी प्राप्त करून घेणे, लेखे संबंधाने संकलन व अनुषंगीक कामे करणे ही आहेत. 

स्वागत समितीचे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे प्रमुख आहेत तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, देगलूरचे तहसिलदार राजाभाऊ कदम हे सदस्य आहेत. या समितीचे कार्यात कार्यक्रमासाठी निमंत्रित करावयाच्या प्रमुख पाहुण्यांची नावे त्यांच्या तारखा, संपर्क निश्चित करणे. कार्यक्रम आमंत्रण पत्रिका निश्चित करणे, सन्मान चिन्हे निश्चित करणे, विहित काळात निश्चितपश्चात व छपाई आणि वितरणासाठी निमंत्रण पत्रिका समिती यांच्याकडे हस्तांतरण करणे, कार्यक्रमाचे मिनिट टू मिनीट नियेाजन करणे, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रण पत्रे देणे, कार्यक्रमस्थळी प्रमुख पाहुण्यांचे आगमन, स्वागत समारंभाचे नियोजन, मान्यवरांना द्यावयाचे स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ संबंधी नियेाजन, प्रत्यक्ष उद्घाटन व समारोप कार्यक्रमाचे आयोजन करणे आहेत. 

व्यासपीठ मंडप, स्टॉल उभारणी समितीत देगलूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विद्युत विजय पुसदकर, जिल्हा कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, देगलूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड हे सदस्य आहेत. समितीकडील कार्यात कार्यक्रमस्थळी नियुक्त कंत्राटदाराकडून उभा करावयाच्या मंडपाचा आराखडा तयार करून त्यानुसार व्यासपीठाची उभारणी, सुरक्षितता, मजबुतीच्या अनुषंगाने पर्यवेक्षण, प्रमाणीकरण करणे. नियुक्त कंत्राटदाराकडून विद्युत पुरवठा अविरत राहण्यासंबंधाने (जनरेटर तत्सम), प्रत्यक्ष कार्यन्वहन, सुरक्षितता प्रमाणीकरण. परिसरात लावण्यात येणाऱ्या विविध स्टॉल्सचे आरेखण, उभारणी, विविध सेवा जसे पाणी, विद्युत पुरवठा देणे, सांस्कृतिक व्यासपीठ, ध्वणीक्षेपण यंत्रणा, होट्टल मंदीर व परिसरात आकर्षक विविध रंगी विद्युत रोषणाई, मंडपामधील व व्यासपिठावरील आसन व्यवस्था, स्वच्छतेच्या अनुषंगाने स्वच्छता समिती समवेत समन्वयन, कृषी विभाग, महिला बचतगट यांच्या स्टॉल वाटपासंबंधी कार्यान्वयन करणे, छायाचित्रकारांसाठी मुख्य कार्यक्रम स्थळी मंडपात छायाचित्रणाची व्यवस्था करणे, कार्यक्रम पश्चात विद्युत देयकांची अदायगी संबंधाने समन्वयन करणे, स्वागत समिती, प्रसिद्धी व वार्तांकण समिती समवेत समन्वय करणे, देगलूर ते होट्टल या रस्यावरील वाहतूक सुयोग्य राहण्यासाठी योग्य त्या ठिकाणी डागडुजी, अपघात प्रवण क्षेत्रात रिफ्लेक्टर्स बसविणे. 

सुरक्षा समिती पोलीस अधीक्षक प्रमुख शेवाळे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, देगलूर पोलीस निरीक्षक सोहन माछरे, मरखेलचे पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांचा समावेश आहे. समितीचे कार्य कार्यक्रम स्थळी नियुक्त कंत्राटदाराकडून उभा करावयाच्या मंडपाची, व्यासपीठाची सुरक्षितता. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या मंडपाची विविध स्टॉल्सची व्यवस्था करणे, कार्यक्रमाचे उद्घाटन, समारोप, तीन दिवसातील इतर कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमस्थळी गर्दीचे नियंत्रण, पर्यवेक्षण, बंदोबस्त लावणे व त्यांचे सनियंत्रण करणे. नियुक्त कंत्राटदाराकडून विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी (जनरेटर तत्सम) प्रत्यक्ष कार्यन्वहन, सुरक्षितता प्रमाणीकरण, कार्यक्रमस्थळी उपद्रवमूल्य व्यक्तींचा बंदोबस्त करणे, येणाऱ्या वाहनांच्या वाहनतळाच्या ठिकाणी सनियंत्रण, प्रमुख पाहुण्यांच्या, आमंत्रित कलाकारांच्या वाहनांसाठी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक सनियंत्रण करणे, व्यासपीठ व स्वागत समवेत समन्वय साधणे ही कार्य आहेत.   

प्रसिद्धी व वार्तांकन समितीत जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, देगलूर उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, जिल्हा सूचना अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती सविता बिरगे यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य कार्यक्रमाच्या तारखांना योग्य प्रसिद्धी देणे, कार्यक्रमासाठी आवश्यक होर्डिगचे डिझाईन तयार करणे, त्याची उभारणी ठिकाणे निश्चित करणे व प्रत्यक्ष उभारणीच्या अनुषंगाने कारवाई करून घेणे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जाहिरात तयार करणे, तयार केलेल्या जाहिरातीचे स्थानिक, राज्य पातळीवरील वृत्तपत्र, राज्य पातळीवरील इलेक्ट्रॉनिक मिडिया यांच्याकडील प्रसिद्धीच्या अनुषंगाने शासन स्तरावरील मार्गदर्शन बरहुकूम कार्यवाही करणे. दिनांक पासून ते कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे वृत्तांकन, संकलन, वृत्तपत्रांना जिल्हा प्रशासनाच्या पूर्व परवानगीचे वृत्त, छायाचित्रे पुरविणे. प्रसिद्धी वृत्तांचे संकलन करणे, डॉक्युमन्टेशन करणे. जिल्ह्यातील नोंदणीकृत वृत्तपत्र संस्थांना, इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींना कार्यक्रमाचे निमंत्रण पोहचविणे. छायाचित्रकारांसाठी मुख्य कार्यक्रमस्थळी मंडपात छायाचित्रणाची व्यवस्था करणे. स्वागत समिती व नियंत्रण समिती, व्यासपीठ मंडप स्टॉल समिती समवेत समन्वय साधणे, संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण व व्हिडिओ शुटींगच्या अनुषंगाने कार्यवाही करणे. 

निमंत्रण पत्रिका समितीत उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवतकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य- नियंत्रण पत्रिका स्वागत समिती समवेत विहित वेळेत तयार करून घेवून त्यांच्या प्रती छापून घेणे, कार्यक्रमास आमंत्रित करावयाच्या निमंत्रितांची यादी राजशिष्टाचार बरहुकूम तयार करणे. निमंत्रण पत्रिका निमंत्रीतांपर्यंत पोहचतील यासाठी कर्मचारी नियुक्ती व निमंत्रण पोहचण्याची खबरदारी घेणे, निमंत्रीतांची बैठक व्यवस्था, व्यासपीठ मंडप स्टॉल समिती समवेत समन्वय साधने. प्रसिद्धी व वार्तांकन समिती समवेत समन्वय साधने व पत्रकारांना निमंत्रणे, कार्यक्रम स्थळी त्यांची बैठक व्यवस्था याबाबत खबरदारी घेणे ही आहेत. 

सांस्कृतिक व कार्यशाळा कार्यक्रम समितीत उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सौ. दिपाली मोतीयाळे, औरंगाबाद पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, ज्येष्ठ साहित्यीक डॉ. मुलमुले, प्रतिनिधी सुरेश जोंधळे यांचा समावेश आहे. यात समितीचे कार्य- सांस्कृतिक कार्यक्रमाची रुपरेषा तयार करणे, आंतरराष्ट्रीय कलाकारांची निवड व निश्चित करणे, स्थानिक कलाकारांची निवड व त्यापश्चात त्यांच्या कार्यक्रमाची निश्चिती करणे, कलाकारांची कार्यक्रम स्थळी व्यवस्थेचे पर्यवेक्षण व आवश्यक अनुषंगीक कामे करणे. कार्यशाळेसाठी विषय निवड करणे त्यासाठी आमंत्रित करावयाच्या मान्यवरांची यादी निश्चित करणे. प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील आवश्यक प्रकाश योजना व ध्वणी योजना या अनुषंगाने संबंधीत तंत्रज्ञानासमवेत समन्वय साधणे, पुस्तके, स्मरणिका, कॉलेंडर प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करणे ही आहेत. 

भोजन व जलपाण व्यवस्था समितीत बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, बिलोलीचे तहसीलदार श्रीकांत निळे, देगलूर गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, देगलूर नायब तहसिलदार (पुरवठा) बालाजी मिठ्ठेवाड यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य- कार्यक्रमासाठी आमंत्रित प्रमुख पाहुण्यांची चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था, स्वागत समिती समवेत समन्वय साधुन करणे. सर्व समितींमध्ये समाविष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्या याद्या संकलीत करुन संबंधितांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पासेस पुरविणे त्यांच्या जेवण्याची व चहाची व्यवस्था करणे हे आहे. 

नियामक समितीत देगलूरचे उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम, देगलूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर इेरलोड, देगलूर नायब तहसीलदार वसंत नरवाडे, नांदेडचे नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य- कार्यक्रमासाठी आमंत्रित प्रमुख पाहुणे यांचा राजशिष्टाचार अंतर्गत जिल्हा मुख्यालय ते कार्यक्रम स्थळ व्यवस्था बघणे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या कलाकार व त्यांच्या संचाची देगलूर शहर, कार्यक्रमस्थळी सर्व व्यवस्थेकरीता लायझनिंग करणे. कलाकारांना ने-आण करण्यासाठी वाहन, प्रवास व्यवस्था बघणे. कार्यक्रम कालावधीत निमंत्रित अधिकारी, पदाधिकारी, कलाकार यांना चहा, नाश्ता, जेवण संबंधाने भोजन जलपान समिती समवेत समन्वय ठेवणे. निमंत्रित कलाकार, अधिकारी यांची निवास व्यवस्था करणे. निमंत्रित कलाकार, अधिकारी यांची नांदेड शहरातील व्यवस्था व कार्यक्रम स्थळापर्यंतची व्यवस्था करणे ही आहेत. 

वैद्यकीय सेवा, स्वच्छता समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, देगलूरचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, देगलूरचे तालुका आरोग्य अधिकारी अशिष देशमुख, देगलूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य- कार्यक्रमस्थळी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी फवारणी व प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे. कार्यक्रम काळात वैद्यकीय पथकाची स्थापना करणे. कार्यक्रम स्थळ परिसरातील सर्व प्रकारची स्वच्छता राखण्याची जबाबदारी तसेच मोबाईल टॉयलेटची उपलब्धता करून घेणे. कोविड-19 च्या अनुषंगाने लसीकरणाचा कॅम्प लावणे ही आहेत. 

या समितीकडे सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त मुख्य नियंत्रक समितीकडून ऐनवेळी सोपविण्यात आलेल्या विषयांचे कार्यान्वयन करण्याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आलेली आहे. या महोत्सवाच्या काळात समिती सदस्यांनी व त्यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी 24 तास कार्यान्वित ठेवण्याची विशेष काळजी घ्यावी. या कार्यक्रमाची भव्यता व एकसांघिकपणा आबाधित राहील याची प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

000000 

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 560 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 797 एवढी झाली असून यातील 1 लाख 98 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 7 रुग्ण उपचार घेत आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे.

आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 5 असे एकुण 7 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 92 हजार 795

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 72 हजार 870

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 797

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 98

एकुण मृत्यू संख्या-हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-06

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

स्वामित्व योजनेअंतर्गत जानापुरी येथे सनदांचे वितरण 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- स्वामित्व योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या मिळकतीच्या सनदांचे वितरण लोहा तालुक्यातील जानापुरी येथे करण्यात आले. सनद वितरणाचा कार्यक्रम औरंगाबादचे उपसंचालक भूमि अभिलेखअनिल माने व जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठीया यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी गावातील 10 मिळकत धारकांना सनद वाटप करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गावातील घरांचे नकाशे व कायदेशीर कागद मिळाल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच दादाराव गच्चे व उपसरपंच संतोष कदम जानापुरीकर तसेच भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी  पी. आर. माळी, एन. आर. उंडे व कर्मचारी राजु दळवीगिरीष अंबेकरश्री. डफडे, ए. के. ढाकेएन. एच. पिंपळगावकरश्री. नलमेलवारश्री कागणे व गटविकास अधिकारीग्रामसेवक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

0000




अल्पसंख्याक घटकातील युवकांनी

तंत्रकुशल शिक्षणासाठी पुढे यावे -    ज. मो. अभ्यंकर

नांदेड, (जिमाका) दि. 24 : अल्पसंख्याकांना विकासाचा प्रभावात आणण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात  येत आहेत . डॉ. झाकीर हुसेन मदरसा शासनाने सुरू केला. आधुनिक शिक्षण प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते . तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक शिक्षण प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांनी अधिक तंत्र कुशल  होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य आर. डी. शिंदे, के. आर. मेढे, रमेश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे यांची उपस्थिती होती. 

नांदेड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. आज तरूण पिढीला आवश्यक असणारे औद्योगिक प्रशिक्षण देवून  जास्तीत जास्त तरूण तरूणींना उदरनिर्वाह करण्यासाठी स्वंबळावर उभे करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी  तंत्रशिक्षणात आवश्यक ते बदल होणे गरजे आहे . अल्पसंख्याक समुदायातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, प्री मेट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते अपुऱ्या मनुष्यबळामुळे या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

महराष्ट्रातील पहिले उर्दु घर हे नांदेड शहरात  तयार करण्यात आले. येथे भव्य ग्रंथालय तयार करण्यात आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके व डिजीटल ग्रंथालय उपलब्ध असून येत्या काळात अभ्यासासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल .यामुळे या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यंनी लाभ घ्यावा असे ते यावेळी म्हणाले. 

बॉक्स

कृषी समाजकल्याण व पशुसंवर्धन अंतर्गत दुर्गम व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या चेहऱ्यावरील आनंद , दुर्गम भागातील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यांवरील समाधान बघून खूप आनंद झाला. खर तर आयोगा समोर कागदावर अहवाल ठेवण्यात येतो परंतु जिल्हा परिषद नांदेडने लाभार्थ्यांना समोर केल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा आनंद  मिळाला . या भावना समितीने व्यक्त केल्या.जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे, यांनी मेरी बेटी मेरा अभिमान अंतर्गत मुलींच्या नावाच्या पाट्यांच्या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केले.स्त्री आत्मसन्मानाचा दृष्टिने हे महत्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी नमूद केले.

000000

 शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी

दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जनतेच्या सोयीसाठी दस्त नोंदणी तसेच इतर कार्यालयीन कामासाठी शनिवार 26 व रविवार 27 मार्च 2022 या शासकीय सुट्टीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय नांदेड क्र. 1 व 2 तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 नांदेड क्र. 3 सुरु ठेवण्यात येत आहेत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी कळविले आहे. 

ज्या पक्षकारांनी 31 मार्च 2022 पर्यंत दस्त निष्पादित करुन, सही करुन शासकीय ई-चलन मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कचा भरणा करुन ठेवल्यास त्यांचे दस्त पुढील चार महिण्यापर्यत नोंदणीसाठी विनादंड स्विकारण्यात येतील. वार्षिक मुल्यांकन दरवाढ झाल्यास संबंधितास अतिरिक्त भुर्दड बसणार नाही. त्यामुळे पक्षकारांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात अनावश्यक गर्दी न करता ई-स्टेपइनचा वापर करुन दिलेल्या निर्धारित वेळेत आपल्या दस्ताची नोंदणी करावी व गैरसोय टाळावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000  

सुधारीत वृत्त क्रमांक 286

महाराष्ट्र सेवा संयुक्त (पुर्व) परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-2021 ही परीक्षा रविवार 3 एप्रिल 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 51 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे.  

नांदेड जिल्ह्यातील विविध 51  विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी  11 ते दुपारी 12  या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी  18 हजार 760 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील  100  मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

 

शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री व्हावी

यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

-    जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- शेतकऱ्यांनी मोठी स्वप्न पहावीत. याचबरोबर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्यासाठी एकत्र येवून ग्राहकांना शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतः उद्योजक व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील धान्य महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह  परदेशी,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांची उपस्थिती होती.  या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सहभागी शेतकरी, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी विभाग व आत्माचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

शेतमालाची  मूल्य साखळी निर्माण करून विक्री करावी असे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह  परदेशी यांनी यावेळी सांगितले.  या महोत्सवामध्ये 60 वैयक्तीक शेतकरी, 60 महिला व शेतकरी गट व 10 शेतकरी उत्पादक कंपनीने सहभाग नोंदविला. या माध्यमातून  शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्री झाला. विक्री झालेल्या शेतमालाची  किंमत सुमारे 30 लक्ष रुपये आहे. याशिवाय सुमारे 25 लाख रुपयांच्या शेतमालाची आगाऊ नोंदणी ग्राहकांनी शेतकऱ्यांकडे केली आहे.  या महोत्सवामध्ये नैसर्गिक शेती मधील गावरान लसूण, सेंद्रिय गुळ, धर्माबादची गावरान टाळकी ज्वारी, लोहा तालुक्यातील लोकवन गहू, खपली गहू, देगलूरचे लाकडी घाण्यावरील करडई तेल, कामठा तालुका अर्धापूर येथील सेंद्रिय टरबूज, गावरान तीळ, जवस, मोहरी, आळीव व अनेक प्रकारचे पापड, धान्य, हळद पावडर, लाल मिरची पावडर, विविध मसाले, जात्या वरील विविध कडधान्यांच्या डाळी, देशी गायीचे तूप, आवळा व उसाचा रस आधी शेतमालाला अधिक मागणी होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प उपसंचालक आत्मा श्रीमती माधुरी सोनवणे  यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी , बीटीएम, एटीएम व हरी बिराजदार यांनी  विशेष मेहनत घेतली.

00000




  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...