Friday, June 8, 2018


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या
गट-क परीक्षेविषयी उमेदवारांना सूचना
नांदेड, दि. 8 :- महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्‍ट्र गट-क (पूर्व) परीक्षा-2018 ही रविवार 10 जून 2018 रोजी नांदेड जिल्ह्यातील 34 शाळा, महाविद्यालय केंद्रात घेण्‍यात येणार आहे. आयोगामार्फत दिलेल्‍या खालील सूचनांचे उमेदवारांनी दक्षता घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  
उमेदवारांनी परीक्षेला येताना प्रवेशपत्र, दोन मुळ ओळखपत्र व त्‍या ओळखपत्राची छायांकीत प्रत  सोबत आणाव. उमेदवारांने ओळखीचा पूरावा (दोन) मूळ स्‍वरुपातीलच सादर करणे आवश्‍यक आहे. मूळ पूराव्‍याच्‍या ऐवजी साक्षांकीत प्रती, कलर झेरॉक्‍स स्‍वीकारण्‍यात येणार नाही. प्रवेश प्रमाणपत्र व्‍यतीरीक्‍त उमेदवाराने ओळखीचा कोणताही मूळ पुरावा सादर न केल्‍यास संबंधित उमेदवाराला परीक्षेस प्रवेश नाकारण्‍यात येईल. परीक्षा कक्षात भ्रमणध्‍वनी, क्‍यॅल्‍क्‍युलेटर, ब्‍ल्‍युटूथ इ. इलेक्‍ट्रानिक साहित्‍याचा वापर करु नये. परीक्षेत कॉपी / गैरप्रकाराचा प्रयत्‍न करणा-या उमेदवारांवर फौजदारी स्‍वरूपाचे गुन्‍हे दाखल करण्‍याच्‍या आयोगाच्‍या सूचना आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचारी यांचेकडून तपासणी करण्‍यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्‍या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक / भरारी पथकाची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. जिल्‍हा प्रशासनामार्फत पोलीस बंदोबस्‍त व कलम 144 प्रतिबंधात्‍म आदेश लागू करण्‍यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
00000


शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत
संलग्नतेबाबत ऑनलाईन प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 8 :- शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत संलग्नतेबाबत नवीन ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी कळविले आहे.
शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमास राज्य शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे अशा संस्थांच्या अभ्यासक्रमास संलग्नता प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा http://ncvtmis.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती पुस्तिका डीजीटी नवी दिल्ली यांचे https://ncvtmis.gov.in www.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. संलग्नीकरणासाठी आकारण्यात येणारे शुल्क निश्चित झाले नसून इच्छूक संस्थांनी अर्ज करताना शुन्य रक्कम टाकून भरावा तसेच संलग्नतेबाबत अडचण आल्यास त्या प्रादेशिक कार्यालयास कळवाव्यात, असे आवाहन प्राचार्य यांनी केले आहे.   राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत संलग्नतेबाबत डीजीटी नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये यापुढील प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. यापुढे संलग्नीकरणाची प्रक्रिया ही राज्य शासनाद्वारे राबविण्याचे धोरण डीजीटी नवी दिल्ली यांनी निश्चित केले आहे. डीजीटी यांनी संलग्नीकरणासाठी वेब पोर्टल सुरु केले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 8 :- शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून काही कारणाने अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत सहभागाची मुदत आता 15 जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
राज्यातील थकित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत ऐतिहासिक व पारदर्शक कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतु 2008 आणि 2009 च्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. तसेच 2001 ते 2016 या कालावधीत इमूपालन, शेडनेट आणि पॉलिहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काही कारणाने आतापर्यंत अर्ज करता आले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच 30 जून 2018 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
शुक्रवार 15 जून पर्यंत आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांन https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज भरावीत. ही अंतिम संधी असून यानंतर  मुदतवाढ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
-----000-----


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 25.10 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 8 - जिल्ह्यात शुक्रवार 8 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 25.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 401.56 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 96.73 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10.32 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 8 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 38.50 (129.38), मुदखेड- 19.67 (166.00), अर्धापूर- 24.67 (97.34), भोकर- 11.75 (146.00), उमरी- 27.33 (68.99), कंधार- 35.50 (108.67), लोहा- 35.83 (87.82), किनवट- 5.71 (62.27), माहूर- 2.50 (84.00), हदगाव- 31.00 (155.29), हिमायतनगर- 11.33 (170.67), देगलूर- 19.33 (26.99), बिलोली- 44.60 (55.80), धर्माबाद- 49.33 (57.66), नायगाव- 28.80 (83.40), मुखेड- 15.71 (47.42). आज अखेर पावसाची सरासरी 96.73 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1547.70) मिलीमीटर आहे.
00000



एसटी महामंडळ संघटनेच्या संप कालावधीत
खाजगी वाहनातून प्रवास करण्यास मुभा
नांदेड,दि. 8 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार 7 जून 2018 रोजीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी संपाच्या कालावधीत होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहनांमधून प्रवास करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता शासनाने 8 जून 2018 रोजीच्या अधिसूचनेद्वारे संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. प्रस्तावित संप / आंदोलन ज्यावेळी मागे घेतले जाईल त्यावेळेपासून ही अधिसुचना रद्द करण्यात आली असे समजण्यात यावे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...