Friday, September 28, 2018


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 29 सप्टेंबर ते शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
आरटीआय ऑनलाईन प्रणालीचा वापर
नांदेड दि. 28 :- "माहिती अधिकार दिन" हा 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. "माहिती तंत्रज्ञानाचा- माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीत होणारा प्रभाव" या विषयावरील व्याख्यानात सहा. जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अशोक जाजू यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन उपजिल्हाधिकारी  (सामान्य) अनुराधा ढालकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे केले होते.   
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात 12 ऑक्टोंबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे. शासनाने वेळोवळी जाणीवपूर्वक उचलेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमूख झाला आहे. राज्यात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरुन सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
श्री. जाजू यांनी या कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरटीआय ऑनलाईन प्रणालीचा वापर प्रशासनाच्या कारभारात कसा करावा याची माहिती दिली. आरटीआय ऑनलाईन प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही सुविधा         https://rtionline.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती अधिकार अर्ज व अपील दाखल करुन शकतात. तसेच नांदेड जिल्हा संकेतस्थळ www.nanded.gov.in वर माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 अन्वये प्रत्येक कार्यालयनिहाय, सर्व कार्यासन प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची 1 ते 17 मुद्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे. ही माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होऊ शकते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले. यावेळी माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. शेवटी हिमायतनगरचे तहसिलदार डॉ. अशिष बिरादार यांनी आभार मानले.  कार्यक्रमास प्रथम अपिलीय अधिकारी, जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी व आरटीआय ऑनलाईन संकेतस्थळाचे कामकाज हातळणारे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.  
00000


29 सप्टेंबर शौर्य दिनानिमित्त
आजी-माजी सैनिकांचा बचत भवन येथे सत्कार
नांदेड, दि. 28 : - भारतीय सैनिकांचा सन्मान आणि सत्कार या भावनेतून शौर्य दिनाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शनिवार 29 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 वा. करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला एनसीसीचे कंमाडींग अधिकारी कर्नल विकासराय शांडील्स, मेजर बिक्रमसिंग थापा, ईसीएचएस अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यातून आपल्याला सैनिकांप्रती असलेली भावना अधिक वृध्दीगंत होण्यास मदत होणार आहे.
29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकदवारे अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे 29 सप्टेंबर हा दिवस भारतवासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत. भारतीय सैनिकांचे काम हे निश्चितच गौरवाचे, कर्तृत्वाचे आणि अभिमानाचे असून यांचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत.
शौर्य दिनाच्या निमित्ताने सैनिकांप्रती आपल्याला असलेली आदराची भावना अधिक वृध्दीगंत व्हावी यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व विरपत्नी, विरमाता, विरपिता, शौर्यपदकधारक आजी / माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातर्फे निमंत्रित करण्यात आले आहे, असे नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...