Friday, September 28, 2018


29 सप्टेंबर शौर्य दिनानिमित्त
आजी-माजी सैनिकांचा बचत भवन येथे सत्कार
नांदेड, दि. 28 : - भारतीय सैनिकांचा सन्मान आणि सत्कार या भावनेतून शौर्य दिनाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शनिवार 29 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 वा. करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला एनसीसीचे कंमाडींग अधिकारी कर्नल विकासराय शांडील्स, मेजर बिक्रमसिंग थापा, ईसीएचएस अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यातून आपल्याला सैनिकांप्रती असलेली भावना अधिक वृध्दीगंत होण्यास मदत होणार आहे.
29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकदवारे अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे 29 सप्टेंबर हा दिवस भारतवासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत. भारतीय सैनिकांचे काम हे निश्चितच गौरवाचे, कर्तृत्वाचे आणि अभिमानाचे असून यांचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत.
शौर्य दिनाच्या निमित्ताने सैनिकांप्रती आपल्याला असलेली आदराची भावना अधिक वृध्दीगंत व्हावी यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व विरपत्नी, विरमाता, विरपिता, शौर्यपदकधारक आजी / माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातर्फे निमंत्रित करण्यात आले आहे, असे नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...