Sunday, February 27, 2022

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 4 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 910 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणी द्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 756 एवढी झाली असून यातील 1 लाख 40 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.  

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 690 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, किनवट 1 तर अँटिजेन तपासणी द्वारे मुखेड येथे 1 असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहे. आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 4 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.  

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 2 असे एकुण 26 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 75 हजार 759

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 56 हजार 71

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 756

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 40

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 690

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 जिल्हा परिषदेत 28 फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 27 :-  नांदेड जिल्हा परिषदेतंर्गत सेवानिवृत्त झालेले शिक्षक व कर्मचारी तसेच आगामी सहा महिन्यात सेवानिवृत्त होणारी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी यांचे निवृत्ती विषयक तक्रारी ऐकून घेऊन, त्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिषदच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात  सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 ते 5 यावेळेत पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  

या पेंशन अदालतीत  संबंधित विभागाचे खातेप्रमुख तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे हे उपस्थित राहून सर्व प्रकारच्या प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेणार आहेत. यावेळी शक्यतोवर त्या-त्या प्रकरणांचे जागेवरच निराकरण केले जाईल. प्रलंबित प्रकरणांमध्ये विभागीय चौकशी, मा. न्यायालयीन प्रकरणे, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन निश्चिती प्रकरणे, वारसा हक्काचे प्रकरणे, तसेच इतर कारणांमुळे प्रलंबित प्रकरणे यांचा प्रामुख्याने आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात येतील. तसेच याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ह्या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. संबंधितांनी पेंशन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले आहे.

00000

 

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.   

सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे येथून विमानाने सकाळी 9.45 वा. श्री गुरु गोबिंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. 

सकाळी 10.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने धनगरवाडी कडे  प्रयाण.सकाळी 10.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृह 200 क्षमतेच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- साईबाबा मंदिरासमोर धनगरवाडी. सकाळी 11 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलाचे बांधकाम भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या परिसरामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय इमारतीच्या बांधकाम भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परिसरामध्ये 100 प्रवेश क्षमता असलेल्या मुलींचे वसतीगृह इमारतीचे बांधकाम भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ उपकेंद्र परिसर नांदेड. 

सकाळी 11.30 वा. बीएससी नर्सींग कॉलेज शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील टप्पा 2 अंतर्गत मुख्य प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील प्रशासकीय व ग्रंथालय इमारतीच्या आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण कामांच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील मुख्य प्रशासकीय इमारत. दुपारी 12.30 वा. पत्रकार परिषद स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील प्रशासकीय इमारत. दुपारी 1 वा. आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट स्थळ- विष्णुपुरी नांदेड. दुपारी 1.30 वा. विष्णुपुरी नांदेड येथून श्री गुरु गोबिंद सिंहजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. श्री गुरु गोबिंद सिंहजी विमानतळ नांदेड येथून विमानाने नाशिक कडे प्रयाण करतील.

000000

 पत्रकार परिष निमंत्रण  

ई-मेल संदेश दिनांक 27 फेब्रुवारी 2022 

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया    

नांदेड जिल्‍हा 

विषय :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्री. अशोक चव्हाण व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. उदय सामंत यांची संयुक्त पत्रकार परिषद. 

महोदय,   

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अशोक चव्हाण व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. उदय सामंत यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता करण्यात आले आहे. ही पत्रकार परिषद डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नवीन मुख्य प्रशासकीय इमारत, विष्णुपुरी नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. 

कृपया आपण अथवा आपले प्रतिनिधी यांना सदर पत्रकार परिषदेस डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नवीन मुख्य प्रशासकीय इमारत, विष्णुपुरी नांदेड येथे सोमवार दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी  दुपारी 12.30 वाजता उपस्थित रहावे, ही विनंती.

 आपला विश्वासू

स्वा/-

(विनोद रापतवार)

जिल्‍हा माहिती अधिकारी, नांदेड  

 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद

नांदेड (जिमाका) दि. 27 :-जिल्ह्यात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे व जिल्हा परिषद सदस्य  गंगाप्रसाद काकडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजवून जिल्हास्तरीय राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रातिनिधीक शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.अमृत चव्हाण, नांदेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण मुंडे,वैद्यकिय अधिकारी डॉ.बालाजी राठोड, तुप्पा येथील सरपंच श्रीमती मंदाकिनी यन्नावार,पंचायत समिती सदस्य श्री सुनिल पवार,माजी सरपंच श्री देवराव टिप्परसे, पोलीस पाटील अजमोद्दिन शेख, तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, औषध निर्माण अधिकारी अविनाश देशमुख, प्रा.आ.केंद्रातील श्रीमती अरुणा बेंडला, श्रीमती मंगल बैनवाड उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2 लक्ष 52 हजार 916 व शहरी भागातील 1 एक 52 हजार 431 असे एकुण 4 लक्ष 5 हजार 347 अपेक्षित लाभार्थींचे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पोलिओची लस पाजवून लसीकरण करण्यात येणार आहे. या करीता जिल्ह्यात ग्रामीण भागातील 2 हजार 236 व शहरी भागातील 534 असे एकुण 02 हजार 770 बूथ स्थापन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 5 हजार 709 व शहरी भागातील 1 हजार 556 असे एकुण 07 हजार 265 इतके मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच बसस्थानके, रेल्वेस्टेशन या ठिकाणी लस उपलब्ध करुन देण्यासाठी 257   ट्राझिंट टिम कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. उसतोड कामगारांच्या व विटभट्टी वरील कामगारांच्या मुलांना लस देण्याकरीता 184 मोबाईल टिम कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. या मोहिमेमध्ये बायोव्हायलंट (bopv) लसीचा वापर करण्यात येणार असून,कोविड-19 उद्रेकाच्या अनुषंगाने नियमित लसीकरणासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जात असून सर्व पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकास पोलिओ लसीचा डोस अवश्य पाजवून घ्यावा असे आवाहन याप्रसंगी माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केले आहे. 

मोहिमेच्या दिवशी पोलिओच्या लसीपासून वंचित राहीलेल्या बालकांसाठी ग्रामीण भागात 3 दिवस आणि शहरी भागात 5 दिवस घर भेटीव्दारे (आय.पी.पी.आय.) पोलिओ लस पाजविण्यात येणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, माताबाल संगोपन अधिकारी डॉ.शिवशक्ती पवार, साथरोग अधिकारी डॉ.अनिल रुईकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी व सर्व संवर्गातील आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले असून  सन 1995 पासून पोलिओ लसीकरण मोहिम संपुर्ण देशात राबविण्यात येत आहे. देशात 13 जानेवारी 2011 नंतर एकही पोलिओचा रुग्ण आढळला नाही. 7 मार्च 2014 मध्ये आपल्या देशास पोलिओ निर्मुलन झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

00000



 पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते औजारे बँकचे लोकार्पण 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- स्वातंत्र्याच्या आमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी गट, महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या 75 औजारे बँकांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी रहाटी येथील महालक्ष्मी महिला शेतकरी बचतगट यांना ट्रॅक्टरची चावी देवून 75 औजारे बँकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मुखेड तालुक्यातील होनवडज शेतकरी गटालाही ट्रॅक्टरची चावी देण्यात आली. 

पालममंत्री अशोक चव्हाण यांनी नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प व मानव विकास मिशन या योजनेतून  यावर्षात कृषि विभागाकडून 75 औजारे बँक स्थापन करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभागाने 75 औजारे बँक वाटप केले. ज्यात ट्रक्टर, ट्रॉलरी, बीबीएफ पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, मळणी यंत्र, नांगर आदी औजारांचा समावेश आहे. एका औजारे बँकेची किंमत 20 लाख रुपये असून मानव विकास मिशन मधुन 75 टक्के अनुदानावर 10 महिला शेतकरी गटांना औजारे बँक देण्यात आली. तसेच 65 औजारे बँक नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प या योजनेतून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 25 नवीन औजारे बँकांना मंजूरी देण्यात आली. 

या सोहळ्यास आमदार अमर राजुरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ.  सुनिल लहाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, देगलूरचे उपविभागीय कृषि अधिकारी एस. बी. शितोळे, कृषि अधिकारी प्रकाश पाटील, सतिश सावंत, मनोज लांबडे, बालाजी बच्चेवार तसेच कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी व महिला शेतकरी उपस्थित होते.

0000



 नांदेड येथे भव्य मध्यवर्ती ग्रंथालय निर्मितीचा मानस

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

· भाग्यनगर येथील कै. नरहर कुरुंदकर यांच्या पुतळा सुशोभीकरण व म्युरलचे लोकार्पण 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- मराठी साहित्याच्या प्रांतात नरहर कुरुंदकर यांचे एक वेगळे स्थान आहे. विचारवंत म्हणूनही त्यांनी जी सडेतोड मांडणी केली आणि परखड विचार ठेवले त्याला तोड नाही. त्यांचा विचार, त्यांचे लिखाण, त्यांची प्रेरणा नव्या पिढी पर्यंत पोहोचावी यासाठी माझी कटिबद्धता सुरूवातीपासून आहे. मराठवाड्याच्या साहित्य प्रांतातील गोदावरीच्या काठाने दिलेले योगदान लक्षात घेऊन नांदेड येथे सर्व साहित्यांची ज्ञानसंपदा जतन व्हावी, वाचकांपर्यंत ही ग्रंथसंपदा पोहोचावी, वाचन संस्कृती वाढावी यादृष्टिने नांदेड येथे चांगल्या प्रकारचे मध्यवर्ती ग्रंथालय व्हावे हा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत कै. नरहर कुरुंदकर यांच्या भाग्यनगर येथील पुतळा परिसर सुशोभीकरण व म्युरलच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा अ.भा.नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, दै. प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, शामलताई पत्की, अपर्णा नेरलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

इतर महानगराच्या तुलनेत आपलेही महानगर अधिक सुविधा पूर्ण व्हावे यासाठी मी दक्ष आहे. यासाठी आपण विविध विकास कामे नियोजित करून बहुतांश कामांना मंजूरीही दिली आहे. राज्यातील महानगरांच्या तुलनेत नांदेड हे महानगर शिक्षण, कला, संस्कृती या सर्व बाजुने अधिक सुविधा पूर्ण असेल याचा आग्रह मी धरला असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या स्थानिक संस्था आहेत त्याही प्रयत्नांची शर्थ करत आहेत. मनपाही नांदेड महानगराच्या वाढत्या गरजांना पूर्ण करण्याच्यादृष्टिने अधिक सजग असल्याचे त्यांनी सांगितले.मी मुख्यमंत्री असतांना कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकासाठी दोन ते अडीच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता. याला पुढे शासन पातळीवर पाठपुरावा करणे आवश्यक होते. हे स्मारक चांगले व्हावे यासाठी मी प्रयत्नशील असून शासनस्तरावर योग्य तो निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.   

सन 1962 नंतर भाग्यनगर उदयास आले. तत्पूर्वी नांदेड मधील सर्व बुद्धीवादी मंडळी होळी पासून भाग्यनगरला स्थिरावल्याने हे एक बुद्धीमंडळीचे केंद्र झाले. कुरुंदकर गुरुजी यांनी केवळ भाग्यनगरलाच नव्हे तर बुद्धीवादी व विचारवंताचा गौरव मराठी सारस्वताला दिल्याचे प्रतिपादन प्रा. दत्ता भगत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कुरुंदकर हे विचारवंत म्हणून वेगळे होते. हा वेगळेपणा त्यांनी आपल्या समाज केंद्रीय विचारातून आणि वर्तमानाशी सुसंगत विचारधारेतून पुढे नेला. त्यांनी आपल्या पुस्तकांना भजन, यात्रा, शिवरात्र जागर अशी नावे का दिली असावीत याचा जेंव्हा आपण विचार करतो तेंव्हा त्यांच्या विचारातील वेगळेपण आपल्या लक्षात येते. परीवर्तनासाठी आवश्यक असलेला एकच मुद्दा जेंव्हा वारंवार सांगावा लागतो त्या प्रक्रियेला भजन म्हणून, याची तुलना भजन म्हणून असल्याने त्यांनी भजन नाव दिले असावे, असे प्रा. दत्ता भगत यांनी सांगितले. 

दिनांक 14 जुलै ही श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांची जन्म तारीख आहे तर 15 जुलै ही नरहर कुरुंदकर यांची जन्म तिथी आहे. त्यांचा स्वर्गवासही एकाच महिन्यातला आहे. हा निव्वळ योगा-योग असून आज मराठी भाषा दिनानिमित्त कै. नरहर कुरुंदकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व म्युरलचे लोकार्पण होत असल्याचा अधिक आनंद झाल्याचे प्रतिपादन आमदार अमर राजूरकर यांनी केले. नांदेड महानगरात होत असलेल्या विविध विकास कामांचा गौरवपूर्ण उल्लेख करून नांदेड महानगराच्या, कुरुंदकरांच्या कार्याला, योगदानाला आणि साहित्याला साजेसे हे कार्य असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले. यावेळी शामलताई पत्की यांनी मनोगत व्यक्त करून स्व. शंकरराव चव्हाण व कै. नरहर कुरुंदकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. शंकरराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा पुढे नेणारे तेवढेच समृद्ध नेतृत्व अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातून मिळाल्याने आम्ही नांदेडकर भाग्यवान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख शामलताई यांनी केला. इथला नेतृत्वातील प्रगल्भतेबद्दल त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर्णा नेरलकर यांनी केले.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...