Thursday, October 13, 2022

 राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात

- शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर


नांदेड (जिमाका) दि. 13 :- राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांनी याची नोंद घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS २०२१-२२) चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने परिक्षा परिषदेच्या www.mscepune.in व nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत नियमित शुल्कासह भरता येतील. तसेच 1 ते 5 नोव्हेंबर 2022 या कालवधीत विलंब शुल्क तर 6 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत शाळा संस्थेच्या जबाबदारीवर अतिविलंब शुल्कासह अर्ज भरता येतील. आवेदनपत्र भरण्यासंबधीच्या सूचना परिक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

000000

 13 ते 19 वयोगटातील मुलींच्या

पोषणावर अधिक लक्ष देण्याची गरज

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

·  किनवट येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचे निर्देश 

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यातील किनवट, माहूर व आजुबाजुच्या आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न अधिक महत्वाचे आहेत. यात प्रामुख्याने वय वर्षे 13 ते 19 या वयोगटातील मुलींच्या आरोग्यावर, त्यांच्या पोषणावर अधिक लक्ष दिल्यास त्यांना सुदृढ व निरोगी होण्यास वेळ लागणार नाही. याच मुली भविष्यात आपल्या सुदृढ बाळाला जन्म देऊन कुपोषणाचे आव्हान परतून लावतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.

 

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या व आरोग्य विषयक योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

 

राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यातील कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण अत्यल्प जरी असले तरी महिलांच्या आरोग्याचा विशेषत: मुलींच्या कुपोषणाचा सातत्याने लक्ष द्यावा लागणारा प्रश्न आहे. 13 ते 19 या वयोगटातील मुलींमध्ये असलेला अशक्तपणा हा नजरेआड करता येणार नाही. सद्यस्थितीत कुपोषीत माता व बालकांसाठी जिल्ह्यात एकच पोषण पुनर्वसन केंद्र आहे. आदिवासी भागासाठी याच धर्तीवर किनवट येथे नवीन पोषण पुनर्वसन केंद्र चालू करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. प्राथमिक स्तरावर या विषयाला प्राधान्याने किनवट, माहूर या दोन तालुक्यावर लक्ष केंद्रित करून टप्याटप्याने संपूर्ण जिल्हाभर त्याचा विस्तार करू असेही त्यांनी सांगितले.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी या बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गाभा समिती, लसीकरण, कोविड लसीकरण, क्लायमेट चेंज व इतर अनुषांगिक आरोग्याच्या योजनांबाबत माहिती सादर केली.

0000 





 आपत्‍ती व आणिबाणीच्‍या वेळी करण्यात

येणाऱ्या उपाययोजनाची रंगीत तालिम

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जागतिक स्‍तरावर प्रतिवर्ष 13 ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक आपत्‍ती धोके न्‍युनिकरण दिन म्‍हणुन साजरा करण्‍यात येतो. या औचित्‍याने जिल्‍हाधिकारी कार्यालयातील मुख्‍य इमारत व परिसरात विविध आपत्‍तींना वेळेवर प्रतिसाद देणे, समय सुचकतेनसार सज्‍ज राहणे या अनुषंगाने अधिकारीकर्मचारी आणि नागरीक यांना विविध आपत्‍तीच्‍या वेळी उपयोगात येणाऱ्या महत्‍वपुर्ण साहीत्‍यांची ओळख  आणि त्‍यांचा आणिबाणीच्‍या वेळी योग्‍य पध्‍दतीने वापर करण्‍याची रंगीत तालिम आज आयोजित करण्‍यात आली होती.

 

यावेळी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्‍हाधिकारी प्रदीप कुलकर्णीउपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरीश्रीमती संतोषी देवकुळेश्रीमती दिपाली मोतियेळेतहसीलदार विजय अवधानेश्रीमती ज्‍योती चौहान नायब तहसीलदार मकरंद दिवाकरजया अन्‍नमवारजिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी  किशोर अशोकराव कुऱ्हेविधी अधिकारी अॅड. माळाकोळीकर यांची उपस्थिती होती.

 

यावेळी अग्निशमन अधिकारी  शेख रईस पाशा हमिदोदीन यांनी विविध शोध व बचाव कार्य साहीत्‍य यांची उपस्थितांना ओळख करुन दिली. आग लागण्‍याचे मुख्‍य तीन कारण ज्‍वलनशिल पदार्थप्राणवायु आणि उष्‍णता हे आहेत. यातील एखादयाला ही जर आगीच्‍या ठिकाणातुन दुर केल्‍यास आग तात्‍काळ आटोक्‍यात येते हे त्‍यांनी प्रात्‍याक्षिक करुन दाखविले. एलपीजी गॅस सिलेंडर हा प्रत्येक घरा- घरातला अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने घरातील गॅस सिलेंडरच्या लिकेजबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. वेळीच लक्ष न दिल्यास होणारा अपघात भीषण प्रकारे जीवावर बेतू शकतो. अचानक घरातील एलपीजी गॅस सिलेंडरला आग लागल्‍यास त्‍या आगीला प्रभावीपणे कसे आटोक्‍यात आणावे  याचे प्रात्‍यक्षिक शेख रईस पाशा यांनी उपस्थितांना करुन दाखविले. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

0000




 जिल्हा नियोजन समितीची बैठक अपरिहार्य कारणामुळे तूर्त रद्द 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे ग्रामविकास व पंचायतीराजवैद्यकीय शिक्षणक्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार 14 ऑक्टोबर 2022 रोजी नियोजन भवन येथे आयोजित करण्यात करण्यात आली होती. ही बैठक काही अपरिहार्य कारणांमुळे तूर्त रद्द करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

00000

 सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड (जिमाका) दि. 13 :-  माजी सैनिक, विधवा व इतर नागरिकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सन 2022-23 साठी सुरु झाली आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवा यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानी  केले आहे. 

 

सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते.  प्रवेश  सैनिक/ माजी सैनिकांच्या तसेच इतर नागरिक पाल्यांना सुध्दा उपलब्ध आहेत.  प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरीनांदेड येथे विक्रीस उपलब्ध आहेत. अधिक माहीतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.

0000 

 प्रवासी वाहतूक मोटार वाहन कायद्यातील तरतुदी नुसारच ;

अन्यथा दंडात्मक कारवाई

- प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- खाजगी बसेसद्वारे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली असून गेल्या पाच दिवसात 31 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालन हे सर्वच वाहन चालकांकडून अपेक्षित आहे. यात जर कोणी दोषी आढळला तर त्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी दिला.

 

सर्व खाजगी बस वाहन धारकांना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसारच प्रवासी वाहतुक करण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रवाशांनीही अधिकृत प्रवासी वाहनातून प्रवास केला पाहिजे. विना परवाना वाहतुक, टप्पा वाहतुक, अवैध माल वाहतुक, योग्यता प्रमाणपत्र नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर बदल करणे हे परिवहन कायद्यात मोडत नाही. याचबरोबर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतुक करणे, अग्निक्षमन यंत्रणा नसणे, आपतकालीन दरवाजा नसणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. अशा वाहनांविरुध्द कारवाई करण्यात येईल, याची नोंद खाजगी बस वाहन धारकांनी घ्यावी असे  प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

00000

 आधारभूत किंमत खरेदी योजनेत

ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान/भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.  ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शुक्रवार 21 ऑक्टोबर 2022  पर्यत मुदतवाढ दिलेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

नोंदणीसाठी चालू हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड प्रत तसेच, शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावा, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅटीन सुविधा 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- नांदेड, परभणी व हिंगोली  या तिन्ही जिल्हयातील माजी सैनिक व  त्यांच्या अवलंबितासाठी नांदेडला सीएसडी  कॅटीन सुरु करण्यात येणार आहे. यासाठी स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पीपीओ व ओळखपत्राची प्रत जमा करण्याबाबत एक महिण्यापुर्वी कळविले होते.  ज्या माजी सैनिकांनी अदयापपर्यत वरील कागदपत्रे जमा केली नाही त्यांनी गुरुवार 20 ऑक्टोबर 2022 पर्यत  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावी.  अन्यथा त्यांना सीएसडी  कॅटीनची सुविधा घेता येणार नाही,  असे  सैनिक कल्याण अधिकारी  महेश वडदकर  यांनी  कळविले आहे.

00000

 उपकर योजनेत कृषी साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्हा परिषद उपकर योजना 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर डीबीटी व कॅशलेस पध्दतीचा अवलंब करुन बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3 एच.पी/5 एच.पी.ओपनवेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर), ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर, धान्य प्रतवारी करण्यासाठी स्पायरल सेपरेटर, सोयाबीन प्लँटर, फुलशेती लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देणे आहे. जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांनी या औजाराचा/कृषी साहित्यांचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी साखर  नियतन 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2022 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन मंजूर केले आहे. 


या तीन महिन्यासाठी शासनाकडून 2 हजार 138 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. पुढीलप्रमाणे तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. यात नांदेड तालुक्यासाठी 235 , अर्धापूर 22.50, मुदखेड 27, कंधार 95.50, लोहा 52, भोकर 98, उमरी 67, देगलूर 134.50, बिलोली 114.50, नायगाव 40, धर्माबाद 74.50, मुखेड 202, किनवट 467.50, माहुर 207, हदगाव 203, हिमायतनगर 98  एकूण 2 हजार 138  नियतन साखर नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. 

सर्व अंत्योदय लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून वरील तीन महिण्याच्या साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...