Friday, December 9, 2022

 समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण


पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ

मुख्यमंत्र्यांनी घेतला लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा

समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. 

दरम्यान, काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर हे यावेळी उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, महामेट्रोचे ब्रिजेश दिक्षित आदी यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल असे सांगत  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत असून  आपल्या राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्य सचिवांनी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होणार असून त्यानंतर खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज १ चे उद्घाटन, वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणे, मिहान एम्सचे लोकार्पण त्यानंतर वायफळ टोल नाका येथून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.  झीरो माईल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास देखील करणार आहेत. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सर्वश्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, हरदीप पुरी,  केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी यावेळी होणाऱ्या विविध उपक्रमांचे कोनशिला अनावरण आदी बाबत नागपूर जिल्हा प्रशासन, एमएसआरडीसी, मेट्रो यांच्या मार्फत करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.

समृद्धी महामार्गाविषयी:
नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा महत्वाचा प्रकल्प म्हणुन अधिसुचित करण्यात आला आहे.

 सदर महामार्गास दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजीच्या शासननिर्णयाव्दारे "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" असे नाव देण्यात आले आहे.

• पुर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे. 

• सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८८६१.०२ हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी + इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे.

• सदर प्रकल्प १६ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प माहे जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

• प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकुण ८४ बांधकामे प्रस्तावित होती तथापि गरजेनुसार हि बांधकामे १०० पर्यंत वाढविण्यात आली आहेत, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. 

सद्यस्थितीत १ ते ११ (शिर्डी पर्यंत) पॅकेजेसचे काम पुर्ण झाले आहे.
पहिला टप्पा म्हणून, नागपूर ते शिर्डी ७०१ किमी पैकी ५२० किमी लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

०००००



 नांदेड जिल्ह्यातील युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जिल्हाप्रशासनाचा पुढाकार

▪️मुलाखतीत सरस ठरण्यासाठी जिल्ह्यासंदर्भात विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण
नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यातील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी पूर्ण करून यशाच्या शिखरापर्यंत पोहचले आहेत. केवळ जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून नव्हे तर या जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा लक्षात घेऊन इथे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी युपीएससी सारखी मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखातीच्या तयारीत आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांनी संपर्क साधून जिल्ह्यातील सामाजिक, ऐतिहासिक व विकासाचा आलेख कसा जाणून घेता येईल याची विचारणा केली. त्यांच्या प्रयत्नांना यश यावे यादृष्टिने लवकरच अशा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य माध्यमाद्वारे मार्गदर्शन सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यातील त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या उपलब्ध वेळेनुसार त्यांचाही सहभाग यात करून घेण्यात येईल. याचबरोबर जिल्ह्यात नवनियुक्त झालेले आयएएस व आयपीएस अधिकारी, इतर अधिकारी हेही या उपक्रमात योगदान देतील. झुम व इतर माध्यमाद्वारे या विद्यार्थ्यांना निश्चित तारीख ठरवून दिलेल्या वेळेवर हा उपक्रम कृतज्ञतेपोटी सुरू करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. या विद्यार्थ्यांना आपली परीपूर्ण माहिती ज्यात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा परीक्षा क्रमांक व इतर माहिती collectornanded1@gmail.com यावर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
00000

 सुधारित वृत्त

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  लागू 

नांदेड (जिमाका) दि. 9  :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 24 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

 जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 10 डिसेंबर 2022  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 24 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अत्यंयात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 क्षेत्रिय महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्‍न 

 

नांदेड (जिमाका) दि. 9  :- महसूल जमीन महसूल अधिनियम 1966 मधील  विविध कलमांमध्‍ये  नवीन सुधारणा झालेल्‍या आहेत. या सुधारणांची क्षेत्रिय स्‍तरावरील  महसूल अधिकारी व कर्मचारी यांना परिपूर्ण  माहिती असणे आवश्‍यक आहे. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील विविध तरतुदींची तसेच शासनाच्‍या  विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यासाठी  कार्यरत महसूल अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षीत असणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने जिल्‍हाधिकरी अभिजीत राऊत व अपर जिल्‍हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्या संकल्पनेतुन  8 डिसेंबर 2022 रोजी नियोजन भवन नांदेड येथे क्षेत्रिय महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले  होते.

 

महसूल अधिकारी / कर्मचारी  यांना कायदयाचे सखोल ज्ञान, माहिती  असेल  तर कायदयाची प्रभावी पणे अंमलबजावणी करणे सोपे होते. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 42 मध्‍ये 42 अ, 42 ब, 42 क, 42 ड  नव्‍याने समाविष्‍ट करण्‍यात आलेले आहेत.  तसेच  या नियमान्‍वये केलेल्‍या सुधारणा Ease of Doing Business व शासनाच्‍या उत्‍पन्‍नाच्‍या अनुषंगाने महत्‍वाचे असल्‍याने नियमाची तात्‍काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्‍यक असल्याने हे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले  होते.

 

या प्रशिक्षणात  उपविभागीय अधिकारी धर्माबाद राजेंद्र शेळके यांनी महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम  42-ब, 42-क व 42-ड  मधील तरतुदीची परिपूर्ण माहिती दिली. बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी  पोटखराब क्षेत्र लागवडी योग्‍य क्षेत्रात  आणणे बाबतची कार्यपध्‍दती, संगणकीकृत सातबारा वरील कालबाहय नोंदी कमी करणे.  तसेच अकृषिक  सातबारा वेगळा करणे बाबतची पध्‍दती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी  डिजिटल  इंडिया  भूमि अभिलेख  आधुनिकीकरण  कार्यक्रम व (DILRMP) व ई-चावडी याविषयी  उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

अपर जिल्‍हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी  वर्ग- 2 जमीनीचे व्‍यवस्‍थापन (इनाम, अतियात, कुळ, सिलींग जमीन ) इत्‍यादी बाबतच्‍या कायदयाची  सविस्‍तर माहिती दिली. उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरी यांनी  महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने बाबतचे सविस्‍तर प्रशिक्षण दिले.

 

जिल्‍हा अधिक्षक भूमी अभिलेख श्रीमती सुरेखा सेठीया यांनी  नगर भूमापन झालेल्‍या भागातील दुहेरी नोंद पध्‍दत बंद करणे बाबतचे सादरीकरण सादर करुन उपस्थितांना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्‍या मनोगतात प्रशिक्षणाचे महत्‍व विषद करुन  शासनाच्‍या योजनांची परिपूर्ण माहिती कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना असली पाहिजे. जेणेकरुन  सदर योजना शेवटच्‍या घटकापर्यंत प्रभावीपणे राबविणे सोपे होते. अधिकारी, कर्मचारी यांनी विकासात्‍मक दृष्टिकोन बाळगुन जनतेचे विविध  प्रश्‍न, अडचणी सोडविण्‍याचा प्रयत्‍न करावा. कार्यालयीन कामकाज शिस्‍तबध्‍द व चाकोरीने करावे.  कार्यालयीन कामकाजात सुलभता असावी.  कार्यालय नेहमी स्‍वच्छ असावे  अशी अपेक्षा व्‍यक्‍ती केली.

 

या प्रशिक्षणास  सहायक जिल्‍हाधिकारी किनवट नेहा भोसलेअपर जिल्‍हाधिकारी पी. एस. बोरगावकर, जिल्‍हा अधिक्षक भूमी अभिलेख श्रीमती सुरेखा सेठीया, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,  उप‍ अधिक्षक भूमी अभिलेख, नायब तहसिलदार,  मंडळाधिकारी,  अव्‍वल कारकुन, महसूल सहायक तलाठी इत्‍यादी  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हे प्रशिक्षण यशस्‍वी होणेसाठी  अपर जिल्‍हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्‍हाधिकारी लतिफ पठाण, तहसिलदार (महसूल)  विजय अवधाने, अव्‍वल कारकुन गोपाळ धसकनवार यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, आभार अव्‍वल कारकुन प्रसाद शिरपुरकर यांनी मानले.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...