Friday, November 2, 2018


नगरपरिषदा / नगरपंचायतींसाठी
9 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि. 1 (रानिआ) : नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) आणि शेंदुर्णी (जळगाव) या नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान; तर 10 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यातील मौदा आणि शेंदुर्णी या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरिषदा आहेत. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 नोव्हेंबर 2018 या कालावधीत भरता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 नोव्हेंबर 2018 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 29 नोव्हेंबर 2018 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
0-0-0


अन्न पदार्थांची दक्षता घ्यावी
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न पदार्थ, मिठाई मिळावी म्हणून अन्न व औषध प्रशासनाने दिवाळी निमित्त मोहिम हाती घेतली आहे. अन्न पदार्थांच्या भेसळीबाबत खात्रीशीर माहिती नागरिकांनी नि:शुल्क टोल क्रमांक 1800 222 365 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन नांदेड अन्न व औषध प्रशासनाचे पदावधित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) यांनी केले आहे.
नांदेड शहर व जिल्ह्यातील अन्न व्यावसाईक आस्थापनाची तपासणी करण्यात येत असून अन्न व्यावसायिकांनी दुषित, अस्वच्छ जागी ठेवलेले खराब अन्न पदार्थ ग्राहकांना विक्री करु नये. मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विशिष्ट नियंत्रीत तापमाणात ठेवावीत. खाद्यरंग प्रमाणापेक्षा जास्त वापरु नये. तसेच अन्न पदार्थ जाकुण ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
            अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी खाद्यतेल उत्पादकांची तपासणी केली असून चांगले खाद्यतेल उत्पादकाने ग्राहकाला विक्री करण्याबाबत सुचित केले आहे. तसेच मिठाई, खाद्यतेल, आटा, रवा, मैदा, दुधाचे नमुणे घेण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या अन्न पदार्थाच्या तपासणी अहवालाची पूर्ण कार्यवाही घेण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
00000


तलाठी संवर्गातून 10 जणांची
मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती
नांदेड, दि. 2 :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनावरील दहा तलाठ्यांना खुल्या प्रवर्गातील रिक्त पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे.  तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
खुल्या प्रवर्गात पदोन्नती देण्यात आलेल्या तलाठ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तानाजी विठ्ठल डावरगावे, स. मुर्तजा रसुलसाब, उदयकुमार लक्ष्मण मिसाळे, स. युसुफ स. खाजामिया, विजय अमृतराव जाधव, शेषराव आनंदराव शिंदे, मो. सलिम मो. नवाज, व्यंकट लक्ष्मण मक्तेदार, अनिल शंकर कांबळे, लक्ष्मीकांत शंकरराव लाठकर या दहा तलाठ्यांना मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
   


महाडिबीटी पोर्टल प्रणालीद्वारे
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी प्रशिक्षण
नांदेड, दि. 2 :- महाडिबीटी पोर्टल प्रणालीद्वारे भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा शनिवार 3 नोव्हेंबर रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात दुपारी 3 वा आयोजित केली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, लिपीक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनाने डीबीटी पोर्टल नव्याने सुरु केले असून https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे.  या पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे, महाविद्यालय लॉगीनमधून अर्जाची छाननी करुन पात्र अर्ज कार्यालयाच्या लॉगीनमध्ये फॉरवर्ड करणे, महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे आदी माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणीची जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाची राहील, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

लेख -

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
                                      
 अनिल आलुरकर
                                                                                जिल्हा माहिती अधिकारी,  
                                                                                   नांदेड


फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करूण देणे शासनास शक्य होणार आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यभूत ठरणार आहे. शासन निर्णयानुसार राज्यात सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही नवीन राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेविषयीची ही माहिती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय दि. 20 जून 2018 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पिक पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करूण देणे शासनास शक्य होणार आहे. तसेच, ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यभूत ठरणार आहे. त्याचप्रमाणे, फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल आणि ऋतू बदलाची दाहकता तीव्रता सौम्य करण्यास देखील मदत होणार आहे. शासन निर्णयानुसार राज्यात सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही नवीन राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे.


योजनेचे उद्दिष्ट :
या योजनेच्या माध्यमातून पीक पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे.
योजनेत समाविष्ट पिके
आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर.

नाविन्यपूर्ण बाबी
फक्त कलमांद्वारे लागवड (अपवाद नारळ रोपे)
घन लागवडीचा समावेश
ठिबक सिंचन अनिवार्य
शेतकऱ्यांचा सहभाग

समाविष्ट बाबी
शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे - जमीन तयार करणे, खत मिश्रणाने खड्डे भरणे, कुंपण करणे, खते देणे, आंतर मशागत करणे.
शासन अर्थसहाय्यित बाबी / कामे - खड्डे खोदणे, कलमे/रोपे लागवड, नांग्या भरणे, ठिबक सिंचन करणे, पीक संरक्षण.
अटी शर्ती
या योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय राहणार नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या लाभार्थी व्यतिरीक्त इतर लाभार्थींना या योजनेतून लाभ घेता येईल.
यासाठी शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे किमान 20 गुंठे शेत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे 7/12 असावा. जर लाभार्थी उताऱ्यावर संयुक्तपणे खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास, 7/12 वर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक असून लाभार्थ्याच्या 7/12 वर नोंदणी बंधनकारक आहे.
महाराष्ट्रात कमाल सहा हेक्टर पर्यंत लाभ अनुज्ञेय राहील. सदर कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एका पेक्षा जास्त फळ पिके लागवडीकरिता देखील पात्र राहील. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ यापूर्वी घेतला असल्यास लाभ क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड करताना ज्यांची उपजीविका पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. तसेच, अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल.
लाभार्थी निवड कार्यवाही
इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करावा. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची तालुकानिहाय सोडत पद्धतीने निवड उपविभागीय कृषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी संयुक्तपणे करतील. लक्षांकाप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या मार्फत पुन्हा जाहिरात देण्यात येईल.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी  ही योजना फायदेशीर ठरणार आहे. यात शंका नाही.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...