Friday, October 7, 2016

जलयुक्त शिवार अभियानात

उत्कृष्ट योगदानासाठी  जिल्हा, तालुका, गावांना पुरस्कार

नांदेड , दि. 7 :- जलसंधारणाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा, तालुका, गावांना तसेच वैयक्तिक व सामुदायीक (अशासकीय संस्था) यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीकडे अर्ज करावे लागणार आहेत.
पुरस्काराचे स्वरुप व विहित नमुन्यात अर्ज पाठविण्याची तारीख पुढील प्रमाणे आहे. महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार या राज्यस्तर पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2017 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
हा पुरस्कार राज्यातील 3 गावांना देण्यात येणार असून याचे स्वरुप प्रथम 25 लाख रुपये, द्वितीय 15 लाख रुपये व तृतीय 7.5 लाख रुपये आहे. तसेच 3 तालुक्यांसाठी प्रथम पुरस्कार 35 लाख रुपये, द्वितीय 20 लाख रुपये व तृतीय 10 लाख रुपये तर 3 जिल्ह्यांसाठी प्रथम पुरस्कार 50 लाख रुपये, द्वितीय 30 लाख रुपये व तृतीय 15 लाख रुपये. तर राज्यस्तरावर वैयक्तिक एक पुरस्कारासाठी (व्यक्ती / शेतकरी ) प्रथम क्रमांक 50 हजार रुपये द्वितीय क्रमांक 30 हजार रुपये आणि सामुदायीक (अशासकीय संस्था) प्रथम क्रमांक 1 लाख 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये एक पुरस्कार देण्यात येणार आहे.
विभागीय स्तरावरील राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कारासाठी दि. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. हा पुरस्कार विभागातील 2 जिल्ह्यांना देण्यात येणार असून प्रथम क्रमांक 15 लाख रुपये, द्वितीय 10 लाख रुपये. दोन तालुक्यांसाठी प्रथम क्रमांक 10 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 7.5 लाख रुपये तर दोन गावांसाठी प्रथम क्रमांक 7.5 लाख रुपये व द्वितीय क्रमांक 5 लाख रुपये असे विभागीय स्तरावरील पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिल्हा स्तरावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारासाठी दि. 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. हा पुरस्कार जिल्ह्यातील दोन तालुक्यांना देण्यात येणार असून प्रथम क्रमांक  5 लाख रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक 3 लाख रुपये. जिल्ह्यातील पाच गावांसाठी प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75 हजार रुपये, तृतीय क्रमांक 50 हजार रुपये, चौथा क्रमांक 30 हजार रुपये (उत्तेजनार्थ), पाचवा क्रमांक 20 हजार रुपये (उत्तेजनार्थ) असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. मफुअ-2013/प्र.क्र.37/जल-8 दि. 28.9.2016 हा शासन निर्णय पाहावा.

00000

जलयुक्त शिवार अभियानाबाबत

पत्रकारांसाठी पुरस्कार योजना

नांदेड , दि. 7 :-  उत्कृष्ट लिखाणाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. यानुसार जलयुक्त शिवार अभियानात लिखाण केलेल्या पत्रकारांनी आपले प्रस्ताव 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात सादर करावेत.
जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करणे, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यास योगदान देणारे पत्रकार पुरस्कारांसाठी पात्र राहणार आहे. मुद्रीत पत्रकार व इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असे गट आहेत. पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर तर इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावांनी पुरस्कार दिले जाणार आहेत. पत्रकारांसाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 35 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 25 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे.
विभागस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 30 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 20 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 15 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे.
जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 12 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 10 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे.
तसेच इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 71 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 51 हजार रुपये व स्मृतीचिन्ह अशी आहे. पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील दैनिके, साप्ताहिके व पाक्षिकातील लिखाणाचा विचार केला जाईल. यासाठी 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीतील लिखाणाचा विचार केला जाईल. इलेक्ट्रॉनिक मिडीयासाठी मराठी भाषेतील वृत्तकथेचा विचार करण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ग्राम विकास व जलसंधारण विभागाचा मफुअ-2013/प्र.क्र.37/जल-8, दि. 28 सप्टेंबर 2016 हा शासन निर्णय पाहावा.

0000000

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखती

नांदेड , दि. 7 :-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे शिल्प कारागीर योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे शिल्पनिदेशकांचे पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात निव्वळ तासिका तत्वावर तत्वाभ्यास (थेअरी) व प्रात्यक्षिक शिकवण्यासाठी भरावयाची आहेत. इच्छूक व पात्र उमेदवारांनी बुधवार 19 ऑक्टोंबर 2016 रोजी थेट मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे उपस्थित रहावे.
व्यवसायाची नावे पुढील प्रमाणे आहेत. टूल ॲड डायमेंकर, फीटर, मशिनिष्ट गांईडर, फौड्रीमन, मशिनिष्ट वेल्‍डर, वेल्डर ( जे / ई ), मेकॅनिक ट्रॅक्टर, शिट मेटल वर्कर, मेकॅनिक इलेक्ट्रानिक्स, ड्राफ्टसमन मेकॅनिक, एम्प्लायबिलिटी स्किल्स. या व्यवसासाठी संबंधीत ट्रेड मधील मेकॅनिकल, इलेक्ट्रानिक्स अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीत पदवी, पदविका व एक / दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधित व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच शिल्पनिदेशक एम्प्लायबिलिटी स्किल्सासाठी एबीए, बीबीए पदवी असणे आवश्यक आहे. या संस्थेस यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी नमूद केलेल्या दिनांकास संस्थेत उपस्थित रहावे. तसेच त्यानंतर आलेल्या संबंधित उमेदवारांचा विचार केल्या जाणार नाही.

000000

बेरोजगार उमेदवारांसाठी 14 ऑक्टोंबरला

भरती मेळाव्याचे आयोजन

नांदेड , दि. 7 :-  जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-3 चे आयोजन करण्यात आले आहे. अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारानी शुक्रवार  14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास बिल्डींग श्रीनगर वर्कशॉप रोड नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
वॉलसन सेक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. बंगलोर या कंपनीत सेक्युरिटी गार्डच्या पुरुषांसाठी 100 पदांसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, कार्यक्षेत्र बंगलोर राहील. वेतन दरमहा 11 हजार 600 व पेट्रोल व इतर भत्ते दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच युरेका फोर्ब नांदेड या कंपनीत पुरुषांसाठी सेल्समनच्या 20 पदासाठी  बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे. कार्यक्षेत्र नांदेड राहील. वेतन दरमहा 8 हजार पेट्रोल व इतर भत्ते दिले जातील. वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष आवश्यक आहे.
ऑनलाईन सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन आयडी पासवर्ड टाकून लॉगइन व्हायचे. जॉब फेअरमध्ये जावून जॉब इन्व्हेन्टमधून जिल्हा निवडणे. नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-3 च्या उजव्या बाजूस ॲक्शनमध्ये जावून पार्टीसिपेशनला क्लिक करणे. टर्म अन्ड कंडीशनला आय ॲग्री करुन अप्लाय करणे. पुन्हा ॲक्शनवर येवून इंट्री पास काढून घेणे व हा इंट्री पास घेवूनच मेळाव्यात यावे लागेल. काही अडचण आल्यास दूरध्वनी क्र. 02462-251674 यावर संपर्क साधावा.
या मेळाव्यासाठी ऑनलाईन सहभाग, इच्छुकता दर्शविल्याशिवाय सहभागी होता येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवाराची नोंद झाली नाही त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची सोय शुक्रवार 14 ऑक्टोंबर रोजी मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. इंट्री पास शिवाय मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. याबाबत होणारा प्रवास खर्च व इतर कोणताही खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

000000

परिवहन विभागात शिकाऊ उमेदवारांसाठी

सोमवारी  मुलाखतींचे आयोजन

नांदेड , दि. 7 :- शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून सत्र 2016-17 साठी विविध व्यवसायासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 रोजी राज्य परिवहन विभागीय कार्यालय वर्कशॉप असदुल्लाबाद नांदेड येथे सकाळी 9 वा. समक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे.
पात्र उमेदवारांच्या नावाची यादी राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय नांदेड येथील सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच संबंधीत उमेदवारांच्या भ्रमणध्वनीवर समक्ष मुलाखती संबंधीचा संदेश परिवहन कार्यालयाकडून पाठविण्यात आलेला आहे. जर काही पात्र उमेदवारांना संबंधीत उमेदवारांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क झाला नसेल अशा उमेदवारांनी त्यांचे सर्व मुळ कागदपत्रासह 10 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वा. समक्ष मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी केले आहे.

0000000
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
श्री गुरुगोबिदसिंघजी विमानतळावर स्वागत

नांदेड, दि. 7 :-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ येथे हिंगोली येथून आगमन झाले. श्री. फडणवीस यांचे विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी स्वागत केले. आमदार प्रताप पाटील-चिखलीकर,  आमदार सुभाष साबणे, आमदार  हेमंत पाटील यांनीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुष्पगूच्छ देऊन स्वागत केले. मनपा आयुक्त समीर उन्हाळे,  पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पगूच्छ देऊन स्वागत केले.  
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आमदार सर्वश्री प्रताप पाटील-चिखलीकर, आमदार सुभाष साबणे, आमदार हेमंत पाटील यांच्याशी संवादही साधला. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी संतूक हंबर्डे, प्रवीण साले, मुक्तेश्र्वर धोंडगे, व्यंकटेश चाटे, अंजली देव, दिलीप ठाकूर, हंसराज वैद्य, शिवप्रसाद राठी आदीनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी काही निवेदनेही स्विकारली.  यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपुत, तहसिलदार पी. के. ठाकूर आदींचीही उपस्थिती होती.  त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानाने मुंबईकडे प्रयाण केले.


0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...