Thursday, October 19, 2023

 वृत्त 

कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट

-         पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन

कौशल्य विकास केंद्र रोजगार मंदिरे ठरतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात ग्रामपंचायत हद्दीत 16 केंद्राची उपलब्धी

 

मुंबई, दि. 19 :- कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील 350 तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

 

या प्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभास मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

या सोहळ्यास दूरदृश्यप्रणालीद्वारे नांदेड जिल्ह्यातील 16 केंद्रांपैकी वाकद येथील केंद्रावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे आमदार भिमराव केराम, नांदेड तालुक्यातील धनेगाव येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील, प्रवीण साले, पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी सहभाग घेतला.

 

नवरात्रीचे पवित्र पर्व सुरु असल्याचा उल्लेख करत आणि त्यानिमित्ताने शुभेच्छा देतानाच पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, आईला आपल्या मुलाच्या सुख आणि यशाची काळजी असते. अशा या पवित्र काळात आपण युवकांसाठी प्रशिक्षण आणि संधीच्या दृष्टीने आगळी संकल्पना सुरु करत आहोत. या प्रशिक्षणामुळे युवकांच्या जीवनात नवी पहाट उदयास येईल. कारण जगभरात भारतातील प्रशिक्षित तरुणांना मागणी आहे. अन्य देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढते आहे. एका सर्व्हेक्षणानुसार जगभरातील 16  देशांमध्ये 40 लाख प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा युवकांना या देशांमध्ये बांधकाम, आरोग्य, पर्यटन, आदरातिथ्य, शिक्षण आणि परिवहन अशा क्षेत्रात मोठी मागणी आहे. अशा कौशल्य विकास प्रशिक्षणातून आपण केवळ भारतासाठी नाहीतर, अशा देशांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

 

बांधकाम, आधुनिक शेती तसेच मनोरंजन-माध्यम क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या संधीचा उल्लेख करून पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील या कौशल्य विकास केंद्रांतून विदेशात संधी आजमावू शकणाऱ्या तरुणांना काही सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण देणेही उचित ठरेल. गत काळात कौशल्य विकास हा विषयच गांभीर्याने घेतला गेला नव्हता. त्यामुळे क्षमता आणि संधी असूनही युवकांना प्रशिक्षणाअभावी नुकसानच सहन करावे लागले. आता मात्र आपण कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे. कोट्यवधी तरुणांना पंतप्रधान कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. आजही ग्रामीण भागात कित्येक कारागिर कुटुंबात पारंपरिक ज्ञानाचा पुढे वारसा सोपवला जातो. त्यांना पाठबळाची, आधाराची गरज असते. त्यादृष्टीने आपण विश्वकर्मा श्रम सन्मान योजना राबवू लागलो आहोत. त्यांना आधुनिक उपकरणे आणि चांगले प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्रातील ही 511 केंद्र या विश्वकर्मा योजनेला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

यावेळी भाषणात पंतप्रधान श्री. मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या औद्योगिकरणाबाबतच्या विचारांचाही तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक बंधनांना झुगारून स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, कौशल्य विकास आणि अशा प्रक्षिणातूनच दलित, वंचित आणि मागास घटकांना अधिक प्रतिष्ठापुर्वक, सन्मानाने जगण्याची संधी मिळते. त्यामुळे याच घटकांना या कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. आता ड्रोनद्वारेही आधुनिक शेती करता येता. यात आपल्या महिला भगिनींनाही संधी आहे. त्यांनाही या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येत आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र, इंडस्ट्री फोऱ प्वाईंट ओ, सेवा क्षेत्र, नैसर्गिक शेती, कृषी औद्योगिक आणि या क्षेत्रातील मुल्यवर्धन साखळी, पॅकेजिंग अशा क्षेंत्रातील संधीचाही पंतप्रधान श्री. मोदी यांनी उल्लेख करून या क्षेत्रातील प्रशिक्षण युवकांसाठी नव्या संधीचे दरवाजे खुले करतील असा विश्वास व्यक्त केला.

 

कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील ऊर्जावान युवाशक्तीची क्षमता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, युवा शक्ती मोठे संसाधन आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मिशन सुरू केले होते. गेल्या सहा वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे. देशात गत नऊ वर्षात पाच हजार नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र-आयटीआय सुरु करण्यात आली. यातून चार लाख उमेदवारांना प्रशिक्षण मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा ही क्रांतिकारी योजना सुरू करून पारंपारिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. आपण राज्याच्या अर्थसंकल्पात देखील ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ग्रामीण भागात अशी केंद्रे सुरु करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार युद्ध पातळीवर यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचा आराखडा तयार केला. प्रत्येक केंद्रातून 100 उमेदवार असे प्रत्येक वर्षी सुमारे 50 हजार कुशल उमेदवार तयार होतील. आपण बेरोजगारांची फौज असे नेहमी म्हणतो... पण ही आमची कुशल फौज असणार आहे. जे उद्याच्या महाराष्ट्रात सन्मानानं नोकरी व्यवसाय करीत असतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याच्या तळागाळात, ग्रामीण भागात, खेड्यातल्या युवकांचा कौशल्य विकास होईल. यात 30 टक्के महिला असतील. ग्रामीण भागातील कारागीरांना सुद्धा आणखी चांगले प्रशिक्षण मिळेल. आपण आयटीआयच्या प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन वाढवून 500 रुपये इतके केले आहे. बारावीनंतर 15 हजार उमेदवारांच्या रोजगार व शिक्षण-प्रशिक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत करार केला आहे. स्टार्ट अप्सना विविध पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील आयटीआयमध्ये 75 व्हर्चुअल क्लासरूम्स सुरु केले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बारा हजाराहून अधिक नवीन उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांना कर्ज दिल्याचे उल्लेख करून, ही प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे बनतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

दिवंगत प्रमोद महाजन यांच्याकडे आधुनिकतेची दूरदृष्टी होती याचा उल्लेख करून राज्यात 290 रोजगार मेळाव्यांचे आयोजन केल्याचे सांगितले. त्याद्वारे 1 लाख 40 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत राहील, असेही ते म्हणाले.

 

पंतप्रधानाचे कुशल भारताचे स्वप्न साकार करू

-         उपमुख्यमंत्री फडणवीस

भारत महाशक्ती होण्यासाठी बदलत्या काळाची गरज ओळखून ग्रामीण भागातदेखील कौशल्य विकासाचे शिक्षण दिले जाणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री यांनी कौशल्य विकासाचे जे काम सुरू केले आहे त्याचे चांगले परिणाम संपूर्ण भारतभर दिसत आहेत. माननीय पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीने ही गरज ओळखून देशात कौशल्य विकास अभियान सुरू झाले आहे. विश्वकर्मा योजना की त्याचाच पुढील टप्पा आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून नावा रूपाला आलेली आहे आणि त्यातूनही अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपला देश अशाच प्रकारे प्रगती करत राहिला तर जगातील मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून लवकरच आपण झेप घेवू. 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू झाली आहेत. इथेच आपण थांबणार नसून राज्यात आगामी काळात ही संख्या नक्कीच वाढवून पाच हजार पर्यंत नेवू व पंतप्रधानाचे कुशल भारताचे स्वप्न साकार करू, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

 

कौशल्य विकास केंद्रांमुळे ग्रामीण महाराष्ट्रात रोजगार क्रांती

-         उपमुख्यमंत्री पवार

राज्यात सुरू झालेली प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही राज्याच्या विकासाला चालना देणारी ठरतील.ग्रामीण भागातील ही कौशल्य विकास केंद्र ग्रामीण रोजगारामध्ये क्रांती घडवून आणतील. या केंद्रामध्ये आधुनिक युगाला आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्य आणि देशाच्या विकासाला चालना देणारी ठरेल. पी.एम.विश्वकर्मा योजना ही राज्यातील ग्रामीण कारागिरांना आपल्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे.देशाला महासत्ता बनवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांना महाराष्ट्र राज्य आपल्याला सदैव आपल्या पाठीशी आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

 

केंद्र युवकांसाठी उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार

-         मंत्री मंगल प्रभात लोढा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाला प्राधान्य दिले असून हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य देखील राज्यातील प्रत्येक गावागावात कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यामध्ये जी 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र होणार आहेत त्यामध्ये ग्रामीण भागाला पूरक असणाऱ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचबरोबर जागतिक स्तरावर लागणाऱ्या योग्यतेचे प्रशिक्षण देखील दिले जाईल. गावातून कोणत्याही व्यक्तीला रोजगारासाठी शहराकडे येण्याची गरज यामुळे भासणार नाही अशा प्रकारे नव्याने उभारलेल्या कौशल्य विकास केंद्रे राज्याच्या विकासासाठी आणि गावांना सक्षम करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतील असेही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

 

सुरवातीला भगवान विश्वकर्मा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते कळ दाबून प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी सुत्रसंचालन केले. कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी आभार मानले.

 

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राविषयी...

कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र असे ब्रीद घेऊन राज्यातील 350 तालुक्यांमधील 511 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 511  केंद्र. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मिळणार. कृषिपूरक पारंपरिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षण. पी.एम. विश्वकर्मा योजनेसाठी ही विकास केंद्र उपयुक्त ठरणार. या केंद्रामध्ये एकावेळेस जास्तीत जास्त 2 जॉब-रोल्सचे प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल. अल्प कालावधीत (साधारणत:3 महिने) पूर्ण होवू शकणारे (किमान 200 व कमाल 600 तास प्रशिक्षणाचा कालावधी) अभ्यासक्रमाची निवड जिल्हा, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यात येईल. प्रत्येक प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रात वर्ष 2023-24 करिता एकूण 100 उमेदवारांचे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात येईल. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये किमान 30 टक्के महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. या केंद्रातून दरवर्षी सुमारे 50 हजार युवक-युवतीं कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोजगारक्षम होतील.

 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची

वाकद येथील केंद्रावरून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण युवकांसाठी प्रगतीचे महाद्वार ठरणाऱ्या या अभिनव प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचेही दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्रातील सर्व केंद्रासमवेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. भोकर तालुक्यातील वाकद येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभास खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार गजानन घुगे, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर, भोकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड उपस्थित होते. 

0000








 आपल्या भागात जे खाद्यपदार्थ पिकतात

त्यांचा आहारात समावेश आरोग्याला हितकारक

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- प्रत्येक प्रदेशाची ओळख म्हणून एक खाद्यसंस्कृती विकसित असते. त्या भागातील हवामानानुसार त्या प्रदेशात एका विशिष्ट प्रकारच्या  पिकाचे उत्पादन घेतले जाते. ते उत्पादन त्या भागातील लोकांना आरोग्यासाठी लाभदायक असते. आपल्या भागात म्हणजे मराठवाडयात विशेषत: पूर्वीपासून ज्वारी, बाजरी अशा तृण व भरडधान्य पिकाचे उत्पादन घेण्यात येते. त्याप्रमाणे आपण आपल्या भागात जे जे पिकते ते खाण्यावर अधिक भर देवून आपली खाद्यसंस्कृती जपली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्सवात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. देशमुख, प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) अनिल गवळीआत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी व कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात  रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवाचे  19 व 20 ऑक्टोबर 2023 या दोन दिवशीय महोत्सवाचे आयोजन केले आहे या महोत्‍सवात जिल्‍हयातील शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिय सहभाग आहे. या महोत्सवात विक्रीच्‍या ठिकाणी  जिल्‍हयात उपलब्‍ध होणाऱ्या सर्व रानभाज्‍याचा समावेश आहे. यात शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला भाजीपालासेंद्रीय उत्‍पादनेफळे, गुळहळदलाकडी घाण्‍याचे करडीचे तेलमधधान्यविविध डाळी व केळीचे वेफर्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रानभाजी व सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या उत्पादनाच्या स्टॉलला भेट देवून पाहणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तर आभार प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) अनिल गवळी  यांनी मानले.

00000





 

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 नोव्हेंबर 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 ऑक्टोबर 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 नोव्हेबर 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 18:- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2023-24 मध्ये अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7,7() वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. 7 वर भुसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नंबर 7,7,() चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात 15 नोव्हेंबर 2023 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

 

हंगाम सुरु होण्यापुर्वी पुढील अटी व शर्तीची पूर्तता होणे आवश्यक

 

रब्बी हंगामी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा/मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी/नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 15 नोव्हेंबर 2023 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरुन सादर करावेत. यासाठी कोरे पाणी मागणी अर्ज शाखेत विनामुल्य उपलब्ध आहेत. पिकाचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस कार्यालय जबाबदार असणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामूळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. शासन निर्णयात नमूद दरानुसार सन 2023-24 साठीचे पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरणे आवश्यक आहे. शेतचारा स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या/अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारीट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणीवसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

0000

 संयुक्त राष्ट्रसंघ दिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजा समवेत उभारावा  

नांदेड (जिमाका) दि. 18 :- संयुक्त राष्ट्रसंघ दिन 24 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्र ध्वजा समवेत उभारण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्देश दिले आहेत. ज्या शासकीय कार्यालयात दररोज राष्ट्रध्वज उभारण्यात येतो त्या कार्यालयावर 24 ऑक्टोंबर 2023 या संयुक्त राष्ट्रसंघदिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज भारतीय ध्वजसंहिता 2002 च्या परि. 3.6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रध्वजाच्या बरोबर उभारण्यात यावा. 

संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही बाजुला फडकविता येतो. सामान्यत: ध्वज स्तंभाच्यासमोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्यादृष्टीने त्यांच्या अगदी डावीकडे राष्ट्रध्वज असावा असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

 बिडी कामगारांच्या मुलांसाठी अर्थसहाय्य ;

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

  

नांदेड (जिमाका) दि. 18 :- भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे बीडी/चुनखडी आणि डोलोमाईट/लोह/मॅगनीज/क्रोम खनिज खाण कामगारांच्या मुलांसाठी आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याची प्रक्रीया 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे. प्री मॅट्रीकसाठी 30 नोव्हेबर 2023 व पोस्ट मॅट्रीकसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यज अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नागपूर मुख्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0712-2510200 किंवा 0712-2510474 अथवा wcngp-labournic.in वर संपर्क साधावा. बिडी कामगार कल्याण निधी दवाखाना नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थामध्ये इयत्ता 1 ते उच्च शिक्षण घेत असलेली मुले या योजनेचा लाभ घेवू शकतात. या संबंधित माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल https://scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शिष्यवृत्तीसाठी पात्रतेची माहिती व अटी संकेतस्थळावर  प्रदर्शित केली आहे. या योजनेअंतर्गत बिडी/चुनखडी आणि डोलोमाईट/लोह/मॅगनीज/क्रोम अयस्क खाण कामगारांच्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थामध्ये शिकणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती/गणवेशाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे. पहिली ते चौथी 1 हजार रुपये , पाचवी ते आठवी 1 हजार 500 रुपये, नववी ते दहावी 2 हजार रुपये, अकारावी ते बारावीसाठी 3 हजार रुपये, आयटीआय, पॉलीटेक्नीक /पदवी कोर्ससाठी (बीएससी ॲग्रीचा समावेश)  यासाठी 6 हजार रुपये, बीई, एमबीबीएस, एमबीसाठी 25 हजार रुपये याप्रमाणे आहे. तसेच कामगार कल्याण संस्थाद्वारे चालविले जाणाऱ्या जवळच्या दवाखान्याचे/रुग्णालयांचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी/वैद्य यांच्याकडून वैयक्तीक माहिती मिळविता येईल. दिलेल्या मुदतीनंतर  प्राप्त झालेले अर्ज व शैक्षणिक संस्थेने पडताळणी न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...