Tuesday, April 15, 2025

वृत्त क्रमांक 390

नांदेडमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याला थाटात सुरूवात 

* जिल्हाधिकाऱ्यांच्या जलपूजनाने पंधरवाड्याची सुरूवात

* जलसंपदा विभागामार्फत 15 दिवस विविध उपक्रम राबवणार 

नांदेड, दि. 15 एप्रिल :- गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर, नांदेड पाटबंधारे मंडळामार्फत आज जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याची सुरूवात करण्यात आली. पाण्याचा थेंब अन् थेंब हा जीवनदायी असून येणाऱ्या पिढ्यांसाठी जलसंवर्धन किती आवश्यक आहे हे पटून देण्याचे कार्य पुढील 15 दिवसात विभागामार्फत राबविले जाणार असल्याचे यावेळी विविध वक्त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पाच नद्यांच्या जलकलशाचे जलपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.  

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत संपूर्ण राज्यात 15 ते 30 एप्रिल या काळामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये आज करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राहूल कर्डिले उपस्थित होते. अधिक्षक अभियंता तथा पालक अभियंता नांदेड जिल्हा अजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील सर्व कार्यकारी अभियंता, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, जलतज्ज्ञ, महिला शेतकरी तसेच जलसंधारण क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते. 

कलश  पुजनाने व जलप्रतिज्ञेने सुरूवात झालेल्या भरगच्छ उपस्थितीच्या या सोहळ्यामध्ये कार्यकारी अभियंता अशिष चौगुले यांनी पाणी व्यवस्थापन, जलसंधारण व विभागात सुरू असलेल्या कामांची मांडणी केली. जलसंपदा विभाग जिल्ह्यात राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती अशिष चौगुले यांनी यावेळी दिली. त्यानंतर अधिक्षक अभियंता तथा पालक अभियंता अजय दाभाडे यांनी कार्यक्रमाच्या पुढील पंधरा दिवसाच्या तपशीलाची मांडणी केली. 16 एप्रिलला जलसंपदा अधिकारी यांचे प्रशिक्षण, 17 एप्रिलला स्वच्छ व सुंदर कार्यालय, जलपूर्नभरण, 18 व 19 एप्रिलला शेतकरी संवाद, 20 एप्रिलला भुसंपादन व पूर्नवसन, 21 एप्रिल कालवा स्वच्छता अभियान, 22 एप्रिल उपसा सिंचनाचे पाणी परवानगी निरसन, 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषि विभागामार्फत कार्यशाळा, 24 एप्रिल सिंचन ई-प्रणाली पाणीपट्टी याबद्दल तक्रार निवारण,25 एप्रिलला विद्यापिठ व सेवाभावी संस्थांसोबत संवाद, 26 एप्रिल महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, यांच्या पाणी वापराचे जललेखा परिक्षण, 27 एप्रिलला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 28 एप्रिलला महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे जमिनीचा सात/बारा उतारा कजा करणे व अतिक्रमण हाटविणे, 29 एप्रिल पाणी वापर संस्था सक्षमिकरण कार्यशाळेचे आयोजन, 30 एप्रिल रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्यांचे सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

पूर्ण 15 दिवस विभागामार्फत विविध उपक्रम राबवून पाणी वापरासंदर्भात जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय नदीसंवर्धन, कालवा स्वच्छता अभियान, कालवा व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचनाची वाढ, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचे ऑडिट यासंदर्भात विविध उपक्रम याकाळामध्ये राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाला राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार टप्पा क्रमांक दोन व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या अभियानाला जोडण्याचे आवाहन केले. येणारा काळ हा पाण्याचे महत्त्व वाढवणारा असून आपल्या स्वत:च्या संपत्तीप्रमाणे पाणी वापराचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व संस्थांनी मिळून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सोबतच प्रत्येक तालुक्याचे पाणी ऑडिट करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जलसंपदा विभागाला भूसंपादन, अतिक्रमण अशा विषयांमध्ये संपूर्ण महसूल यंत्रणा मदत करेल तसेच या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्यापासून होणाऱ्या कृति आराखड्याच्या अंमलबजावणीत सर्वांनी सहभागी व्हावे, अशी सूचना त्यांनी केली.  

या कार्यक्रमाला जिल्हाभरातील मान्यवर शेतकरी तसेच कार्यकारी अभियंता श्री. मुदगल, श्री. चौगुले, श्री. जगताप, श्री.बिराजदार श्री. तिडके, श्री. कुरुंदकर, श्री. खेडकर, सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री. पारसेवार यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व अभियंते सहभागी झाले होते. सूत्रसंचालन एम. जी. शेख यांनी केले.

0000









वृत्त क्रमांक 389

 जिल्ह्यातील 60 विद्यार्थ्यांना घेऊन आज

श्रीहरीकोटा येथे शैक्षणिक सहल होणार रवाना

नांदेड दि. 15 एप्रिल :- सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांच्या अधिनस्त कार्यरत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींची शासकीय निवासी शाळा, माहूर , हदगाव, उमरी, नायगाव येथील 60 विद्यार्थ्यांना घेवून श्रीहरीकोटा येथे शैक्षणिक सहल उद्या सकाळी 9 वाजता होणार रवाना.

ही शैक्षणिक सहल सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथून उद्या 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून भारतीय संशोधन संस्था श्रीहरीकोटासाठी रवाना होत आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींची शासकीय निवासी शाळा, माहूर , हदगाव, उमरी, नायगाव येथील प्रत्येक शाळा 15 विद्यार्थी , विद्यार्थीनी असे एकूण 60 विद्यार्थी व त्यांचे काळजीवाहक म्हणून सोबत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक हे शैक्षणिक सहलीसाठी भारतीय अंतराळ संशोधक संस्था श्रीहरी कोटा येथे 16 ते 19 एप्रिल 2025 या कालावधीत जात आहेत.

00000

वृत्त क्रमांक 388

 समाज कल्याण कार्यालयात  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 

नांदेड, दि. 14 एप्रिल :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे मोठया उत्साहात साजरी करण्यता आली. सदर कार्यक्रामाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहूल कर्डीले हे होते. तर प्रमुख पाहुणे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार व डॉ. सान्वी जेठवाणी होत्या. तसेच कार्यक्रमास परमपुज्य पैय्याबोधी भंत्तेजी व भिक्खू संघ श्रामणेर खुरगांव यांची  उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले. 

तदृनंतर परमपुज्य पैय्याबोधी भंत्तेजी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशिल ग्रहण करुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी करुन उपस्थितांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या . तद्नंतर डॉ.सान्वि जेठवाणी यांनी उपस्थितांना मागर्दशन केले.   

जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी अध्यक्षीय भाषण करुन उपस्थितांना   भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांचे विचार आम्हाला प्रेरणादायी ठरतात असे मत व्यक्त केले. तृतीयपंथीय यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तृतीय पंथर्यासाठी किनरभवन लवकरात लवकर उभारण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेन असे आश्वासन त्यानी दिले.

यावेळी तृतीय पंथयांचे गुरु शेख फरीद मॅडम व सीवायडीए पुणे संस्थेचे मिलन लांबा तसेच डॉक्टर प्रशासकीय अधिकारी यशदा बबन जोगदंड  उपस्थित होते. सदर कार्याक्रमात  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलिस  अधिक्षक अबिनाश कुमार व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचे  हस्ते 40 ते 45 तृतीयपंथीयांना ओळख पत्र व  प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले .

 समाज कल्याण विभागा मार्फत आयोजित सामाजिक सप्ताह अंतर्गत भारतीय संविधानाच्या प्रास्तावीकेचे नियमीत सामुहिक वाचन करण्यात आले.  तसेच  सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण नांदेड कार्यालया अधिनस्त शासकीय वसतिगृह व शासकिय निवासी शाळा येथे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा , लघुनाटय , पथनाटय  चित्रकला तसेच वाचन-प्रेरणा उपक्रम घेवून इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

तसेच श्रीमती सुजाता पोहरे , समतादूत जिल्हा प्रकल्प अधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली समातादूता मार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाटयाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती  करण्यात आली. सदरील कार्यक्रमात  सामाजिक समता सप्ताहाची सांगता करण्यात आली. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी /कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले .सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पांपटवार यांनी केले तर अभार प्रदर्शन रामदास पेंडकर यांनी केले. सदर कार्यक्रमास  कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध महामंडळाचे अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

000








वृत्त क्रमांक 387

आयआयपीएच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी  राहुल कर्डिले तर सचिवपदी प्रा. बालाजी कतुरवार यांची निवड

नांदेड दि. १४ एप्रिल:- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात आयआयपीएच्या नांदेड शाखेच्या अध्यक्षपदी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आयआयपीए नवी दिल्ली ही भारत सरकारच्या कर्मचारी ,  लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत लोकप्रशासन विकास , संशोधन व प्रशासकीय सुधारणा या क्षेत्रात कार्य करणारी एक मूलभूत संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे.

केंद्र शासनाच्या संस्थेअंतर्गत  आय आयपीएची नांदेड  शाखा स्थापन करण्यात आली आहे.

नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्थानिक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्यासाठी, प्रशासकीय  क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणेच्या अनुषंगाने लोकप्रशासन विषयात लेखन, संशोधन व प्रशिक्षण विषयी विविध कार्य करण्यासाठी आयआयपीएची नांदेड शाखा स्थापन करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्याच्या कक्षात आयआयपीएचे महाराष्ट्र राज्य विभागीय केंद्राचे सचिव तथा नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष श्री.विजय सतबीरसिंग यांच्या अध्यक्षतेख़ाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीत नांदेड शाखा कार्यकारी मंडळाची बिनविरोधपणे निवड करण्यात आली. 

यामध्ये नांदेड शाखा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले तर सचिव म्हणून देगलूर महाविद्यालय देगलूर येथील लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्रप्रमुख प्रा. डॉ.  बालाजी कतुरवार यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष म्हणून पीपल्स महाविद्यालय नांदेड येथील प्रा. डॉ. अमोल काळे यांची निवड करण्यात आली आहे. 

आयआयपीए नांदेड शाखा 

कार्यकारी मंडळ पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आयआयपीएची शाखा स्थापन झाल्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करणे, माहिती व तंत्रज्ञानाच्या  मदतीने प्रशासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व गतीशील बनवीने, विविध  विकास कामांमध्ये लोकसहभाग वाढविणे,  प्रशासकीय अधिकारी वर्गांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन शारीरिक , मानसिक , बौद्धिक व नैतिक क्षमता विकसित करणे, लोककल्याणकारी व संवेदनशील प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रशासन विषयाचे प्राध्यापक व संशोधक यांच्यात विचारमंथन करण्यासाठी आयआयपीएची नांदेड शाखा एक वरदान ठरणार आहे.

आयआयपीए नांदेड शाखा कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. राम जाधव , अरविंद नळगे, डॉ. व्यंकट विळेगावे, दिनेश मूनगीलवार, डॉ.  वामन कळमसे , डॉ. रवी  बरडे, डॉ. दीपक वाघमारे,  डॉ.  विजय तरोडे ; डॉ. मिर्झा बेग यांची यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


प्रस्तुत बैठकीला आयआयपीए महाराष्ट्र विभागीय शाखेचे कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. प्रदीप लोंढे , श्री किरण चिद्रावार डॉ. बाळासाहेब भिंगोले प्रा. शंकर लेखने यांनाही निमंत्रित सदस्य म्हणून निवडण्यात आले. 

या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रशासन विषयातील प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते.

0000










वृत्त क्रमांक 386

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा आज जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते शुभारंभ

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

                                                                                                                                                                        नांदेड, दि. १४ एप्रिल :-पाणी व्यवस्थापनाची माहिती लोकांना व्हावी तसेच जलव्यवस्थापनाची मोठया प्रमाणात जनजागृती व्हावी यादृष्टीने राज्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ उद्या 15 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जलपुजनाने होणार आहे. 

या  जल व्यवस्थापन पंधरवड्यात 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात 15 एप्रिल रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उदघाटन. 16 एप्रिल रोजी जलसंपदा विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 17 एप्रिल रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, 18 एप्रिल रोजी शेतकरी व पाणी वापर संवाद, 19 एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, 20 एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, 21 एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारीचे निरसन करणे, 22 एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेवून कार्यवाही करणे, 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषि विभागामार्फत संयुक्तपणे पीक पध्दतीबाबत उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक, कार्यशाळेचे आयोजन. 24 एप्रिल रोजी सिंचन-ई-प्रणाली, पाणी दर, पाणी पट्टी आकारणी व वसुली थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, 25 एप्रिल रोजी विद्यापीठ केव्हीके, सेवाभावी संस्था यांचे समवेत संवाद व कृती कार्यक्रम, 26 एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुर्नवापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी येत असल्याबद्दल प्रकरणाचा शोध घेणे, 27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 28 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे, अतिक्रमण निष्कासन 31 मे पूर्वी करणे, 29 एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण, चर्चासत्र व कार्यशाळा, 30 एप्रिल रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा, महिला मेळावा, या पंधरवडा कालावधीत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्याचे सत्कार व पंधरवडा समारोप असे कार्यक्रम होणार आहेत. 

0000

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मनपा आयुक्त डॉ . महेशकुमार डोईफोडे आदीची उपस्थिती होती.





वृत्त क्रमांक 385 दि. १३ एप्रिल 2025

 सामाजिक समता सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रम 

नांदेड, दि. १३ एप्रिल:- भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियान कार्याक्रम पोर्णीमा नगर बुध्द विहार परिसर येथे  राबीवण्यात आला. या कार्याक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे हे होते व  प्रमुख पाहूणे दयानंद वाघमारे  (नगर सेवक) व ॲड कसबे हे होते . 

या कार्यक्रमाची सुरवात तथागत भगवान गौतम बुध्दाच्या मुर्तीस व भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अपर्ण करुन स्वच्छता अभियान सुरवारत करण्यात आली़

सदर स्वच्छता अभियान पोर्णीमानगर परिसरातील नागरीक व अधिकारी कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे सहभागी होवून पोर्णीमा नगर बुध्द विहार परिसराची स्वच्छता करण्यात आली. सदर स्वच्छता अभियानामध्ये मा.श्री दयानंद वाघमारे नगरसवेक व भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष संघरत्न निवडगे, दिपक शिराढोणकर, दिपक कसबे ,सोहम लोणे सह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी व नागरीक जवळपास  100 ते 150 नागरीकारीक हे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते . तद्नंतर पोर्णीमा नगर बुध्द विहार मध्ये सामुहिक संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. सदर स्वच्छता अभियान हे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे  यांच्या मार्गदर्शना खाली पार पाडण्यात आले .

000






 महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजुर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, आदी उपस्थित होते.







वृत्त क्रमांक 384 13.4.2025

 महाविहार बावरीनगरच्या विकास कामांना गती: जिल्हाधिकारी 

नांदेड दि. १३ एप्रिल– भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा यांच्या अंतर्गत महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी १९८८ साली स्थापन केलेल्या महाविहार बावरीनगर येथे शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून वैज्ञानिक दृष्टिकोन, समता आणि बंधुभावाचा संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून महाविहार बावरीनगरला तीर्थक्षेत्राचा (क) दर्जा प्राप्त झाला आहे.

या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून ध्यान केंद्र, बहुउद्देशीय सभागृह, भिक्खू व भिक्खूनी निवास, श्रामणेऱ-श्राविका निवास, भोजन कक्ष, अशोक स्तंभ, संरक्षण भिंत व अंतर्गत रस्ते अशा विविध कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून, जगातील सर्वात उंच अशोक स्तंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रशासकीय इमारतीचे कामही वेगाने सुरू आहे.

या कामांचा आढावा घेण्यासाठी ११ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सुकाणू समितीची बैठक बावरीनगर (दाभड) येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून चालू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी अशोक स्तंभ, ध्यान केंद्र, प्रशासकीय इमारत यांच्या जागेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सर्व कामांचा आठवड्याभरात आढावा घेण्यात येईल असे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वास्तुविशारद आणि कंत्राटदारांना ‘परफॉर्मन्स ऑडिट’, रोड मॅप, बार चार्ट अशा आधुनिक प्रणाली वापरण्याचे आदेश दिले. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाज माध्यमांचा वापर करून प्रगतीचा तात्काळ अहवाल देण्याची प्रणाली राबवण्यावरही भर दिला.

जिल्हाधिकारी कर्डिले यांनी कामांची गुणवत्ता आणि कालमर्यादेत पूर्णता यावर स्पष्टपणे लक्ष देण्याचे निर्देश दिले असून, बावरीनगर येथे कायमस्वरुपी पाणी पुरवठा यंत्रणा निर्माण करणे आणि महामार्गावरून येणाऱ्या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी तहसीलदार अर्धापूर, गट विकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना संयुक्त प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस डॉ. एस. पी. गायकवाड, तहसीलदार देवणीकर, महावितरणचे पंकज देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कहाळे, सरपंच श्रीमती कांचन सूर्यवंशी, उपसरपंच अरविंद पांचाळ, डॉ. भत्ते खेम्म धम्म, डॉ. भत्ते सत्यपाल, डॉ. मिलींद भालेराव, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाचे अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

०००००













13.4.2025


विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी त्यांचे स्वागत केले .









  वृत्त क्रमांक   454   पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन   पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाचा  1  मे रोजी सकाळी शासकीय समारंभ   नां...