नांदेडमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याला थाटात सुरूवात
* जिल्हाधिकाऱ्यांच्या जलपूजनाने पंधरवाड्याची सुरूवात
* जलसंपदा विभागामार्फत 15 दिवस विविध उपक्रम राबवणार
नांदेड, दि. 15 एप्रिल :- गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर, नांदेड पाटबंधारे मंडळामार्फत आज जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याची सुरूवात करण्यात आली. पाण्याचा थेंब अन् थेंब हा जीवनदायी असून येणाऱ्या पिढ्यांसाठी जलसंवर्धन किती आवश्यक आहे हे पटून देण्याचे कार्य पुढील 15 दिवसात विभागामार्फत राबविले जाणार असल्याचे यावेळी विविध वक्त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पाच नद्यांच्या जलकलशाचे जलपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत संपूर्ण राज्यात 15 ते 30 एप्रिल या काळामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये आज करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राहूल कर्डिले उपस्थित होते. अधिक्षक अभियंता तथा पालक अभियंता नांदेड जिल्हा अजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील सर्व कार्यकारी अभियंता, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, जलतज्ज्ञ, महिला शेतकरी तसेच जलसंधारण क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.
कलश पुजनाने व जलप्रतिज्ञेने सुरूवात झालेल्या भरगच्छ उपस्थितीच्या या सोहळ्यामध्ये कार्यकारी अभियंता अशिष चौगुले यांनी पाणी व्यवस्थापन, जलसंधारण व विभागात सुरू असलेल्या कामांची मांडणी केली. जलसंपदा विभाग जिल्ह्यात राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती अशिष चौगुले यांनी यावेळी दिली. त्यानंतर अधिक्षक अभियंता तथा पालक अभियंता अजय दाभाडे यांनी कार्यक्रमाच्या पुढील पंधरा दिवसाच्या तपशीलाची मांडणी केली. 16 एप्रिलला जलसंपदा अधिकारी यांचे प्रशिक्षण, 17 एप्रिलला स्वच्छ व सुंदर कार्यालय, जलपूर्नभरण, 18 व 19 एप्रिलला शेतकरी संवाद, 20 एप्रिलला भुसंपादन व पूर्नवसन, 21 एप्रिल कालवा स्वच्छता अभियान, 22 एप्रिल उपसा सिंचनाचे पाणी परवानगी निरसन, 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषि विभागामार्फत कार्यशाळा, 24 एप्रिल सिंचन ई-प्रणाली पाणीपट्टी याबद्दल तक्रार निवारण,25 एप्रिलला विद्यापिठ व सेवाभावी संस्थांसोबत संवाद, 26 एप्रिल महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, यांच्या पाणी वापराचे जललेखा परिक्षण, 27 एप्रिलला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 28 एप्रिलला महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे जमिनीचा सात/बारा उतारा कजा करणे व अतिक्रमण हाटविणे, 29 एप्रिल पाणी वापर संस्था सक्षमिकरण कार्यशाळेचे आयोजन, 30 एप्रिल रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्यांचे सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्ण 15 दिवस विभागामार्फत विविध उपक्रम राबवून पाणी वापरासंदर्भात जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय नदीसंवर्धन, कालवा स्वच्छता अभियान, कालवा व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचनाची वाढ, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचे ऑडिट यासंदर्भात विविध उपक्रम याकाळामध्ये राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाला राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार टप्पा क्रमांक दोन व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या अभियानाला जोडण्याचे आवाहन केले. येणारा काळ हा पाण्याचे महत्त्व वाढवणारा असून आपल्या स्वत:च्या संपत्तीप्रमाणे पाणी वापराचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व संस्थांनी मिळून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सोबतच प्रत्येक तालुक्याचे पाणी ऑडिट करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जलसंपदा विभागाला भूसंपादन, अतिक्रमण अशा विषयांमध्ये संपूर्ण महसूल यंत्रणा मदत करेल तसेच या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्यापासून होणाऱ्या कृति आराखड्याच्या अंमलबजावणीत सर्वांनी सहभागी व्हावे, अशी सूचना त्यांनी केली.
या कार्यक्रमाला जिल्हाभरातील मान्यवर शेतकरी तसेच कार्यकारी अभियंता श्री. मुदगल, श्री. चौगुले, श्री. जगताप, श्री.बिराजदार श्री. तिडके, श्री. कुरुंदकर, श्री. खेडकर, सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री. पारसेवार यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व अभियंते सहभागी झाले होते. सूत्रसंचालन एम. जी. शेख यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment