Tuesday, January 15, 2019

धम्म परिषद शांततेत व चांगल्यारितीने पार पडेल
यासाठी विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत
                                                      - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
       
नांदेड, दि. 15:- अर्धापूर तालुक्यातील महाविहार बावरीनगर दाभड येथे 32 व्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद 20 व 21 जानेवारी 2019 या कालावधीत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवापूर्वी संबंधित विभागांनी कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षितता राखून धम्म परिषद शांततेत व चागल्यारितीने पार पडेल यासाठी संबंधीत विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.   
महाविहार बावरीनगर दाभड येथील अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेनिमित्त सोई, सुविधा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्हाधिकारी यांचे कक्षात घेतला त्यावेळी ते बोलत होते.  
            यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. डी. राजपूत, अर्धापूर तहसीलदार सुजि नरहरे, विद्युत वितरण कंपनीचे एस. ए. दासरकर, बावरीनगर दाभडचे संयोजक डॉ. एस. पी. गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, राज्यासह शेजारच्या राज्यातून बावरीनगर येथील भारतीय बौद्ध धम्म परिषदेस मोठ्या संख्येने जनसमुदाय येतो. या परिसरात गर्दी कालावधीत पोलीस विभागांनी कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्हा परिषदेने त्यांच्या विभागाशी संबंधित असलेली कामे मुदतीत पूर्ण करावीत. यासंदर्भात एसओपी तयार करुन सादर करण्यात यावा. या महोत्सव यात्रा कालावधीत एसओपीनुसार कार्यवाहीच्या अनुषंगाने पथके तयार करुन पथकातील अधिकारी, कर्मचारी यांचे 24 तासासाठी पथके नेमून त्यांचे वेळापत्रक तयार करावे यासह इतर महत्वाच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिल्या.
            जिल्हा परिषद आरोग्य विभागाने महोत्सव कालावधीत आरोग्य केंद्र अर्धापूर व परिसरातील आरोग्य केंद्र येथे राखीव वैद्यकीय पथक, मोबाईल व्हॅन, विविध गटाचे रक्त, औषधीसाठा आणि खाटा राखीव ठेवाव्यात. कोणत्याही प्रसंगी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी. तज्ञ वैद्यकीय पथके अनुभवी स्टाफ नेमावा.
            विद्युत वितरण विभागाने महाविहार बावरीनगर दाभड अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद कालावधीत अर्धापूर परिसरात विद्युत पुरवठा 24 तास अखंडीत ठेवावा. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून विद्युत पोली वरिल वाकलेल्या विद्युत तारा, उघडे डिपी यांची तात्काळ दुरुस्ती करावी.  यात्रेकरुसाठी परिसरात अखंडीत शुध्द पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पिण्यासाठी टँकर व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने येणाऱ्या जनसमुदायाची होणारी गर्दी पाहता अर्धापूर तसेच नांदेड शहरास जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी महोत्सवापुर्वी पूर्ण करावी. वळण व उताराच्या ठिकाणी मार्गदर्शक चिन्हांची फलके लावावीत. राज्य परिवहन महामंडळाने या कालावधीत जनसमुदायाच्या गर्दीचा अंदाज घेवून चांगल्या व सुस्थिती असलेल्या पुरेश्या बसेसची व्यवस्था करावी, अशाही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी सुचना दिल्या.
000000

 लोकसंवादकार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांशी हितगुज
उलगडल्या शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाच्या यशोगाथा ...
नांदेड, दि. 15: शेतात राबून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा शेतकऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या  ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मांडल्या. सुमारे तीन तास मुख्यमंत्री राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांशीया कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत होते. त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. काही शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगत मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलासा देत होते.
सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांसोबत संवादाला सुरुवात केली. शेतकरी बांधवांच्या जीवनात कष्टाने पिकविलेल्या तीळ आणि उत्पादित केलेल्या गुळाचा गोडवा कायम रहावा, अशा शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी चर्चेला सुरुवात केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून जालना, पालघर, अहमदनगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुक्तपणे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे तसच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल.  म्हणून 2022 पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं ध्येय निश्चित आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली  16 हजार गावं जलपरिपूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे 34 लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर पीक उत्पादनामध्ये 45 टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळं तर महाराष्ट्राचा कायापालट होऊ घातला आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्यानं पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे.
राज्यात 1 लाख 37 हजार शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत  1 लाख 30 हजार सिंचन विहिरी खोदण्यात आल्या आहेत.
देशातील सर्वात मोठी अशी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा दिलासा दिला आहे. आतापर्यंत सुमारे 51 लाख खातेदार शेतकऱ्यांसाठी 24 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 2014-15 पासून आतापर्यंत राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकरी बांधवाना 15 हजार 240 कोटी रुपये वाटप केले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देत गेल्या चार वर्षात खरीप आणि रब्बी हंगामात दरवर्षी सरासरी 77 लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. योजनेतून सरासरी 55 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2 हजार 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी दिली आहे.
कृषी यांत्रिकीकरणाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यासाठी  600 कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान 5 लाख शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 18 हजार ट्रॅक्टरचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. 8 हजार पेक्षा जास्त पॉवर टीलर्स व 45 हजार पेक्षा जास्त यांत्रिक अवजारे वितरित केली आहेत.
राज्यातल्या ग्रामीण भागाचं चित्र बदलण्याची क्षमता असलेला एक मोठा प्रकल्प आपण हाती घेतला आहे. जागतिक बँकेनं त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपये गुंतवण्याचे मान्य केलं आहे. महाराष्ट्र राज्य कृषी-व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) याद्वारे शेतमाल विक्रीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं, उपलब्ध सुविधांचं  आधुनिकीकरण व बळकटीकरण करणं, शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती करणं आणि शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणं या गोष्टी करणार आहोत.
 राज्य शासन योजना आखतं, तसेच त्याची अंमलबजावणी करतं. या योजनांचा ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांच्याशी बोलणं, त्यांना खरोखरचं किती लाभ मिळाला आहे हे समाजवून घेणं, जर काही अडचणी आल्या असतील तर त्या कशा दूर करता येतील याची माहिती घेणं हे महत्वाचं वाटतं. म्हणून मी आपल्याशी संवाद साधत आहे. दुष्काळी परिस्थितीची झळ जास्त बसलेल्या मराठवाड्यापासून आपण चर्चेला सुरुवात करुया, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी सर्वप्रथम चर्चा केली.
यावेळी शेतकऱ्यांनी शेततळ्यांमुळे उत्पादन वाढीस लागल्याचे सांगतानाच उन्हाळ्यातही पाणी टंचाई जाणवली नाही. जिथे पिण्यासाठी पाणी नव्हते तेथे आता ऊस, द्राक्षासारखी पिके घेतोय, असे सांगत बहुतांश शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजना वरदान ठरल्याचे सांगितले. सोलापूर येथील बिराजदार आजोबा आपल्या शेतात तयार केलेल्या शेततळ्याच्या काठी बसून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत होते. साहेब, तळ्यातील पाण्याचे जलपूजन व्हायचे आहे, आपण रिमोटद्वारे बटन दाबून जलपूजन करावे,’ अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करताच रिमोटचे बटन दाबून मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन जलपूजन केले. पालघर जिल्ह्यातील गणपत गावंडा यांनी अनुभव कथन करताना मुख्यमंत्र्यांना दुर्गम भागातील शेतीच्या सपाटीकरणाबाबत अडचण सांगितली. ती ऐकून ज्या भागात शेतीचे समतलीकरण करता येत नाही अशी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी तातडीने विभागाला दिले.
गटशेतीला राज्य शासनाने चालना दिल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहे. पालघर येथे पाच हजार शेतकरी गट तयार झाल्याचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. गटशेतीमुळे शेतकरी एकत्रित आल्यावर जी शक्ती निर्माण होते त्याचा फायदा मिळतो आणि एकरी उत्पन्न वाढीतही त्याचे लाभ मिळतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी गटांनी मेगा फूड पार्क योजना राबवावी. त्याला शासनातर्फे अनुदान दिले जाईल. नाशवंत मालावर प्रक्रिया केल्यावर त्याला भाव देखील चांगला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अनुदानासाठी कोणाला पैसे द्यावे लागतात का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीच्या कुठल्याही अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. ऑनलाईनमुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेडनेटद्वारे पिकांचे उत्पादन, शेततळे, कृषी यांत्रिकीकरण, कर्जमाफी यासह शेतमालाला बाजारभाव, फुलशेती, सेंद्रीय शेती यासह विविध विषयांवर चर्चा झाली. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल केले. त्याचा फायदा राज्यातील अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
शेतीसाठी शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्यात लवकरच एक लाख सौर ऊर्जा पंप वाटपास सुरुवात करण्यात येणार असून शेतीला वीज पुरवठा करणारे सर्व फिडर सौर ऊर्जेवर चालणारे करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सुमारे तीन तास मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्षात बोलायला संधी मिळाली याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. तळागाळातील शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधला, आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया जालना जिल्ह्यातील वरुड येथील दीपक म्हस्के यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांशी संवाद साधणारे मुख्यमंत्री आम्हाला पुढेही लाभो, अशी इच्छा गोंदियातील बाबुलाल गौतम यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी थेट शेतातल्या बांधावरुन शेतकऱ्यांनी सहकुटुंब संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी देखील संवाद साधला.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आज सुरुवात झालेल्या महाॲग्री टेक कार्यक्रमामुळे शेतीत आधुनिकता येईल. त्या माध्यमातून राज्यातला शेतकरी सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या बरोबरचा संवाद प्रेरक आणि मार्गदर्शक ठरला. शेतीच्या प्रश्नांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
चौकट
मुख्यमंत्र्यांना आवडतो हातसडी तांदळाचा भात
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना शेतकरी आपल्या भागातील चिकू, नारळ, पपई, पेरु या फळांसोबतच विविध भाज्या आणि फुलांची माहिती देत होते. माझ्या घरी पालघर जिल्ह्यात पिकणारा हातसडीचा तांदूळ मी नेहमी आणतो. या तांदळाचा भात पौष्टिक असतो. तो मला आवडतो, असे कौतुकाचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढताच पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आनंद अवर्णनीय होता.
टोपलंभर पेढे पाठवतो ...
संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजार योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट विक्रीसाठी आणता येतो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान परभणी येथील प्रताप काळे या शेतकऱ्याने आपला अनुभव सांगताना आज माझ्यासाठी दिवाळी असल्याचे सांगत काल आठवडे बाजारात मी नेलेल्या वांग्यांना चांगला भाव मिळाला. मला हजार रुपये एक दिवसात मिळाले. माझ्यासाठी ही दिवाळीच, असे सांगताना प्रताप यांनी मुख्यमंत्र्यांना टोपलभर पेढे देतो, असे उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी दिली.
बीई एमबीए झालेली तरुणी शेतीकडे वळली
गोंदिया जिल्ह्यातील राणू रहांगडाले या तरुणीने बीई इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतले. एमबीए केले. मात्र ती शेतीकडे वळली. आता सध्या 35 एकर शेतीवरील भाजीपाल्यासह पपई, केळी यांचे उत्पादन घेते. स्ट्रॉबेरी पिकविते. यासाठी तिने सिंचन योजनांचा लाभ घेतला. शेती करताना शासनाच्या विविध योजनांमुळे कसा फायदा झाला. हे अनुभव सांगताना राणूने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राणूच्या शेती व्यवसायाकडे वळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. उच्च शिक्षित असूनही शेती करताय याबद्दल तुमचे अभिनंदन असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
ऑनलाईन जलपूजन
सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी येथील सिद्धराम बिराजदार या शेतकऱ्यांने मुख्यमंत्र्यांना शेततळ्यातील पाण्याचे जलपूजन रिमोटचे कळ दाबून करावे, अशी विनंती केल्यानंतर त्याला मान देत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम सुरु असतानाच रिमोटची कळ दाबून जलपूजन केले. अशा प्रकारे ऑनलाईन जलपूजन करण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच उपस्थितींना हसू आवरले नाही.
डाळींब खायची इच्छा होतेय
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील डाळींब सोबत आणले होते. ते पाहून मुख्यमंत्री म्हणाले, डाळींब खूप छान दिसताय. पाहताच खायची इच्छा होतेय, अशी स्तुती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 
००००

लोहयात सीआरपीएफ जवानांचे चित्‍तथरारक प्रात्‍यक्षिक
आपत्‍तीला तोंड देण्‍यासाठी यंत्रणा सक्षम : परळीकर
लोहा :
       मानवी साधन संपत्‍तीला व पर्यावरणाला हानिकारक ठरणा-या कोणताही आपत्‍तीला समर्थपणे तोंड देण्‍यासाठी केंद्र व राज्‍य सरकारची यंत्रणा सक्षम आहे. यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून नैसर्गिक आपत्‍ती निवारण करण्‍यासाठी आपले योगदान दयावे, असे आवाहन लोहयाचे तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले. दरम्‍यान, मुदखेड येथील सिआरपीएफच्‍या  जवानांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अंतर्गत रंगीत तालिम करुन प्रात्‍यक्षिक दाखविले.
       आपत्‍ती व्‍यवस्‍थापन जनजागृती अभियान अंतर्गत लोहा तहसिल कार्यालयाच्‍यावतीने श्री. संत गाडगे बाबा महाविद्यालयात 14 जानेवारी रोजी मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलीस दलाच्‍या जवानांचे प्रात्‍यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी अध्‍यक्षीय भाषणात तहसिलदार परळीकर बोलत होते. यावेळी कंधारच्‍या तहसिलदार श्रीमती. संतोषी देवकुळे, लोहयाचे गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड, ग्रामीण रुग्‍णालयाचे अधीक्षक जिवनराव पावडे , सिआरपीएफ मुदखेडचे उपनिरीक्षक शिवाजी मुलगीर, लोहयाचे पोलीस उपनिरीक्षक कुंदन परिहार, लोहा तालुका कृषि अधिकारी भूमनवाड, कंधार तालुका कृषि अधिकारी आर.एन. देशमुख, बालविकास प्रकल्‍प अधिकारी पांडे, भूमि अभिलेख कार्यालयाचे अडकिणे, नायब तहसिलदार एस.एम. देवराये, सारंग चव्‍हाण, लोहा न.प.चे उल्‍हास राठोड, मुख्‍याध्‍यापक एल.के भगत, पर्यवेक्षक बि.डी.जाधव, पेशकार श्रीमती. एस.आर.वाळूक्कर यांचेसह विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोहा तहसिल कार्यालयाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी तसेच विदयार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
       तहसिलदार परळीकर पुढे बोलताना म्‍हणाले की, भूकंप, पूर, आग, भूस्खलन, दुर्घटना, गॅस गळती, आदि नैसर्गिक व माननिर्मित आपत्‍तीला तोंड देण्‍यासाठी आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचा कायदा केला आहे व या कायदयाने सर्वांचीच जबाबदारी निश्चित केली आहे. प्रत्‍येकाने आपली जबाबदारी ओळखून होणारी हानी टाळावी.
       सीआरपीएफ मुदखेडचे उपनिरीक्षक शिवाजी मुलगीर यांनी यावेळी सविस्‍तर मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले आपत्‍तीत धैर्य खचू न देता कार्य करावे. भूकंप आला तर टेबलचा आधार घ्‍यावा. तसेच आग लागली तर गॅस व लाईट बंद करावी. यावेळी सीआरपीएफच्‍या जवानांनी रंगीत तालीमव्‍दारे विविध प्रात्‍यक्षिक दाखविले तसेच  उंच इमारतीवर आग लागली असेल तर कसे कार्य केले जाते याचे चित्‍तथरारक प्रात्‍यक्षिक दाखविले.
       यानिमित्‍ताने आयेाजीत निबंध स्‍पर्धेतील विजेते सृष्‍टी शंकरराव पारेकर, अंकिता कदम, अजय आनेराव या विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विक्रम कदम यांनी तर आभार बी.डी. जाधव यांनी मानले.
व्‍हीव्‍हीपॅटचे प्रात्‍यक्षिक
इव्‍हीएम व व्‍हीव्‍हीपॅट मशीनव्‍दारे मतदान विषयक प्रात्‍यक्षीक यावेळी दाखविण्‍यात आले. ज्‍या उमेदवारांना मतदान केले त्‍याच उमेदवाराना मतदान केल्‍याचे दिसत असल्‍याचे उपस्थितांनी प्रात्‍यक्षिकाव्‍दारे पाहिले.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...