Tuesday, January 15, 2019

धम्म परिषद शांततेत व चांगल्यारितीने पार पडेल
यासाठी विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत
                                                      - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
       
नांदेड, दि. 15:- अर्धापूर तालुक्यातील महाविहार बावरीनगर दाभड येथे 32 व्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद 20 व 21 जानेवारी 2019 या कालावधीत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवापूर्वी संबंधित विभागांनी कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षितता राखून धम्म परिषद शांततेत व चागल्यारितीने पार पडेल यासाठी संबंधीत विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.   
महाविहार बावरीनगर दाभड येथील अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेनिमित्त सोई, सुविधा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्हाधिकारी यांचे कक्षात घेतला त्यावेळी ते बोलत होते.  
            यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. डी. राजपूत, अर्धापूर तहसीलदार सुजि नरहरे, विद्युत वितरण कंपनीचे एस. ए. दासरकर, बावरीनगर दाभडचे संयोजक डॉ. एस. पी. गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, राज्यासह शेजारच्या राज्यातून बावरीनगर येथील भारतीय बौद्ध धम्म परिषदेस मोठ्या संख्येने जनसमुदाय येतो. या परिसरात गर्दी कालावधीत पोलीस विभागांनी कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्हा परिषदेने त्यांच्या विभागाशी संबंधित असलेली कामे मुदतीत पूर्ण करावीत. यासंदर्भात एसओपी तयार करुन सादर करण्यात यावा. या महोत्सव यात्रा कालावधीत एसओपीनुसार कार्यवाहीच्या अनुषंगाने पथके तयार करुन पथकातील अधिकारी, कर्मचारी यांचे 24 तासासाठी पथके नेमून त्यांचे वेळापत्रक तयार करावे यासह इतर महत्वाच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिल्या.
            जिल्हा परिषद आरोग्य विभागाने महोत्सव कालावधीत आरोग्य केंद्र अर्धापूर व परिसरातील आरोग्य केंद्र येथे राखीव वैद्यकीय पथक, मोबाईल व्हॅन, विविध गटाचे रक्त, औषधीसाठा आणि खाटा राखीव ठेवाव्यात. कोणत्याही प्रसंगी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी. तज्ञ वैद्यकीय पथके अनुभवी स्टाफ नेमावा.
            विद्युत वितरण विभागाने महाविहार बावरीनगर दाभड अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद कालावधीत अर्धापूर परिसरात विद्युत पुरवठा 24 तास अखंडीत ठेवावा. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून विद्युत पोली वरिल वाकलेल्या विद्युत तारा, उघडे डिपी यांची तात्काळ दुरुस्ती करावी.  यात्रेकरुसाठी परिसरात अखंडीत शुध्द पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पिण्यासाठी टँकर व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने येणाऱ्या जनसमुदायाची होणारी गर्दी पाहता अर्धापूर तसेच नांदेड शहरास जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी महोत्सवापुर्वी पूर्ण करावी. वळण व उताराच्या ठिकाणी मार्गदर्शक चिन्हांची फलके लावावीत. राज्य परिवहन महामंडळाने या कालावधीत जनसमुदायाच्या गर्दीचा अंदाज घेवून चांगल्या व सुस्थिती असलेल्या पुरेश्या बसेसची व्यवस्था करावी, अशाही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी सुचना दिल्या.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...