Tuesday, July 7, 2020


वृत्त क्र. 619   
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते
लेंडी प्रधान प्रकल्प संपादित घरमालकांना मावेजाचे वाटप
नांदेड (जिमाका) दि. 7 :-  भुसंपादन प्रस्‍ताव लेंडी प्रधान प्रकल्‍प ( जुने गावठाण) वार्ड क्र. 1 ते 8 बुडीत क्षेत्रासाठी मुखेड तालुक्यातील मौजे मुक्रमाबाद येथील संपादित घराचा मावेजा 6 जुलै  2020 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील  नियोजन भवन येथे वाटप करण्यात आला.  भुसंपादन प्रकरणात एकुण (1659) खातेदार असुन  11  घरमालकांना मावेजाचे वाटप करण्‍यात आले आहे. रमेश हुलाजी कांबळे,   केरबा मष्‍णाजी कांबळे, बंडु मष्‍णाजी कांबळे,  देविदास मष्‍णाजी कांबळे, आनंदा मष्‍णाजी कांबळे,  खंडु कडेप्‍पा काबंळे,  सुभाष कोंडीबा कांबळे, माधव नामदेव इंदुरे, नामदेव माधव  इंदुरे, अशोक भुमन्‍ना भुरुळे, सुमनबाई काशीनाथ खलुरे यांना मावेजाचे धनादेश वाटप करण्यात आले.                                                          
यावेळी आमदार तुषार राठोड, जिल्‍हाधिकारी विपीन इटनकर, जिल्‍हाधिकारी किनवट अभिनय गोयल,  निवासी उपजिल्‍हाधिकारी सचिन खल्‍लाळ, उपजिल्‍हा निवडणुक अधिकारी, प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी  शक्‍ती कदम, उपजिल्‍हाधिकारी भुसंपादन लसिका संतोषी देवकुळे, कार्यकारी अभियंता देगलुर लेंडी प्रकल्‍प विभाग रा.मा. देशमुख, तहसीलदार मुखेड काशीनाथ पाटील, तहसीलदार वैशाली पाटील, अव्‍वल कारकुन लक्ष्‍मण व्हि. टेकाळे , मंडळ अधिकारी एस.एस. साले, डी. डी. धांडे, आठवले व्हि. एस. तसेच मुक्रमाबाद येथील माजी सरपंच शिवराज आवडके, सुरेश पंदिलवार,  सुभाष अप्‍पा बोधने, गंगाधर वटटमवार, तलाठी ज्ञानेश्‍वर रातोळीकर, ग्रामसेवक पांडुरंग नागेश्‍वर व प्रतिष्‍ठीत नागरीक आदी उपस्थित होते.
                                                              00000


वृत्त क्र. 618   
 पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी
निकषांमध्ये योग्य तो बदल करणे आवश्यक
     -                  पालकमंत्री अशोक चव्हाण  

नांदेड (जिमाका) दि. 7 :- इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमासाठी पात्र होण्याचे प्रमाण हे अत्यल्प प्रमाणात आहे. नांदेड जिल्हा हा हमखास पडणाऱ्या पावसाच्या क्षेत्रात मोडत जरी असला तरी अलिकडच्या काळात पर्यावरणातील बदलामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतमाल नुकसानीचे प्रमाण हे पिक विमा कंपन्याच्या निकषापलिकडचे आहेत. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करुन जिल्ह्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना अधिकाधिक पिक विमा योजनेचा लाभ कसा मिळेल याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
कृषि विभाग व सहकार विभागाच्या जिल्ह्यातील विविध योजनांची व सद्यस्थितीची आढावा बैठक पालकमंत्री अशोक  चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, गणपतराव तिडके आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात यावर्षी सोयाबिन व कापूस पिकाची शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात पेरणी केली.  यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबिन बियाणांची उगवण कमी झाल्याने संबंधित बियाणे कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करुन तेवढ्यावर थांबता येणार नाही. या बियाणे कंपन्यांनी स्वत:हून पुढे येत शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देणे अपेक्षित आहे. यासाठी शासनस्तरावरुन जर काही हस्तक्षेप करावा लागला तर जिल्हा प्रशासनाने तो वेळेवर करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
कृषि विभागाच्या विविध विषयाचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची कमतरता होऊ नये, यासाठी कृषि विभागाने दक्षता घ्यावी. बँकांकडून शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्जाचे वाटप होणे गरजेचे असून त्यात शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. 
बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पेरणी क्षेत्र, बियाणे व खत उपलब्धता, पिक कर्ज वाटप, शेतमालाची हमी भावाने खरेदी आदीं विषयाचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी घेतला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी जिल्ह्यात सोयाबिन पिकाची 3 लाख 8 हजार 4 हेक्टर व कापूस पिकाची 1 लाख 93 हजार 441 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकामध्ये उगवन कमी झाल्याने 11 हजार 53 एवढ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात 15 ते 16 हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. यातील बहुतांश क्षेत्रावर पेरणी सुरु झाली असून कापूस, तूर, मुग व इतर पिकांची बियाणे बाजारात उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
000000

वृत्त क्र. 617


दोनशे खाटांचे नवीन हॉस्पिटल व सी.टी.स्कॅन विभागाचे
ना. अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
नांदेड जिल्हावासियांसाठी अद्ययावत वैद्यकिय संकुल निर्माण करण्याचा मानस
-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक अद्यावत असे जिल्हा रुग्णालय संकुल निर्माण करण्याचा माझा मानस आहे. याचाच एक भाग असलेल्या 200 खाटांच्या नविन हॉस्पिटलचे लोकार्पण करतांना मला मनस्वी आत्मिक समाधान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकिय रुग्णालय येथील 200 खाटांच्या अद्ययावत बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे व सी. टी. स्कॅन विभागाचे लोकार्पण आज त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शासकिय निमयामांच्या अंतर्गत निवडक उपस्थितीत छोटेखानी झालेल्या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर,  महापौर सौ. दिक्षा धबाले, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.
नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या इतर इमारती या अत्यंत जीर्ण झाल्या असून याचा कायापालट करणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत सहाय्यभुत ठरणारे येथील नर्सींग कॉलेज व इतर विभागांना चांगल्या इमारतीची गरज आहे. हे लक्षात घेता आजच्या घडिला जिल्हा रुग्णालय परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर लवकरच अद्ययावत वैद्यकिय सुविधांचे एकत्रित संकुल लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. याठिकाणी सी. टी. स्कॅन विभागाचीही अत्यंत गरज होती. ती गरज लक्षात घेऊन या 200 खाटाच्या ओपीडीसह हा सी. टी. स्कॅन विभागही जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन उभारण्यात आलेल्या या इमारतीची स्वच्छता व येथील उपकरणांची निगा ही तितक्याच गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेतली पाहिजे. शासन जनतेच्या सुविधेसाठी चांगल्या वास्तू निर्माण करते मात्र कालांतराने त्याठिकाणी स्वच्छता व निगा याबाबत फारशी काळजी घेतल्या जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करुन या नवीन वास्तुच्या स्वच्छतेबद्दल योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले.       
कोरोना आपत्तीमुळे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करुन त्यांना जनतेच्या सेवेत तत्पर ठेवणे हे अतिशय महत्वाचे झाले आहे. यासाठी येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 41.54 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 5 कोटी 28 लक्ष 66 हजार रुपये एवढा निधी किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
या नवीन 200 खाटांच्या रुग्णालयात प्राथमिक तपासणी, पॅथॉलॉजी विभाग, क्ष किरण विभाग, ओपीडी, इंजेक्शन आणि ड्रेसिंग, डायलेसीस, औषध भांडार, महानगर ब्लड बँक, फिजिओ थेरपी, प्रतिक्षागृह आदि अद्ययावत वैद्यकिय सुविधा अंतर्भूत केल्या आहेत.
सद्यस्थितीत कोरोनाचे आव्हान लक्षात घेता ही नवीन 200 खाटांचे इस्पितळ कोविडसाठी उपयोगात आणले जाणार आहे.    
00000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...