Friday, March 7, 2025

  वृत्त क्रमांक 269

जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांना भेट  

केंद्रसंचालक व कर्मचारी निलंबीत   

·         परीक्षा केंद्रावर अनावश्यक गर्दी

·         पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश 

नांदेड दि. 7 मार्च : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुटूंर तांडा येथील गैरव्यवस्थेवर नाराजी व्यक्त करीत पोलिसांना केंद्राच्या आसपास असणाऱ्या काही लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तर गोंधळाला नियंत्रीत न करू शकल्याबद्दल केंद्र संचालक व कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. 

यासोबतच परीक्षा केंद्रावरील गर्दी पाहून तिव्र शब्दात केंद्र संचालक व पोलीस यंत्रणेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी अनावश्यक गर्दी करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. याठिकाणच्या केंद्रचालकांना निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत. तर या परिसरातील जबाबदारी असणाऱ्या बैठेपथकातील सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

केंद्रसंचालकास बदलविण्यात आले असून या परीक्षा केंद्राचा प्रभार दुसऱ्या मुख्याध्यापकाकडे देण्यात आला आहे. याशिवाय आज माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी माळाकोळी व लोहा येथील केंद्रांना भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोड यांनी बिलोली तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान कारवाई केली होती. परीक्षा संदर्भात जिल्ह्यात कुठेही गोंधळ चालणार नाही याबाबत त्यांनी पुन्हा एकदा यंत्रणेला ताकीद दिली आहे.

0000





वृत्त क्रमांक 268

 ‘ॲग्रीस्टॅक’ योजना शेतीच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक

नांदेड दि. 7  मार्च  :- कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी अॅग्रीस्टॅक' म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू असून ॲग्रीस्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे.

शासनाच्याल महत्व कांक्षी प्रकल्पाठची यशस्वीस अंमलबजावणी करण्या साठी आज नियोजन भवन येथे प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्याीत आली होती. या कार्यशाळेस गटविकास अधिकारी, नायब तहसिलदार, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्राम विस्तारर अधिकारी, ग्रामसेवक, महसूल सेवक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, अंगणवाडी सेवीका, आशा वर्कर, रास्तूभाव दुकानदार तसेच सरपंच, गावातील प्रतिष्ठी त नागरीक व सेवा भावी संस्थेगचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळे दरम्याचण सीएससी केंद्र चालकांना अॅग्रीस्टॅरक आज्ञावली वापराचे प्रशिक्षण देण्याित आले.   

अॅग्रिस्टॅक योजनेचे फायदे

थेट सरकारी अनुदान व मदत- पीएम किसान सन्मान निधी  दरवर्षी थेट बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल. तसेच पीक विमा, पीक कर्ज मंजुरी, कृषी अनुदान, खत व बियाणे योजनेचा जलद लाभ मिळणार आहे.

आधुनिक शेतीसाठी मदत

हवामान अंदाज, आधुनिक शेती सल्ला आणि बाजारभाव माहिती,मृदा परीक्षण व खत सल्ला राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व कृषी योजनांमध्ये प्राधान्य नवीन कृषी तंत्रज्ञान, अवजारे आणि सिंचन योजना, शेततळे, ठिबक सिंचन, गटशेती योजनेतील लाभ,गटगटवारी नोंदणी व शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीसाठी हे महत्वाचे ठरणार आहे.

दिनांक 8 ते 13 मार्च 2025 पर्यंत तालुक्याषतील सर्व गावात फार्मर आयडी तयार करण्यारसाठी सीएससी केंद्रा मार्फत विशेष शिबिर आयोजित करण्या त आले आहे.  गावातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांकचे फार्मर आयडी तयार करण्याशचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्याव वतीने करण्या्त आले आहे. 

या कार्यशाळेत निवासी उपजिल्हायधिकरी महेश वडदकर, तहसिलदार नांदेड संजय वारकड यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी चातरमल, प्रभारी गटविकास अधिकारी नारवटकर,  निवासी नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार महसूल नायब तहसीलदार काशिनाथ डांगे,  तालुका पुरवठा अधिकारी रवींद्र राठोड उपस्थित होते.

00000






  वृत्त क्रमांक 267

जिल्ह्यात आजपासून ॲग्रीस्टॅक नोंदणी सप्ताह

• प्रत्येक गावात शिबिर, नोंदणीसाठी करु नका उशिर 

• ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड दि. 7  मार्च  :- शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषि क्षेत्रात डिजीटल क्रांती घडविण्यासाठी शासनाने ॲग्रीस्टॅक योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीची सुरवात झाली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी 8 ते 13 मार्च 2025 या कालावधीत ॲग्रीस्टॅक विशेष नोंदणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी मोफत असून शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.  

या सप्ताहात प्रत्येक गावात नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल, कृषी व जिल्हा परिषद यांचे संयुक्त पथक गावनिहाय गठीत करण्यात आले आहे. 

अशी होणार नोंदणी

आधारकार्ड, आधारलिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा ( जमीनीचा दाखला)घेऊन शेतकऱ्यांनी सीएससी सेंटर ( कॉमन सर्व्हिस सेंटर) च्या सहकार्याने आपली नोंदणी पूर्ण करावी. 

ॲग्रीस्टॅक नोंदणीचे असे आहेत फायदे

विविध सरकारी अनुदान व आर्थिक मदत जसे पीएम किसान सन्मान निधी होणार थेट बँक खात्यात जमा. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी लागणार नाहीत अनावश्यक कागदपत्रे. पीककर्ज मंजुरी होणार जलद गतीने. खत, बियाणे व औषधांसाठी अनुदान मिळणार सुलभतेने, असे विविध फायदे या ॲग्रीस्टॅक नोंदणीचे आहेत.  तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

00000

   वृत्त क्रमांक 266

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड दि. 7 मार्च :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 11 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

०००००

  वृत्त क्रमांक 265

प्रलंबित ई-चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 22 मार्च रोजी  

आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन 

नांदेड दि. 7  मार्च  :- शनिवार 22 मार्च 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन , ई-चालन या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 22 मार्च 2025 रोजी लोकअदालत आयोजित केली आहे. 

तरी या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित केलेल्या या लोकअदालतीमध्ये वाहनचालक, मालक यांनी हजर राहावे. तसेच तडजोड पध्दतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा व सर्वानी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. 

00000

 विशेष वृत्त क्रमांक 264 

आत्मनिर्भर व स्वावलंबी महिलांनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा !

शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन कर्तव्यपूर्ती करणाऱ्या महिला   

नांदेड दि. 7  मार्च  :- घर व नोकरी यात ताळमेळ ठेवून महिला आनंदाने आपले कर्तव्य पार पाडतात. दोन्ही आघाडीवर आपले कर्तव्य बजावताना आपल्या कर्तव्यामुळे समाज उपयोगी कामे कशी कशोसीने पार पडतील याची काळजी त्या घेत आहेत. शासनाच्या विविध योजनाची माहिती सामान्य नागरिकांना व्हावी याबाबत त्या घरोघरी जावून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी असून अशा काही मोजक्या महिला प्रतिनिधीच्या बोलक्या प्रतिक्रिया महिला दिनाच्या निमित्ताने येथे मांडण्यात आल्या आहेत.  

बिलोली तालुक्यातील प्रा. आरोग्य केंद्र कुंडलवाडी येथे कार्यरत असलेल्या आशा वर्कर शेख समरीन या आयुष्यमान कार्ड तयार करण्याचे काम करतात. आतापर्यंत त्यांनी काढलेल्या आयुष्मान कार्ड पैकी तीन लोकांना या कार्डमुळे लाभ मिळाला आहे. ह्दयरोग, अपेडिक्स शस्त्रक्रीया, अपघात झालेल्या तीन रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. यामुळे त्यांनी त्यांच्या कामाप्रती समाधान व्यक्त केले असून महिला दिनानिमित्त त्यांनी इतर महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.     

आश्विनी प्रकाश सुर्यवंशी उमरी तालुक्यातील सिंधी प्राथमिक आरोग्यकेंद्रात  त्या आशा कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहेत. आयुष्यमान भारत योजना ही नागरिकांच्या फायद्याची असून लोकांचे आयुष्यमान वाढवणारी योजना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत या योजनेत एका रुग्णांची ह्दयाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच महिलांनी स्वत: शिक्षण घेवून नोकरी व घर सांभाळत आत्मनिर्भर होण्याचे मार्गदर्शन त्यांनी महिला दिनानिमित्त  केले आहे.  

मुदखेड तालुक्याच्या शंखतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रोही पिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात जयश्री मेळगावे या आशा वर्कर म्हणून काम करतात. आभा कार्डसह इतर आरोग्यविषयक कार्ड नागरिकांना मिळवून देण्यासाठी त्या घरोघर भेटी देतात. तसेच कार्ड बनवून देण्याची कार्यवाही करतात. यामुळे लोकांना यांचा आरोग्यविषयक उपचार मोफत मिळून यांच्या कामामुळे अनेक गरजू व गरीब कुटुंबाला याचा लाभ मिळतो. त्यामुळे त्यांच्या कामाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. 

घरकुलाचा 15 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळालेला असून यामुळे आमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती कामठा बु. येथील महिला लाभार्थी शोभा दुधमल  यांनी दिली. याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. 

सोनी किशन काळे, ता. बिलोली प्रा. आरोग्य केंद्र कुंडलवाडी अंतर्गत सावळी या या आरोग्य केंद्रात कार्यरत आशा वर्कर कार्यरत आहेत. गोल्डन कार्डबाबत नागरिकांना माहिती देवून लोकांना हे कार्ड काढण्याविषयी प्रवृत्त केले. या गावात या योजनेत दोन लोकांनी या योजनेत मोफत उपचार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.  

दुसरा लाभार्थी किडनी स्टोनचा रुगणांनी लाभ घेतला आहे. गावात घरोघरी जावून आरोग्यविषयक मोफत उपचार व कार्डबाबत माहिती देण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

00000







 आज आवश्यक

विशेष वृत्त क्रमांक 263

 जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत 

 महिलांनो ! न घाबरता मोठी स्वप्न बघा ; जिद्दीने पूर्ण करा ! 

 जागतिक महिला दिनाला सीईओ मीनल करनवाल यांचे महिला जगताला आवाहन 

नांदेड, दि. ७ मार्च : महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. घर चालविण्यासाठी काही न करता महिला 50% वाटा उचलत असतात.या श्रमाची प्रतिष्ठा करायला शिका.आत्मसन्मानाला महत्त्व द्या. रूढी,परंपराच्या अडथळ्यांमधून बाहेर पडा, जिद्दीने पेटून उठा. न घाबरता मोठी स्वप्न बघा. यश तुमच्या हातात असेल, असा आशावादी संदेश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देताना दिल्या आहेत.

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज जिल्ह्यातील तमाम महिलांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेश त्यांच्या मुलाखतीत या ठिकाणी देत आहोत. महिलांनी रूढी परंपरांचे जोखड बाजूला ठेवून स्वतःच्या प्रगतीचा मार्ग स्वतः आखावा.आपल्या प्रगतीत आपली मानसिकता अडथळा बनता कामा नये, असा संदेशही त्यांनी या मुलाखतीतून दिला आहे.

प्रश्न : एक महिला अधिकारी म्हणून शासनामध्ये महिलांचा सहभाग अधिक वाढावा आपली इच्छा आहे. यासाठी महिलांनी नेमके काय केले पाहिजे ?

उत्तर : नांदेड सारख्या आदिवासीबहुल भागातील महिलांनी प्रशासनाच्या सेवेमध्ये अगदी आयएएस अधिकाऱ्यांपासून तर खालच्या टप्प्यातील सर्व नोकऱ्यांमध्ये सहभागी व्हावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. कारण महिला सर्वंकष विचार करतात. सर्वांना घेऊन चालतात. त्यांच्या प्रत्येक विचाराला मानवी चेहरा असतो. शेवटच्या घटकावर काय परिणाम होईल याबाबतचा धोरणात्मक संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून असतो. त्या संवेदनशील असतात.ज्या महिलांना अभ्यासात गोडी आहे. मनात जिद्द आहे. समाजासाठी काही करण्याची इच्छा आहे. त्या महिलांनी या परीक्षांकडे वळले पाहिजे, यश निश्चित भेटते थोडे पेशंस ठेवले पाहिजे.

प्रश्न : मुलींच्या स्पर्धा परीक्षांमध्ये बरेच वेळा परिवाराचा दबाव आणि लग्नाचा अडथळा येतो ? या संदर्भात आपण तरुणींना काय सांगाल ? 

उत्तर : यामध्ये दोन गोष्टी सांगेल. लग्नाचा तणाव घेण्यासारखं नाही. लग्न हे होऊन जातच असते. उलट माझे अशा हुशार मुलींच्या पालकांना सांगणे आहे की, तुम्ही मुलींच्या लग्नापेक्षा तिच्या पुढच्या चाळीस वर्षाच्या सुरक्षिततेचा आत्मनिर्भरतेचा विचार करावा. पुढची चाळीस वर्ष ती स्वतःच्या पायावर उभी राहील आणि तिचे आयुष्य सुकर होईल, हे लक्षात घ्यावे. लग्न हे तात्कालीक आहे. मात्र आयुष्य पुढेही असते. त्यामुळे मुलीचा कल, तिची हुशारी लक्षात घेऊन तिला स्पर्धा परीक्षांसाठी मदत करावी, अशी विनंती मी पालकांना करते. तसेच महिलांना मी सांगते जे माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं...स्पर्धा परीक्षा ये कोई पहाड़ नही है... करने वाली बात है...त्यामुळे एकदा जर निर्धार केला असेल तर तो पूर्ण करा. बाकी आयुष्य सगळं व्यवस्थित चालू राहणार आहे. डोक्यातून या परीक्षा कठीण असतात हे भूत काढून टाका. फक्त एक सिल्याबस असतो. तो पूर्ण करायचा असतो. विश्वास महत्वाचा आहे.कोचिंग, तुम्ही कुठे राहता. गरीब, श्रीमंत याला काहीच अर्थ नाही. ही क्षमता असल्यास कोणत्याही टप्प्यावर सर्व गोष्टी शक्य आहे.

प्रश्नः गेल्या दीड वर्षात जिल्हा परिषदेमार्फत महिलाविषयक कोणते प्रमुख कार्य केले जात आहे. कोणत्या योजनांना प्राधान्य दिले जात आहे. कोणत्या अभिनव योजना राबविण्यात आल्या आहे? 

उत्तर : 2019 पासून महिलांसाठी आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुली -महिलांना एक्सपोजर भेटणे आहे. यामध्ये उल्लेखनीय उपक्रम म्हणजे या जिल्हा परिषदेने राबविलेला बालिका पंचायत ! गावागावात आम्ही बालिका पंचायत सुरू केली. त्यामुळे मुलींना बाहेरच जग बघायला मिळाले. एका मुलीची मी स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांची भेट घालून दिली. या मुलीने नांदेडचे एअरपोर्ट देखील बघितले नव्हते. मुलींना बाहेरच जग माहिती झालं तर त्यांच्या पंखात बळ येईल. या उपक्रमातून त्यांना ग्रामपंचायत कशी चालते, ग्रामपंचायतसाठी निधी कुठून येतो.तहसील कार्यालय काय असते, आपली जिल्हा परिषद कशी दिसते, तिची रचना काय असते. या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. किशोर वयात असणाऱ्या मुलींच्या किमान तीन-चार बॅचेस आता जिल्ह्यामध्ये अशा आहेत की त्यांच्या मनामध्ये पंचायत राज व्यवस्था, राज्य शासन शासन व्यवस्था, याबद्दलच्या भूमिका तयार झाल्या आहेत. या तुकड्या जश्या जशा पुढे जातील तशी तशी त्यांची याबाबतीतली जिज्ञासा वाढत जाईल. या उपक्रमाला नांदेडच्या पुरुष सरपंचांनी खूप छान प्रतिसाद दिला. प्रत्येक गावात महिला पंचायत पुढे मुलींना अधिक चांगले मोकळे आकाश झाले...

आयटी मुंबई सोबत आम्ही गरोदर महिलांचा एक प्रशिक्षण घेतला.या काळातल्या सकस आहाराबाबत महिलांना त्यामुळे मार्गदर्शन झाले. जंक फूड टाळणे,स्तनपान, याबाबत मार्गदर्शन झाले आहे.

प्रश्न : महिलांच्या सशक्तीकरणामध्ये सर्वाधिक अडथळा कोणता आहे ?आणि त्यावर उपाययोजना काय आहे ? 

उत्तर : महिलांच्या प्रगतीमध्ये जर कोणी अडथळा असेल तर त्या महिलाच आहे. हे माझे प्रामाणिक मत आहे...आणि मी अतिशय स्पष्टपणे हे मत मांडते. एक उदाहरण सांगायचं म्हणजे एक गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी जायला महिला सरपंच तयार होत नाही. आपलं गाव सोडून आपण प्रवास करू शकत नाही. आणि पदसिद्ध हक्क बजावू शकत नाही. हे काही योग्य नाही. आता नव्या मानसिकतेने काम करणे आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये महिला सरपंच आहेत त्या गावातील महिलांनीच माझे स्वागत केले पाहिजे असा मी दंडक घातला आहे. 50% भागीदारी महिलांना आता प्रत्येक क्षेत्रात मिळणार आहे. त्यामुळे हा संकोच, ही भीती महिलांनीच दूर करून आपणही सर्व क्षेत्रातील 50 टक्क्यांचे वाटेकरी आहोत. हा आपला अधिकार आहे. हा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. यासाठी कोणीही पुढे येणार नाही. महिलांनाच पुढे यावे लागणार आहे.

दुसरे म्हणजे मला असे वाटते की आत्मसन्मान हा मनामध्ये तयार झाला पाहिजे. तुम्ही खूप चांगले काम करता तुम्ही घरातले 50% काम करतात. मात्र त्याचे क्रेडिट स्वतःकडे घ्यायला घाबरतात. म्हणजेच यामध्ये अडथळे कोण आहे तुम्ही स्वतःच आहात ना ? लखपती दीदी सारख्या उपक्रमामध्ये अनेक महिलांनी लाखो रुपयांचे भाग भांडवल उभारले आहे. या लाखो रुपयांतून एक आत्मविश्वास निर्माण होतो तो आत्मविश्वास प्रत्येक महिलेमध्ये निर्माण होणे काळाची गरज आहे.

प्रश्न : महिला बचत गटांना बळकटी आणण्यासाठी जिल्हा परिषदेने कोणते उपक्रम राबविले. त्यासाठी जिल्ह्यात काय काय उपाययोजना सुरू आहेत ? 

उत्तर : महिलांनी नैसर्गिक शेतीतून बनवलेले अनेक दर्जेदार उत्पादन आहेत. त्या उत्पादनांना चांगला बाजार मिळावा ,अशी माझी इच्छा होती आणि त्यातून आपण तालुक्याच्या ठिकाणी त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुपर मार्केटमध्ये या उत्पादनांना आता जागा मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या ठिकाणी ही आम्ही त्यांना गाळे मिळेल असे प्रयत्न करीत आहोत.

प्रश्न : आज जागतिक महिला दिन आपल्यासारख्या उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्यांचा जिल्ह्यातील समस्त महिलांना काय संदेश असेल ? 

उत्तर : माझं सर्वांना सांगणं आहे की, 50% अशा महिला आहेत ज्यांनी आपल्या घराची 50% जबाबदारी घेतलेली आहे. तुमची ही जबाबदारी घेणे याचे मूल्य समजून घ्या.

 दुसरे असे की, लग्नाला उशीर होतोय.या कारणामुळे मुलींनी आपल्या भविष्याची तडजोड करू नये.लग्न दोन वर्षांनी उशिरा झाल्याने काहीही बिघडत नाही.

तिसरे म्हणजे, सर्व मुलींनी मोठी स्वप्न बघणे सुरू करावे.छोटी स्वप्न बघायचीच नाही. छोटी स्वप्न बघाल तर हाती काही लागणार नाही. मोठी स्वप्न बघा... आणि त्यासाठी सगळे दोर तोडून आपल्या उद्दिष्टांवर तुटून पडा.भारताचे माजी राष्ट्रपती ऐपीजी अब्दुल कलाम यांनी देखील हेच आवाहन केले होते की,तुमच्या स्वप्नांमध्ये बळ असायला हवे, मोठे स्वप्न यश तुमच्या मागे धावत येईल.

0000