Friday, March 7, 2025

  वृत्त क्रमांक 267

जिल्ह्यात आजपासून ॲग्रीस्टॅक नोंदणी सप्ताह

• प्रत्येक गावात शिबिर, नोंदणीसाठी करु नका उशिर 

• ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड दि. 7  मार्च  :- शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषि क्षेत्रात डिजीटल क्रांती घडविण्यासाठी शासनाने ॲग्रीस्टॅक योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीची सुरवात झाली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी 8 ते 13 मार्च 2025 या कालावधीत ॲग्रीस्टॅक विशेष नोंदणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी मोफत असून शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.  

या सप्ताहात प्रत्येक गावात नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल, कृषी व जिल्हा परिषद यांचे संयुक्त पथक गावनिहाय गठीत करण्यात आले आहे. 

अशी होणार नोंदणी

आधारकार्ड, आधारलिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा ( जमीनीचा दाखला)घेऊन शेतकऱ्यांनी सीएससी सेंटर ( कॉमन सर्व्हिस सेंटर) च्या सहकार्याने आपली नोंदणी पूर्ण करावी. 

ॲग्रीस्टॅक नोंदणीचे असे आहेत फायदे

विविध सरकारी अनुदान व आर्थिक मदत जसे पीएम किसान सन्मान निधी होणार थेट बँक खात्यात जमा. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी लागणार नाहीत अनावश्यक कागदपत्रे. पीककर्ज मंजुरी होणार जलद गतीने. खत, बियाणे व औषधांसाठी अनुदान मिळणार सुलभतेने, असे विविध फायदे या ॲग्रीस्टॅक नोंदणीचे आहेत.  तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आनंद पाटील बोंढारकर यांनी यावेळी भाविकांना शुभेच्छ...