Monday, December 18, 2023

 वृत्त क्र. 871 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवरी 2024  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

वृत्त क्र. 870

मुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्यासाठी

लेक लाडकी योजना प्रभावीपणे राबवा

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे या उद्देशाला साध्य करणारी लेक लाडकी योजना शासनाने आणली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना महत्त्वपूर्ण म्हणून पाहिली जाते. 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्माला आलेल्या दोन मुलीसाठी ही योजना अनुज्ञेय आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, इयत्ता पहिलीत मुलगी गेल्यावर 6 हजार, सहावीत गेल्यावर 7 हजार, अकरावीत 8 हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये असे एकुण 1 लाख 1 हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते. ही योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. 

श्रीक्षेत्र माहुरगड येथील श्री रेणुका देवी, श्री दत्त शिखर संस्थान येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या योजनांबाबत आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, जिल्हा माहिला व बालकल्याण विकास अधिकारी रमेश कांगणे व इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी पोषण माह, बेटी बचाओ-बेटी पढाओ, माझी मुलगी माझा अभिमान याबाबत माहिती घेतली. महिला बचतगटाच्या माहूरगड येथील स्टॉलला त्यांनी भेट दिली.

00000



 










वृत्त क्र. 869

 शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  नांदेड जिल्ह्यातील शस्‍त्र परवानाधारकांनी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचेमार्फत निर्गमीत / अभिलेखात नोंद असलेले शस्‍त्र परवाने ज्‍याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2023  रोजी संपुष्‍टात येत आहे. अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा.  

परवानाधारकाने आपला शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नियमानुसार नुतनीकरण शुल्‍क (चलनाने) शासन जमा करावे, आपले शस्‍त्र परवान्‍यात नमूद असलेल्या अग्निशस्‍त्राची पडताळणी या कार्यालयात करुन, विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅनकार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे 20.12.2023 पासून संबंधित विभागात दाखल करावायाबाबत सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावीअसे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...