Sunday, January 6, 2019


जागतिक शौचालय दिनानिमित्त
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे भरीव यश
सांगली, कोल्हापूर, नांदेड व वर्धा जिल्ह्यांचा सन्मान

मुंबई दि. 6 : केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्या 12 जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याने 11 वा क्रमांक पटकावला आहे; तर विशेष सहभागाबद्दल पहिल्या 30 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, नांदेड आणि वर्धा या तीन  जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनानिमित्त 9 ते 19 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देशातील 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 412 जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण जिल्ह्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला आहे. यामध्ये सांगली तसेच कोल्हापूर, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांनी यश मिळविले आहे. या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अभिनंदन केले आहे. 
केंद्र सरकारने मागील काही वर्षात सातत्याने आयोजित केलेल्या विविध उपक्रम आणि स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविलेले आहे. यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018’ मध्ये राज्यातील सातारा जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर राहिला. याशिवाय नाशिक आणि सोलापूर हे जिल्हे पुरस्कृत झाले. ‘स्वच्छता ही सेवा उपक्रमातही महाराष्ट्र सर्वोच्च स्थानी राहिला आहे. राज्याच्या ग्रामीण स्वच्छतेमध्ये शाश्वतता राहावी यासाठी सर्व जिल्हा परिषदांकडून भरीव प्रयत्न सुरू आहेत.
केंद्र सरकारने दिनांक 1 जानेवारी 2019 पासून ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ या स्पर्धेची सुरूवात केली आहे. यामध्ये शौचालय रंगकाम आणि त्यांची स्वच्छता या बाबींचा समावेश आहे. या स्पर्धेतही राज्यातील सर्व जिल्ह्यात जनतेचा सक्रिय सहभाग राहील व  राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल होईल, असा विश्वास श्री. लोणीकर आणि श्री. खोत यांनी व्यक्त केला आहे.
००००


सण, उत्सवात ध्वनी वापराची
अधिसूचना निर्गमीत 
नांदेड, दि. 6 :-  ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2019 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केली आहे.
या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, दिवाळी, ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबरसाठी एक दिवस. गणपती उत्सव दोन दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव तीन दिवस ( पहिला दिवस, अष्टमी व नवमी ) तर  उर्वरित तीन दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल.
या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना आदेश 3 जानेवारी 2019 रोजीपासून नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे, असेही अधिसूचनेत नमुद केले आहे.
000000


एमजीएम महाविद्यालयात दर्पण दिनाचे आयोजन

नांदेड दि. 6 :- एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. एमजीएम महाविद्यालय नांदेड येथे दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुनिल ढेपे, दै. लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक, लोकमतचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के यांची उपस्थिती राहणार असून वर्तमान काळातील पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि डिजिटल मीडियाचा प्रभाव या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...