Friday, December 6, 2024

राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ स्पर्धा उत्साहात संपन्न

  वृत्त क्र. 1167

राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ स्पर्धा उत्साहात संपन्न


नांदेड दि. 6 डिसेंबर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन यांचे सहकार्याने सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा 3 ते 5 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे संपन्न झाली.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे हे तर प्रमुख अतिथी म्हणुन तालुका क्रीडा संयोजक, नायगांव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक जीवन पवार,  क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, निवड समिती सदस्य गणेश माळवे, निवड समिती सदस्य दर्शन हस्ती,  निवड समिती सदस्य रवीकुमार बकवाड, क्रीडा शिक्षक विनोद जमदाडे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत पुणे व नाशिक विभागाचे  वर्चस्व राहीले असून स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे.  
14 वर्षे मुले-  प्रथम- पुणे विभाग,  द्वितीय- नाशिक विभाग व तृतिय- नागपूर विभाग
14 वर्षे मुली-  प्रथम- पुणे नाशिक,  द्वितीय- पुणे विभाग व तृतिय- मुंबई विभाग

तसेच या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंची राष्ट्रीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे हे तर प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती बगाटे अलंकृता या उपस्थित होत्या. स्पर्धेमध्ये हार-जीत होत असते निवड न झालेल्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत आपली कामगीरी उत्कृष्ट कशी करता येईल याकरिता चांगला सराव केला पाहीजे तसेच राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झालेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी करुन राज्याचे नाव उज्वल करावे, असे श्रीमती बगाटे अलंकृता यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले.




राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
14 वर्षे मुले संघ– समरजीत सुजीत कदम (पुणे विभाग), शिवराज संजय सोले (छ.संभाजीनगर विभाग), प्रणव डाडाहारी डातीर (नाशिक विभाग), अनमोल सुरेंद्र मुखर्जी (नागपूर विभाग), आदित्य विलास पांगरेकर (लातूर विभाग) राखीव खेळाडू- 1) अथर्व दिगंबर तोडकरी (पुणे), 2) विराज जयदिप तांबवेकर (कोल्हापूर),  3) गणेश सचिन शिंदे (छ.संभाजीनगर)

14 वर्षे मुली संघ–वेदिका नितील महाले (नाशिक विभाग), भक्ती प्रभाकर नागणे  (पुणे विभाग), समृदी धनाजी काळोखे (मुंबई विभाग), जेसिका प्रमोद काळे (अमरावती विभाग), मानसी विजय कुलकर्णी (संभाजीनगर विभाग) राखीव खेळाडू- 1) सृष्टी गणेश जागीरवाड (लातूर), 2) समृध्दी रोशन जाधव (नाशिक),  3) मैथली सुरेश धस  (छ.संभाजीनगर)

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमर टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, .चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, क्रीडा अधिकारी विपुल दापके, वरिष्ठ लिपिक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपिक दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व सेपकटाकरॉ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदीनी सहकार्य केले .
00000

हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही तंबाखू विक्रेत्यांना 8 हजार 500 रुपयांचा दंड आकारला

  वृत्त क्र. 1166

हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

तंबाखू विक्रेत्यांना 8 हजार 500 रुपयांचा दंड आकारला
                                                                                                                                                                                       नांदेड दि. 6 डिसेंबर :- हदगाव शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 5 डिसेंबर 2024 रोजी हदगाव शहरात अचानक धाडी टाकून एकूण 18 तंबाखू विक्रेत्यांना  8 हजार 500  रुपये दंड आकारण्यात आला.

ही कार्यवाही  जिल्हाधिकारी अभिजित राऊत,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे,  दंत शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र तोष्णीवाल, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, समुपदेशक चक्रधर गुदप्पे तसेच हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्सटेबल सुरेश तुप्पेकर उपस्थित होते.



सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

 वृत्त क्र. 1165

जिल्ह्यात आजपासून

100 दिवसीय क्षयरोग मोहीमेस सुरुवात
                                                                                                                                                                                  नांदेड दि. 6 डिसेंबर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उद्यापासून 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम दिनांक शनिवार 7 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणार असून 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2025 रोजी संपणार आहे. या मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या 100 दिवसीय क्षयरोग  मोहिमेमध्ये सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच  सन 2025 पर्यंत जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे .

या मोहीमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोगाविषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, जिल्हयातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांची पंतप्रधान क्षय मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे असा आहे.
 
100 दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील 347 निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.  यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीमेमध्ये जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आह. नि-क्षय शिबीर, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत ऊस तोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. ही मोहीम राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी , सामाजीक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व इतर विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम Intensified case finding ( ICF) प्रकारची मोहीम असल्यामुळे केवळ अति जोखमेच्या व्यक्तीमध्येच राबविण्यात येणार आहे.

*मोहीमेचा उद्देश*

अति जोखमीच्या गटातील व्यक्तीमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती राबवून क्षयरोग रुग्ण शोधणे, क्षय रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करणे, टीपीटीचा प्रभावी वापर करून नवीन क्षय रुग्णाचे प्रमाण कमी करणे. जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे. नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे.  वंचित व अति जोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे. समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे. जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांची पंतप्रधान क्षय मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे अशा स्वरूपाचे आहे .

*अति जोखमीचे गट पुढीलप्रमाणे*

साठ वर्षावरील व्यक्ती, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती,  धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती, क्षय रुग्णांच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती, एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती, तुरुंगातील कैदी, निवासी शाळा, औद्योगिक वसाहती/ कारखाने, वृद्धाश्रम, बी एम आय 18 पेक्षा कमी असणाऱ्या व्यक्ती, झोपडपट्टी, अनाथ आश्रम, औद्यगिक वसाहत मधील कामगार इत्यादी.

ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून उपकेंद्र, प्रा.आ.केंद्र, तालुकास्तर व जिल्हास्तरीय आरोग्य विभाग सज्ज झाला असून शोधलेल्या प्रत्येक संशयित क्षय रुग्णाची स्पूटम तपासणी व एक्स-रे तपासणी करून घेण्यात येणार आहे . जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी या मोहिमेचे प्रभावी सनियंत्रण व पर्यवेक्षण करणार आहेत .

या मोहिमेमध्ये शोधलेल्या प्रत्येक क्षयरुग्णांना त्वरित उपचार चालू करावा व पल्मोनरी क्षय रुग्णांच्या संपर्कातील पात्र व्यक्तींची सी.वाय.टीबी (CY -TB) तपासणी करून त्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना टीपीटी चालू करण्यात येईल .

जिल्हाभरात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड संपूर्ण आरोग्य विभाग कार्यान्वित असणार आहे . नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद देऊन मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे .
00000

  #मकरसंक्रांत च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!