Friday, December 6, 2024

 वृत्त क्र. 1165

जिल्ह्यात आजपासून

100 दिवसीय क्षयरोग मोहीमेस सुरुवात
                                                                                                                                                                                  नांदेड दि. 6 डिसेंबर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उद्यापासून 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम दिनांक शनिवार 7 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणार असून 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2025 रोजी संपणार आहे. या मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या 100 दिवसीय क्षयरोग  मोहिमेमध्ये सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच  सन 2025 पर्यंत जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे .

या मोहीमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोगाविषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, जिल्हयातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांची पंतप्रधान क्षय मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे असा आहे.
 
100 दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील 347 निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.  यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीमेमध्ये जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आह. नि-क्षय शिबीर, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत ऊस तोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. ही मोहीम राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी , सामाजीक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व इतर विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम Intensified case finding ( ICF) प्रकारची मोहीम असल्यामुळे केवळ अति जोखमेच्या व्यक्तीमध्येच राबविण्यात येणार आहे.

*मोहीमेचा उद्देश*

अति जोखमीच्या गटातील व्यक्तीमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती राबवून क्षयरोग रुग्ण शोधणे, क्षय रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करणे, टीपीटीचा प्रभावी वापर करून नवीन क्षय रुग्णाचे प्रमाण कमी करणे. जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे. नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे.  वंचित व अति जोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे. समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे. जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांची पंतप्रधान क्षय मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे अशा स्वरूपाचे आहे .

*अति जोखमीचे गट पुढीलप्रमाणे*

साठ वर्षावरील व्यक्ती, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती,  धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती, क्षय रुग्णांच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती, एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती, तुरुंगातील कैदी, निवासी शाळा, औद्योगिक वसाहती/ कारखाने, वृद्धाश्रम, बी एम आय 18 पेक्षा कमी असणाऱ्या व्यक्ती, झोपडपट्टी, अनाथ आश्रम, औद्यगिक वसाहत मधील कामगार इत्यादी.

ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून उपकेंद्र, प्रा.आ.केंद्र, तालुकास्तर व जिल्हास्तरीय आरोग्य विभाग सज्ज झाला असून शोधलेल्या प्रत्येक संशयित क्षय रुग्णाची स्पूटम तपासणी व एक्स-रे तपासणी करून घेण्यात येणार आहे . जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी या मोहिमेचे प्रभावी सनियंत्रण व पर्यवेक्षण करणार आहेत .

या मोहिमेमध्ये शोधलेल्या प्रत्येक क्षयरुग्णांना त्वरित उपचार चालू करावा व पल्मोनरी क्षय रुग्णांच्या संपर्कातील पात्र व्यक्तींची सी.वाय.टीबी (CY -TB) तपासणी करून त्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना टीपीटी चालू करण्यात येईल .

जिल्हाभरात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड संपूर्ण आरोग्य विभाग कार्यान्वित असणार आहे . नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद देऊन मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे .
00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक  441 उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा दौरा  नांदेड दि. 27 एप्रिल :- राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उप...