Thursday, December 5, 2024

वृत्त क्र. 1164

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम व सीवाय टीबी टेस्टचे उदघाटन

क्षयरुग्ण संपर्कातील व्यक्तींची संसर्गिक तपासणी व औषधोपचार होणार –मीनल करणवाल

नांदेड दि. 5 डिसेंबर :  फुफ्फुसाशी संबंधित क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्षयरोगाचा संसर्ग झाला आहे काय याबाबतची तपासणी करून त्यांना रोगप्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात येणार आहे. या आरोग्यसेवेचा व जंतनाशक मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले.

मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हास्तरीय सीवाय टी बी टेस्ट व जंतनाशक मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ह्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आरोग्य संबंधीच्या सेवा त्यांच्या राहत्या गावातूनच मिळाव्यात म्हणून सी वाय टी बी टेस्ट व जंतनाशक गोळ्याचे वितरण सारख्या आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. हे क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या कामी महत्वपूर्ण पाऊल असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे गरजूवंताना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तरी गरजु रुग्णांनी या आरोग्य सेवा उपलब्ध करुन घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. 

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कासराळीकर , शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी,  आरोग्य कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

00000




No comments:

Post a Comment

12.1.2025

 संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समिती विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ सायन्स कॉलेज च्या संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडू ...