वृत्त क्र. 425
टंचाई निवारणाची कामे लोकसहभागातून हाती घ्यावीत
-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
• आंदेगाव येथील नाला खोलीकरणाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ
नांदेड दि. 15 :- नांदेड जिल्ह्यात टंचाई निवारण व मान्सून पूर्व कामे प्राधान्याने सुरु आहेत. टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेवून उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाना देत आहेत. पिण्यासाठी व पिकांना मुबलक पाणी मिळावे यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात जलसंधारणाची व तलाव, नाल्यातील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकून यातून शेतजमीन सुपीक होण्यास मदत होईल. यासाठी नागरिकांनी लोकसभागातून अशी कामे मोठया प्रमाणात हाती घ्यावीत. अशा कामांना शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थामार्फत सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.
हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे लोकसहभागातून आज नाला खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विनोद गड्डमवार, किनवटचे उपविभागीय कृषि अधिकारी आर.डी. रणवीर, हिमायतनगरच्या तहसिलदार पल्लवी टेमकर, तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव, कृषि अधिकारी निलेश वानखेडे, कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक व गावातील संरपंच कांताबाई विठ्ठल वाढवे, पोलीस पाटील मारोती निळकंठे तसेच सेवा मंडळाचे पदाधिकारी व समस्त गावकरी आदींची उपस्थिती होती.
आंदेगाव या गावाचे भौगोलिक क्षेत्र 973.35 हेक्टर असून पेरणी लायक क्षेत्र 937.4 हेक्टर आहे. या गावशिवारात ज्वारी, तूर, मुग, उडीद, सोयाबिन, कापूस, हळद, ऊस, गहू, हरभरा, मका, केळी व तीळ, भुईमूग इत्यादी पिकांची लागवड होते. लघुपाटबंधारे विभागाने आंदेगाव व दरेसरसम या गावाच्या सीमेवर दरेसरसम पाझर तलावाचा सांडवा आंदेगाव शिवारातील नाल्यामध्ये सोडला आहे. या नाल्यात पाणी सोडल्यामुळे गाळ साचून नाला उथळ झाला आहे. नाल्यातील पाणी उपजावू व पिकावू जमीनीवर वाहते व पिकाचे दरवर्षी खरिपात नुकसान होत होते. त्यावर लोकसहभागातून गावकरी, शेतकरी, कृषि विभाग यांच्या समन्वयातून गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सहकार्यातून गाळ काढण्याचा नियोजन करण्यात येवून या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच या कामाला सर्व शासकीय यंत्रणेचे व एनजीओचे सहकार्य राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000