Tuesday, June 29, 2021

 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतले श्री रेणुका देवी मंदिराच्या पायरीवर दर्शन     

 नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे माहूर येथे आले असतांना त्यांनी अत्यंत साधेपणाने व कोविड-19 नियमांचे पालन करत माहूर शक्तीपीठ असलेल्या श्री रेणुका देवी मंदिराच्या पायरीचे दर्शन घेतले. नागरिकांनी कोविड-19 नियमांचे पालन करण्याचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी त्यांच्या सोबत तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर, माजी आमदार प्रदीप नाईक उपस्थित होते. यावेळी भाव तिथे देव, ही संतांची वाणी असल्याचे त्यांनी सांगीतले. 

श्री रेणुकादेवी मंदिराचे पायरीवर माहूर तहसिलदार तथा संस्थानचे पदसिद्ध कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगावकर यांनी मंत्री जयंत पाटील यांना शाल श्रीफळ प्रसाद देऊन यथोचित स्वागत केले. यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी श्री दत्तशिखर संस्थान येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी दत्त शिखर संस्थानचे अध्यक्ष परमपुज्य श्री महंत महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचेसोबत सचिव श्री पाटील उपस्थित होते.

00000



 

 

 

जिल्ह्यात नवीन कोरोना बाधित नाही तर  9 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 492 अहवालापैकी 1 हजार 476 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. आज एकही नवीन पॉझिटिव्ह बाधित आढळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ही  91 हजार 231 एवढी झाली असून यातील 88 हजार 597 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 138 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 904 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 9 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मुखेड कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत 2, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 138 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 21,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  4, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 51, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 49, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 129 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 5 हजार 440

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 2 हजार 589

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 231

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 597

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 904

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.11 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-86

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-138

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4                       

00000

 

अनुसूचित जातीमधील कोरोनामुळे मृत्त व्यक्तींच्या कुटुंबासाठी स्माईल योजना 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- अनुसूचित जातीमधील कुटूंब प्रमुखाचे कोविड-19 मुळे निधन झालेल्या कुटूंबाना आर्थिंक व सामाजिक आधार देण्यासाठी एनएसएफडीसी योजनेंतर्गत स्माईल योजना राबविण्यात येत आहे. मृत्यू पावलेल्या कमवत्या व्यक्तीचे वय 18 ते 60 या दरम्यान असणे आवश्यक आहे.  या योजनेअंतर्गत 1 ते 5 लाख रुपयापर्यंत कर्ज वितरीत करण्यात येणार आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या https://forms.gle/7mG8MecLknWGt6K7  या लिंकवर किंवा जिल्हा कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 

एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविड-19 या प्रादुर्भावामुळे अनूसूचित जातीच्या कुटूंब प्रमुखांचा मृत्यू झाला आहे. त्या कुटूंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी स्माईल ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेच्या माहिती, अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. तपशील प्रकल्प मूल्य 1 ते 5 लाख रुपयापर्यंत यामध्ये एनएसएफडीसी 80 टक्के सहभाग तर भांडवल अनुदान 20 टक्के आहे. व्याजदर 6 टक्के असून परतफेडीचा कालावधी 6 वर्षाचा राहील. 

या योजनेसाठी पात्रता अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख पर्यत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. (कुटुंब प्रमुखांच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखांची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी पुढील पैकी एक दस्ताऐवज आवश्यक आाहे. महानगरपालिका / नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकारणाने दिलेली पावती, एखादा गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक राहिल. 

आवश्यक कागदपत्रात मयत व्यक्तीचे नाव पत्ता, आधारकार्ड, उत्पनाचा दाखला 3 लाखापर्यंत, कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या मृत्युचा दाखला, रेशनकार्ड, वयाचा पुरावा. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या  कुटूंबातील व्यक्तीने वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा दिलेल्या लिंकवर अर्ज करावा, असेही आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

0000

 

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्याचे निर्देश   

नांदेड (जिमाका) दि. 29 :-जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे संचालकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रेलर्स, ट्रक बैलगाड्यांना कापडाचे परावर्तक रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी रिफ्लेक्टिव टेप परावर्तक लावण्यासाठी सर्व साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली. हे रिफ्लेक्टिव टेप ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना लावल्यामळे रात्री होणारे अपघात अपघातात मृत्यूमूखी पडणाऱ्या लोकांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 

ऑलिम्पीक दिन ते ऑलिम्पीक स्पर्धा खेळाडूंना प्राधान्याने लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- ऑलिम्पीक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पीक दिन ते ऑलिम्पीक समाप्ती पर्यंत नांदेड जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे प्रत्येक तालुक्यातील 18 वर्षावरील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्राधान्याने लसीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ऑलिम्पीक स्पर्धेत सहभागी, प्राविण्य प्राप्त झालेले खेळाचे प्रमाणपत्र, आधार कार्डसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आपली नावे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक ॲथलेटीक्सच्या श्रीमती शिवकांता देशमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार यांनी केले आहे.

00000

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...