Saturday, April 20, 2024
वृत्त क्र. 370
मतदानाला 5 दिवस बाकी ;मोबाईलचा जपून
वापर करा !
नांदेडमध्ये पुन्हा एक गुन्हा दाखल ;
आतापर्यंत 6 गुन्हे दाखल
पोलीस प्रशासनाने तपासली साडेचार हजारावर
अकाउंट
मॉनिटरींगची संख्या वाढली ;सोशल मिडियावर
करडी नजर
नांदेड दि. 20 एप्रिलः नांदेड लोकसभा
निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस बाकी असून सोशल मीडियावरील अकाउंट तपासण्याची गती पोलिसांनी
वाढविली आहे. आतापर्यंत साडे चार हजारावर अकाऊंट तपासण्यात आले आहे.सामाजिक स्वास्थ
बिघडवणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची
बदनामी,विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणे अशा पद्धतीच्या पोस्ट
माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मिडिया सेलकडून तपासल्या जात आहे. काल
या संदर्भात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 5 आरोपींवर गुन्हा दाखल
करण्यात आला होता. काल आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह
पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे,विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज
पसरविणे,तेढ निर्माण करणारे, भीतीदायक फोटो प्रसारित करणे,लोकांच्या भावना भडकतील,
ठेच पोहचतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे,
अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे.
काल नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न.141/24 Sec.295(A),505(1)(C),505 (2) भादवी
गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी हिमायतनगर, मुखेड ,माहूर व अर्धापूर ( अर्धापूरमध्ये
एकूण दोन गुन्हे ) या ठिकाणी समाज माध्यमांवरून तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्याबद्दल
गुन्हे दाखल झाले होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आता हा सहावा गुन्हा दाखल झाला
आहे.
उमेदवारांचे खाते तपासल्या जाते
निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे
सर्व फेसबुक व अन्य समाज माध्यमावरील अकाउंट
प्रतिज्ञापत्रात सादर केले आहे. त्यांच्या फेसबुक व अन्य सोशल अकाउंटवरून जाहिरात करताना
त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा काही
पोस्ट परवानगी न घेता आढळल्यास त्याचा सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चाच्या तपशीलात जमा
केला जाणार आहे.
तसेच या निर्धारित सोशल मीडिया अकाउंट
वरून कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये. त्यामुळे उमेदवारांनी
देखील आपले सोशल अकाउंट हँडल करणाऱ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे.
संपर्क साधा
आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 8308274100 हा नंबर दिला असून यावर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 369
मतदार जनजागृतीसाठी कामगाराशी आयुक्तानी साधला संवाद
नांदेड दि. 20 एप्रिल- नांदेड जिल्हा स्वीप कक्षाच्या मतदार जनजागृती अभियानांतर्गत सिडको येथील औद्योगिक वसाहतीतील सुरज ग्रुपच्या कामगारांशी नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी संवाद साधला.
सुरज ग्रुप इंडस्ट्रीजचे रमेश शेठ पारसेवार, राहुल शेठ पारसेवार आणि राम शेट्टी तृप्तेवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व कामगारांना मतदानासाठी एक दिवसाची पगारासहित रजा मंजूर करून भारतीय लोकशाही प्रति आपली जाज्वल्य निष्ठा दाखवली आहे. नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून आपला लोकप्रतिनिधी आपण निवडण्याच्या या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग आवश्यक असून सर्व कामगार, त्यांचे नातेवाईक, मित्र यांनी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपले सरकार आपण ठरू शकतो. आपल्याला आवडणाऱ्या उमेदवाराला आपण मत देऊन भारतीय राज्यघटनेचा आदर करू शकतो असे सांगून त्यांनी पारसेवार आणि तृप्तेवार या उद्योजकांनी कामगारांना दिलेल्या पगारी रजेबाबत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एम. कुलकर्णी यांनी केले. सर्व उपस्थिताना यावेळी मतदान करण्याची शपथ देण्यात आली. यावेळी उपशिक्षणाधिकारी बंडू अमदुरकर, शिक्षण विस्तार अधिकारी आर. एल. आडे, मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे आदी उपस्थित होते.
00000
वृत्त क्र. 368
नायगाव तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहातील
महिलांचा मतदान जागृतीसाठी पुढाकार
नांदेड, दिनांक, 20 एप्रिल- श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष असा भेद न ठेवता भारतीय
राज्यघटनेने मतदानाचा सर्वांना समान अधिकार दिला आहे. त्यासाठी सर्वांनी मतदान करावे
यासाठी नायगाव तालुक्यातील उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहायता समूहातील
महिलांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय
अधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनात नांदेड
लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात
आहे. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी नायगाव येथील शासकीय समाजकल्याण वस्तीगृहात मतदान
जनजागृती निमित्त उमेदच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील उमेदच्या
समुदाय संसाधन व्यक्ती, बँक सखी, पशु सखे, कृषी सखी असे एकूण साठ महिला उपस्थित होत्या.
यावेळी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक
अमोल जोंधळे यांनी मतदानाचे महत्त्व, हक्क व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करून प्रत्येक
गावातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे
असे आवाहन केले. मतदान प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
00000
वृत्त क्र. 367
पूर्ण दिवस सुटी द्या... नाहीतर किमान
2 तास मतदानाला वेळ द्या !
कामगार, मजूर, वेटरपासून , मेकॅनिकपर्यंत
सर्वाना 26 एप्रिलला सवलतीचे आदेश
26 एप्रिल मतदानाचा दिवस
नांदेड, दि. 20 एप्रिलः- येत्या शुक्रवारी
अर्थात 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी
अत्यावश्यक सेवेपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून शेतमजूर, मेकॅनिक, वेटर
या सर्वांना एक तर पूर्ण दिवसाची सुट्टी द्या. अथवा मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत
द्या, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व कामगार आस्थापनांना दिले आहे.
यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालय व
जिल्हा उद्योग कार्यालयामार्फत सर्व आस्थापनाची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये
छोट्या आस्थापनावर असणाऱ्या रोजंदारी कामगारांपासून नियमित वेतन घेणाऱ्या पगारी नोकरदारापर्यंत
सर्वांना ही सवलत मिळाली पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघात 26 एप्रिल
रोजी मतदान होत आहे. नांदेड लोकसभा मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी
यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना
निवडणुकीच्या दिवशी शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी
सुट्टी देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.
या परिपत्रकानुसार सर्व आस्थापना, कारखाने,
दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापकांनी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा
उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे व सहायक कामगार आयुक्त मोहसिन अ. सय्यद
यांनी केले आहे.
ही सुट्टी सर्व आस्थापना, कारखाने,दुकाने,
इत्यादीना लागू राहील. उदा. राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या या मधील आस्थापना,
सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक
उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिग सेंटर, मॉल्स,रिटेलर
इ. अपवादात्मक परिस्थीतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी
देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी
ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.
मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका
आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत
कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना
मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सर्व आस्थापना,कारखाने, दुकाने इत्यादींच्या
मालकांनी , व्यवस्थापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून
मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करणे शक्य न झाल्याबाबची
तक्रार आल्यास , त्यांच्या विरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल . अशा तक्रारीचे
निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.तक्रार निवारणासाठी
नोडल अधिकारी म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ. सय्यद (मो.क्र.7276216066)
तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांचा मो. क्र. +91 9607052810 यांच्याशी संपर्क साधावा
असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...