Saturday, April 20, 2024

वृत्‍त क्र. 370

मतदानाला 5 दिवस बाकी ;मोबाईलचा जपून वापर करा !

नांदेडमध्ये पुन्हा एक गुन्हा दाखल ; आतापर्यंत 6 गुन्हे दाखल

पोलीस प्रशासनाने तपासली साडेचार हजारावर अकाउंट

मॉनिटरींगची संख्या वाढली ;सोशल मिडियावर करडी नजर

नांदेड दि. 20 एप्रिलः नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस बाकी असून सोशल मीडियावरील अकाउंट तपासण्याची गती पोलिसांनी वाढविली आहे. आतापर्यंत साडे चार हजारावर अकाऊंट तपासण्यात आले आहे.सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी,विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणे अशा पद्धतीच्या पोस्ट माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मिडिया सेलकडून तपासल्या जात आहे. काल या संदर्भात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 5 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे,विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज पसरविणे,तेढ निर्माण करणारे, भीतीदायक फोटो प्रसारित करणे,लोकांच्या भावना भडकतील, ठेच पोहचतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे.

काल नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये  गु.र.न.141/24 Sec.295(A),505(1)(C),505 (2) भादवी गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी हिमायतनगर, मुखेड ,माहूर व अर्धापूर ( अर्धापूरमध्ये एकूण दोन गुन्हे ) या ठिकाणी समाज माध्यमांवरून तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्याबद्दल गुन्हे दाखल झाले होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आता हा सहावा गुन्हा दाखल झाला आहे.

उमेदवारांचे खाते तपासल्या जाते

निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे सर्व फेसबुक  व अन्य समाज माध्यमावरील अकाउंट प्रतिज्ञापत्रात सादर केले आहे. त्यांच्या फेसबुक व अन्य सोशल अकाउंटवरून जाहिरात करताना त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा काही पोस्ट परवानगी न घेता आढळल्यास त्याचा सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चाच्या तपशीलात जमा केला जाणार आहे.

तसेच या निर्धारित सोशल मीडिया अकाउंट वरून कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये. त्यामुळे उमेदवारांनी देखील आपले सोशल अकाउंट हँडल करणाऱ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. 

संपर्क साधा

आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 8308274100 हा नंबर दिला असून यावर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...