Saturday, February 26, 2022

 राज्याच्या सिमेवर असलेल्या गावातील

विकासाला भक्कम मार्ग देऊ - पालकमंत्री अशोक चव्हाण 

·  देगलूर येथील शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण 

 नांदेड (जिमाका) दि. 26 :- तेलंगणा आणि कर्नाटकाच्या काठावर असलेल्या देगलूर तालुक्यातील खेड्यापर्यंत विकासाचे मार्ग पोहचावेत, त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा हा व्यापक दृष्टिकोण महाविकास आघाडी शासनाने बाळगलेला आहे. या गावातील जनतेला अधिक चांगला न्याय देता आला पाहिजे ही आमची भूमिका आहे. यादृष्टिने सर्व विकास कामांचे नियोजन केले जात असून तब्बल 380 कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांना उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

देगलूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्ग 1 व वर्ग 2 अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले निवासस्थान व शासकीय विश्रामगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सदस्य अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बोटमोगरेकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, रामराव नाईक, महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

नांदेड येथून हैद्राबादकडे जाण्यासाठी आजच्या घडीला 5 तास लागतात. या अंतरात मोठे शहर व महत्वाचा टप्पा म्हणून देगलूरकडे पाहिले जाते. हे लक्षात घेता देगलूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आणि मोठ्या स्वरुपातले विश्रामगृह व्हावे याबाबत नियोजन केले होते. यासाठी माजी आमदार स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचाही आग्रह होता. देगलूरच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने युद्धपातळीवर लवकर पूर्ण करण्यात आले. आता या नवीन वास्तू तेवढ्याच अधिक स्वच्छ आणि चांगल्या ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्वच विश्रामगृहाबाबत अभ्यागतांना चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टिने व स्वच्छतासह योग्य ती निगा घेतली जावी या उद्देशाने खाजगी संस्थांना याची जबाबदारी देण्याबाबत धोरण ठरविले जात असल्याचे सूतोवाच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

देगलूर-बिलोली मतदारसंघातून नवनिर्वाचित झालेले आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडे सर्वसमावेशक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आली आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी देगलूर-बिलोली तालुक्यासाठी सुमारे 350 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्वसामान्यांना या निधीतून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार अमर राजूरकर यांनी सांगितले. यावेळी महेश पाटील यांनीही समयोचित भाषणात विकासाबद्दल कटिबद्धता व्यक्त केली. 

माजी खासदार खतगावकर जेंव्हा लेंडी प्रकल्पाचा गौरवपूर्ण उल्लेख करतात

देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भवितव्याला अधिक उजळ करण्यात लेंडी प्रकल्प हा अत्यंत महत्वाचा आहे. स्व. डॉ. शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी ठेवून विचार केला. तीच भूमिका पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी घेऊन या प्रकल्पाबद्दल आपली कटिबद्धता व भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या भवितव्याला योग्य दिशा देणारा हा प्रकल्प असून यात तब्बल 40 हजार एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. यातून शेतकऱ्यांची होणारी प्रगती ही अधिक महत्वाची आहे. यात जे काही पूर्नवसनाचे प्रश्न शिल्लक आहेत ते वित्त व जलसंपदा यांच्या सहमतीने तात्काळ मार्गी लागतील, असा विश्वास माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पालकमंत्र्यांबद्दल व्यक्त केला.

00000 

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित

तर 18 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 866 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणी द्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 753 एवढी झाली असून यातील 1 लाख 36 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 27 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 690 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 तर अँटिजेन तपासणी द्वारे देगलूर 1 असे एकुण 2 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 11, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 1 असे एकुण 18 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, खाजगी रुग्णालय 2 असे एकुण 27 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 74 हजार 849

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 55 हजार 175

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 753

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 36

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 690

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-27

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 नांदेडच्या सांस्कृतिक वैभवासाठी 

दिलेल्या वचनाच्या पूर्तीचा आनंद

-         पालकमंत्री अशोक चव्हाण  

 

 नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेडच्या सर्वांगिण विकासामध्ये पायाभूत सुविधांसह कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातही नवी पिढी घडावी यासाठी आपण सारे दक्ष आहोत. येथील मराठवाडा साहित्य परिषद आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेसाठी स्वत:च्या कार्यालयांना जी जागा आणि सुविधा आवश्यक होती त्याबाबत मी शब्द दिला होता. आज या दोन्ही कार्यालयाच्या दिलेल्या वचनाच्या पूर्तीचा मला अधिक आनंद असल्याची भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

 

आज नांदेड येथील स्व. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह संकुल परिसरातील या दोन्ही संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अपर्णा नेरलकर, देविदास फुलारी, डॉ. जगदीश कदम, डॉ. भगवान अंजनीकर, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, निर्मलकुमार सूर्यवंशी, दिगांबर कदम, आशा पैठणे, स्वाती कानेगावकर, गजानन पिंपरखेडे, महेश मोरे, नाथा चितळे, अशोक कुबडे, दत्ता डांगे आदी साहित्यीक उपस्थित होते.

 

नांदेड महानगराच्या गरजा आता वाढत आहेत. वाढत्या गरजेनुसार भविष्यातील नियोजनही करणे आवश्यक आहे. यादृष्टिकोणातून विचार करून संपूर्ण प्रशासकीय कार्यालये एकाच संकुलात जर राहिले तर जनतेच्यादृष्टिने ते अधिक सोयीचे राहील. यादृष्टिने आपण कौठा येथे सुमारे 100 एकर जागेवर एक स्वतंत्र संकुल लवकरच विकसित करत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. नांदेडला कोणत्याही प्रकारची उणीव राहता कामा नये हा माझा पहिल्यापासूनच आग्रह आहे. त्यादृष्टिने आपण विविध कामांचे नियोजनही करून यातील बरीच विकास कामे पूर्णही करून दाखविले असल्याचे त्यांनी सांगितले.

000000

 युक्रेन-रशिया युद्धात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांशी

संवाद साधून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला धीर     

 

 नांदेड (जिमाका) दि. 26 :- रशिया आणि युक्रेनच्या युद्धात महाराष्ट्रातील काही नागरिकांसमवेत विद्यार्थीही अडकून पडले आहेत. यात नांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेले तब्बल 30 विद्यार्थी आहेत. उच्च शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील किव्हमध्ये विविध शैक्षणिक संस्थात प्रवेश घेतला आहे. या आठवड्याच्या प्रारंभी रशियाने युद्धाची घोषणा केल्यानंतर आणि युक्रेनवर विशेषत: किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर स्वाभाविकच तेथील महाराष्ट्रयीन, विद्यार्थी हे भयभीत झाले आहेत. या विद्यार्थ्यांशी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे प्रत्यक्ष संवाद साधून धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांनी जी परिस्थिती ओढावली आहे त्याची हकीकत आपल्या बोलण्यातून सांगितली. परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक जी काही मदत आहे ती पोहचण्याबाबत मी स्वत: संपर्क साधून आपल्याला सुखरूप भारतात कसे परता येईल याबाबत प्रयत्नरत असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही केंद्र सरकारला एक स्वतंत्र मदतीचे पत्र तात्काळ पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक दिले असून तेही विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.

0000000

लेख,

 लेख,

नांदेड : वाटचाल सुसज्ज शैक्षणिक ‘हब’ होण्याच्या दिशेने 

कधीकाळी पाणी, उद्योग आणि शैक्षणिक सुविधांचा दुष्काळ असलेला मराठवाडा आता झपाट्याने बदलतो आहे. विविध सिंचन योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याच्या शिवारात पाणी आले, पाणी आहे म्हणून उद्योग आले आणि उद्योग आहे म्हणून त्या उद्योगांची कुशल, शिक्षित-प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी शिक्षणाच्याही सुविधाही उपलब्ध होत गेल्या. आज औरंगाबाद, नांदेड, लातूर सारखी शहरे महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावरील प्रमुख ठिकाणे बनली आहेत.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण क्षेत्राबाबत दाखवलेली दूरदृष्टी किती लाख मोलाची होती, याचा प्रत्यय आपण आज घेत आहोत. 

 मराठवाड्यातील क्रमांक दोनचे शहर असलेल्या नांदेडला शिक्षणाच्या अधिकाधिक सुविधा असाव्यात यासाठी त्यांच्यासह जुन्या पीढीतील अनेक नेत्यांनी परिश्रम घेतले. येथील पिपल्स कॉलेज, यशवंत महाविद्यालय, सायन्स कॉलेज यांनी जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर केला. या भागातील मुले आज अखिल भारतीय पातळीवरील गुणवंत विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आहेत. नीट, सीईटी, जेईई सारख्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नांदेडचा आवर्जून व सन्मानाने उल्लेख केला जातो. आजमितीस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी नांदेडला शिक्षणासाठी येऊ लागले आहेत, यातूनच सारे काही स्पष्ट होते.

सव्वा दोन वर्षांपूर्वी अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर नांदेडच्या शैक्षणिक विकासाला अधिक गती मिळाली आहे. यापूर्वीही राज्याच्या मंत्रिमंडळात नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी सूक्ष्म नियोजन करून विविध शैक्षणिक सुविधा खेचून आणल्या होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, अलिकडेच मंजूर झालेले नर्सिंग कॉलेज आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.  

येथील शैक्षणिक गरजा ओळखून नवीन सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झाले होते. या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी भक्कम साथ दिली. या प्रयत्नातून नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात आणखी भर पडत आहे. 

 

सोमवारी 28 फेब्रुवारी 2022 रोजी विविध शैक्षणिक सुविधांचे लोकार्पण असून, त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलाचा समावेश आहे. या संकुलासाठी सुमारे 44 कोटी 72 लाख रूपयांचा भरीव निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात प्रशासकीय विभाग, ग्रंथालय व अभ्यासिका, शंभर मुलांचे व मुलींचे वसतीगृह, स्वयंपाक व भोजन कक्ष, फर्निचर आणि जमीन सुशोभीकरणाचा यात अंतर्भाव आहे. ग्रंथालय व प्रशासकीय इमारत ही तळमजला अधिक एक मजला असे हे बांधकाम असेल.

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शासकीय अध्यापक महाविद्यालयासाठी नवी देखणी वास्तू उभी केली जाणार आहे. यासाठी सुमारे 14 कोटी 41 लाख रूपयांचा निधी उपलब्ध देण्यात आला आहे. तळमजला अधिक दोन मजले असलेल्या या वास्तुमध्ये सात वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, प्राचार्य कक्ष, कार्यालय, प्रसाधन गृह, स्टॉप रुम, ग्रंथालय व वाचन कक्ष, फर्निचर असे याचे स्वरुप आहे. 

 

विद्यापीठामध्ये शंभर प्रवेश क्षमता असलेल्या मुलींच्या नवीन वसतीगृह इमारतीचेही बांधकाम केले जात आहे. सुमारे 8 कोटी 21 लक्ष एवढा निधी यासाठी उपलब्ध केला आहे. तळमजला अधिक एक अशा स्वरूपाच्या इमारतीमध्ये एकूण 25 खोल्यांमध्ये शंभर मुलांची व्यवस्था यात आहे. वसतीगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये स्वच्छता गृहाची सुविधा असणार आहे. 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे देखील याच दिवशी भूमिपूजन होईल. या वसतीगृहाची दोनशे विद्यार्थ्यांची क्षमता आहे. यासाठी 19 कोटी 35 लाख रुपये अंदाजीत खर्च आहे. तळमजला अधिक तीन मजले असे या इमारतीचे स्वरुप असून एकूण 50 खोल्या त्यात स्वच्छता गृहाच्या सुविधेसह असणार आहेत. याचबरोबर स्वयंपाक गृह, भोजन कक्ष, जीमन्याशियम हॉल, ग्रंथालय व वाचन कक्ष, बहुउद्देशीय हॉल, वसतीगृह अधिक्षकांचे निवासस्थान, फर्निचर व इतर कामांचा यात समावेश आहे. 

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे प्रशासकीय इमारत व ग्रंथालय इमारतीमध्ये फर्निचरची उपलब्धी करून दिल्याने आता ही इमारत परीपूर्ण झाली आहे. यासाठी सुमारे 17 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून यात मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रशासकीय विभाग, कम्युनिटी मेडिसीन विभाग, फॉरेन्सिक मेडिसीन विभाग, दोन वर्ग खोल्या, बायोकेमिस्ट्री विभाग, मायक्रोबायोलाजी विभाग, पॅथॉलॉजी विभाग, क्लासरूम 2, फार्माकॉलॉजी विभाग, फिजीऑलॉजी विभाग, एनॉटॉनी विभाग, परीक्षा कक्षात कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे, ग्रंथालय इमारतीमध्ये कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे, रुग्णालय इमारतीमध्ये विविध विभागामध्ये फर्निचर पुरवठा करणे या कामांचा समावेश आहे.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये वातानुकुलीत यंत्रणा, बाग-बगीचा, सीसीटिव्ही, लिफ्ट, रॅम्प आदी कामांसाठी 15 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन वास्तु नांदेड जिल्ह्याच्या वाढत्या शैक्षणिक गरजानुरूप आणि नांदेडला एक सुसज्ज असे शैक्षणिक ‘हब’ निर्माण कऱण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हणता येईल. 

 

- विनोद रापतवार

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...