Saturday, September 24, 2022

 सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- दरवर्षी हे उत्‍सव नांदेड शहर व जिल्‍ह्यात सर्वत्र मोठ्या उत्‍साहाने साजरे होत असतात. सदर सण-उत्‍सवाचे महत्‍व लक्षात घेता, तसेच उत्‍सव शांततेत पार पडावा आणि जिल्‍ह्यात सर्वत्र कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी म्‍हणून जिल्‍हा प्रशासनामार्फत आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात येत असते. हे सण उत्‍सव शांततेत पार पडावेत या दृष्‍टीने करावयाची कार्यवाही व उपाययोजनाच्या अनुषंगाने विविध मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्गमीत करण्यात आल्या आहेत. 

मंडळांच्‍या संयोजकांसाठी या आहेत सूचना 

दुर्गा देवींच्‍या स्‍थापने पूर्वी मंडळाच्‍या संयोजकांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त, नांदेड आणि संबंधीत पोलीस स्‍टेशनकडून रितसर परवानगी घ्‍यावी. विना नोंदणी व विना परवाणगी मंडळाने दुर्गा देवींची स्‍थापना करु नये.

मुर्तीची स्‍थापना तसेच दांडीया/गरभा सार्वजनिक रस्‍त्‍यांवर अथवा रहदारीस अडथळा निर्माण होईल अश्‍या ठिकाणी करु नये. 

मुर्ती स्‍थापनेची तसेच दांडीया/गरभा खेळण्‍याची जागा आणि परिसर स्‍वच्‍छ असावा. त्‍या ठिकाणी प्रकाशाची भरपूर सोय केलेली असावी. दुर्गा देवीच्‍या मुर्तींच्‍या संरक्षणाची जबाबदारी संबंधीत मंडळाचे अध्‍यक्ष आणि पदाधिका-यांवर सोपविण्‍यात यावी. स्‍थापनेच्‍या ठिकाणी या साठी 24 तास कार्यकर्त्‍यांची चक्राकार पध्‍दतीने नियुक्‍त्‍या कराव्‍यात. 

उत्‍सव कालावधीत वापरण्‍यात येणा-या ध्‍वनिक्षेपकाची परवानगी संबंधीत पोलीस स्‍टेशन येथुन घ्‍यावी. ध्‍वनीक्षेपकाच्‍या आवाजामुळे रुग्‍णास, विद्यार्थ्‍यांस व परिसरातील सर्वसामान्‍य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्‍यावी. मंडळाकडून दाखवण्‍यात येणा-या देखाव्‍यामुळे इतर धर्मियांच्‍या भावना दुखवल्‍या जाणार नाहीत, असेच देखावे उभे करावेत. देखावे उभारण्‍यापुर्वी संबंधीत पोलीस स्‍टेशन कडून परवानगी घ्‍यावी. मंडळातर्फे आयोजीत करण्‍यात येणा-या मनोरंजन व सांस्‍कृतीक कार्यक्रमांची तसेच गरभा, दांडीया यासाठीची परवानगी संबंधीत पोलीस स्‍टेशन कडून घ्‍यावी.

विसर्जन मिरवणूकीत वापरात येणारी वाहने चांगली व सुस्थितीत असावी. त्‍याची तपासणी नांदेड शहरासाठी प्रदेशिक परिवहन अधिकारी नांदेड व तालुक्‍याच्‍या ठिकाणी राज्‍य परिवहन महामंडळ आणि यांत्रिकी विभागांची मदत घ्‍यावी. सर्व महसूल अधिकारी व पोलीस अधिका-यांनी त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रा मध्‍ये शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधीत ठेवण्‍यासाठी एन.सी.सी., स्‍काऊट गाईड, होमगार्ड तसेच शांतता समितीच्‍या सदस्‍यांची मदत घ्‍यावी.उत्‍सव कालावधीत देवींच्‍या स्‍थापने पासून ते विसर्जनापर्यन्‍त साज-या होणा-या सर्व कार्यक्रमामध्‍ये, गरभा, दांडीया यामध्‍ये त्‍यांना सहभागी करुन घेवून कायदा व सुव्‍यवस्‍था परिस्थिती हाताळावी.

00000

येत्या सण-उत्सवात प्रत्येक नांदेड जिल्हावासीय

शांतता व सलोख्याला प्राधान्य देतील

- जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी 

शांतता समितीची बैठक संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- येत्या 26 तारखेला घटस्थापना व दुर्गादेवीची स्थापना होऊन नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. याचबरोबर 5 ऑक्टोंबरला दसरा उत्सव, दिनांक 6 व 7 ऑक्टोंबर रोजी दुर्गा देवीच्या मुर्तीचे विसर्जन, 9 ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पोर्णिमा आणि ईद ए बिलार आदी सण साजरे होत आहेत. या विविध धार्मिक उत्सवाच्या काळात नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक नागरीक शांतता व सलोख्याला नेहमीप्रमाणे प्राधान्य देऊन परस्पराचा आनंद द्विगुणीत करतील असा विश्वास जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी व्यक्त केला. आज जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, शांतता समितीचे सन्माननिय सदस्य श्रीमती साखरकर, भदन्त पय्या बोधी, मौलाना आयुब खासमी दुष्यंत सोनाळे, शरणसिंघ सोडी, पुनिता रावत, निळकंठ मदने, हारिश ठक्कर, महंमद सरफराज अहमद, सारंग नेरलकर, संतबाबा बलविंदर सिंघ यांचे प्रतिनिधी व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते. 

या उत्सव काळात पथदिवे, स्वच्छता, आरोग्य, औषधांची उपलब्धी व इतर पायाभूत सेवा तत्पर ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी केल्या. या काळात मिठाई, मावा व दुग्धजन्य पदार्थ यात भेसळ झाल्यास सरळ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो हे लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सर्व खाद्य पदार्थ विक्रेत्यांना योग्य ते आदेश देण्याचेही त्यांनी सांगितले. मिरवणुकीसाठी वापरली जाणारी वाहने ही सुस्थितीतच असली पाहिजेत. ही वापरण्यात येणारी वाहने यांचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी करून तसे प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. 

गणेश उत्सवात दाखविलेला संयमीपणा कौतुकास्पद

- जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे

कायदा व सुव्यवस्था याची काळजी घेऊन हे सर्व उत्सव नागरिकांनी आनंदात साजरे केली पाहिजेत. यात कायदा व सुव्यवस्थेला कोणी बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले. यापूर्वी पार पडलेल्या विविध उत्सवात जिल्ह्यातील नागरिकांनी अत्यंत समजदार भूमिका घेतली आहे. धार्मिक स्थळांना कोणतेही अधिकचे कुंपन न घालता अतिशय शांततेत गणेश उत्सव साजरा करून नांदेड जिल्हा वासियांनी वेगळा शांततेचा संदेश दिला या शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेडकवासियांचा गौरव केला. डिजे वापरण्यास बंदी आहे. याचा जर कुठे वापर होत असेल त्यांच्या विरुद्ध व ही यंत्रणा हाताळणाऱ्या व्यक्ती विरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू या शब्दात त्यांनी इशाराही दिला. संपूर्ण पोलीस यंत्रणा दक्ष असून यात जर कोणी जाणीवपूर्वक शांततेला आव्हान निर्माण करत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई अटळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

गरबासाठी जाताना पालकांनाही मुलींची हवी माहिती

- श्रीमती साखरकर

गरबासाठी घरातून बाहेर पडतांना मुली नेमक्या कुठे चालल्या आहेत याची माहिती पालकांनाही आवश्यक आहे. याबाबत पालकांनी अधिक जबाबदार भूमिका घेऊन मुलींकडून ही सर्व माहिती घेऊन ठेवली पाहिजे. याचबरोबर वेळेची बंधन काटेकोर पाळून स्वत:ही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन सदस्य श्रीमती साखरकर यांनी केले आहे.

00000





  नांदेड जिल्ह्यात 96 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित   

1 लाख 38 हजार 469 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 96 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. शनिवार दिनांक 24 रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन 56 हजार 777 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 1 लाख 38 हजार 469 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडिला नांदेड जिल्ह्यातील 21 गावे लम्पी बाधित आहेत. या 21 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 10 हजार 138 एवढे आहे. यातील 96 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 141 एवढी आहे. एकुण गावे 162 झाली आहेत. या बाधित 21 गावाच्या 5 किमी परिघातील 162 गावातील (बाधित 21 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 59 हजार 138 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 5 एवढी झाली आहे. उपलब्ध लस मात्रा 2 लाख 60 हजार एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

000000

 महसूलपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

 

रविवार 25 सप्टेंबर 2022 रोजी शिर्डी विमानतळ येथून श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळ येथे सकाळी 10.15 वा. आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव. दुपारी 12.45 वा. निवासस्थान येथून कौठा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. सेवापंधरवाडा निमित्त कौठा येथे रक्तदान शिबिर कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. कौठा येथून वाहनाने हदगावकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. हदगाव तालुक्यातील वाळकी बा. येथे आगमन व नागरी सत्कार सोहळा. दुपारी 3 वा. सेवा पंधरवडा अंतर्गत हदगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांसाठीच्या अनुदानाच्या धनादेशाचे बँकेस वितरण व प्रमाणपत्रांचे वितरण. दुपारी 3.30 वा. वाळकी बा. येथून वाहनाने माहूरकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूरगड येथे आगमन व मुक्काम.

 

सोमवार 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत रेणुका मातेचे दर्शन. सकाळी 9 वा. माहूर येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने प्रयाण.

00000  

 नवरात्र उत्सवाच्या काळात

डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध

 

·  जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुण्‍याही व्‍यक्‍तीस फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार डॉल्‍बी सिस्‍टीमचा वापर करण्यास / चालविण्‍यास याद्वारे जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी प्रतिबंध केले आहे.

 

नवरात्र उत्सवाच्या काळात जिल्हयातील डॉल्बी चालक व मालक यांचेकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीम मालकचालक व इतर कुणीही व्‍यकती  हे डॉल्बी सिस्टीम वापरु / चालवू नये याकरीता सदर डॉल्बी सिस्टीम मालक व  चालक यांना फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केला आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्‍यांचे म्‍हणने ऐकूण घेण्‍यास पुरेसा अवधी नसल्‍याने आणीबाणीच्‍या प्रसंगी फौजदारी प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत 23 सप्टेंबर 2022 रोजी करण्‍यात आला आहे.   

00000 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...