Friday, September 14, 2018


सणासुदीच्या कालावधीत  
अन्न पदार्थांबाबत उत्पादकांनी दक्षता घ्यावी
 - सहाय्यक आयुक्त बोराळकर  
नांदेड दि. 14 :-  सणासुदीच्या कालावधीत अन्न पदार्थांबाबत उत्पादकांनी दक्षता घ्यावी. नागरिकांना शुद्ध, निर्भेळ आणि दर्जेदार अन्न पदार्थ उपलब्ध व्हावीत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून व्यापक नमुने व आस्थापना तपासणी मोहीम कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
गणेश चतुर्थी ते  दिपावली पर्यंत विविध सणाचे आगमन होत आहे. या कालावधीत मावा, मिठाई दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, फरसान याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यासाठी उत्पादकांनी या पदार्थाचे उत्पादन करतांना दक्षता घ्यावी. यात मिठाई / प्रसाद काचेच्या किंवा पारदर्शक आवकरणात झाकुन ठेवावा. जेणेकरुन धूळ, माती, माशा, मुंग्या इतर किटकांचा प्रार्दुभाव होणार नाही. पदार्थ हाताळणाऱ्यांने कान, डोळे, केस खाजवणे, डोळे चोळणे टाळावे. हातमोजे घालावे, कसे झाकावे, तोंडाला मास्क लावावा, संसर्गजन्य आजारी रुग्णांनी पदार्थ बनविणे टाळावे. नखे व कपडे स्वच्छ असावी. दुग्धजन्य पदार्थ ताजे तयार करुनच सेवनास द्यावेत. तळण करुन उरलेल्या खाद्य तेलाचा पूर्ण वापर टाळावा. भांडी धुण्यासाठी पिण्यास योग्य पाणी वापरावे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


धर्माबाद येथे बिएलओ व पर्यवेक्षकांची आज बैठक   
नांदेड दि. 14 :- आगामी सन 2019 मध्ये महाराष्ट्रात लोकसभा / विधानसभा या दोन्ही सार्वत्रीक निवडणूका होणार आहेत. याची पुर्वतयारी म्हणून दिनांक 1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीचा विशेष संक्षीप्त पुनरिक्षण  कार्यक्रम दि  1 सप्टेबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने शनिवार 15 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11  वाजता बिएलओ व पर्यवेक्षक तथा तलाठी यांची तहसिल कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी तथा  उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत केली आहे.
तसेच ईव्हीएम आणि VVPAT  बाबत जनतेमध्ये जागृकता निर्माण  व्हावी यासाठी माहिती देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेमध्ये अपंगाचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच तृथीय पंथीय मतदारांना देखील या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून सामावून घ्यायचे आहे. विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करुन जास्तीतजास्त मतदार नोंदणी होईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.  
बैठकीत बिएलओ यांनी आपल्याकडे  प्राप्त झालेले नमुना नं 6, 7, 8 व 8-अ इत्यादी अद्ययावत अर्जासह उपस्थित राहावे. दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी  प्रसिध्दी केलेली मतदार यादी गावातील पदाधिकारी नागरीक तसेच चावडी येथे वाचन करुन जास्तीत जास्त प्रसिध्द करण्यात यावी एकही पात्र नागरीक मतदानापासुन वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धर्माबाद यांनी केले आहे.
000000


गणपती परवाना न घेणाऱ्या
मंडळाविरुद्ध कारवाई होणार
नांदेड दि. 14 :- गणपती परवाना न घेणाऱ्या मंडळाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय उप आयुक्त प्रणिता श्रीनीवार यांनी दिली आहे.
सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 कलम 41 क प्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतू ज्या गणेश मंडळानी विना परवानगी गणेश मंडळाची स्थापना करुन वर्गणी गोळा केली आहे, त्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 67 अन्वये कार्यवाही करण्यात येणार आहे. यात दहा हजार रुपयापर्यंत दंड आकारण्यात येईल याची नोंद घेऊन गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळाची नोंदणी करावी, असेही आवाहन केले आहे.
0000000



कंधार येथे 29 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
नांदेड दि. 14 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने कंधार येथे 14 सप्टेंबर रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार पथकामार्फत 29 तंबाखू विक्रेते यांच्याकडून 22 हजार 450 रुपये दंड आकारण्यात आला.
या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे,  सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तथा दंत आरोग्यक सय्यद इस्स्लाहूद्दिन, ग्रामीण रुग्णालय, कंधार येथील दंतशल्यचिकित्सक डॉ. राहुल अन्नापुरे, औषध निर्माण अधिकारी यशवंत पदरे तथा समुपदेशक अरविंद वाटोरे व स्थानिक पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. सुनील पत्रे व पो कॉ. त्रिशूल शंकरे आदी होते.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांनी केले आहे.
000000


मराठा लाईट इन्फन्ट्री रेजीमेंट बेळगाव येथे
हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती
        नांदेड दि. 14 :-  मराठा  लाईट इन्फन्ट्री बेळगाव येथे हेडक्वार्टर कोटा सैन्यभरती 24 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2018  पर्यंत सोल्जर  जी. डी.,  ट्रेडसमॅन व  सोल्जर क्लार्क  (एसडी)  या पदासाठी होत आहे.  यामध्ये फक्त मराठा लाईट इन्फट्रीचे  माजी सैनिकांचे पाल्य व  वीरनारी / माता / पिता यांच्या पाल्यांसाठी व उच्च दर्जाचे खेळाडूसाठी  ही भरती आहे.  यात  शहिद जवान व विधवा यांच्या पाल्यास प्राधान्य दिले जाईल. अधिक माहिती व पात्रता जाणून घेण्यासाठी  सैनिक कल्याण कार्यालयास भेट दयावी, असे आवाहन नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
****


  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
सोमवारी सार्वजनिक सुट्टी
नांदेड दि. 14 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात साजरा करण्यात येतो. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4 मे 2001 अन्वये प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार 17 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड जिल्ह्यासाठी सार्वजनिक सुट्टी  आहे, तथापी मराठवाडा मुक्ति संग्राम दिन म्‍हणुन साजरा करण्‍यात येईल  अशी माहिती जिल्हाधिकारी  कार्यालयातर्फे देण्‍यात आली आहे.
****


हळद, केळी यासारखी पिके
ठिबक सिंचनाखाली आणावीत
                                                - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात हळद, केळी, यासारखी पिके शंभर टक्के ठिबक सिंचनाखाली आणावीत, अशी सुचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केली.  
कृषि विभागामार्फत जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या जिल्हास्तरीय समितीची नुकतीच बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी सविस्तर सादरीकरण केले.
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेतंर्गत (पीएमकेएसवाय) योजनेतंर्गत यावर्षी ठिबक व तुषार सिंचनासाठी 19 कोटी 54 लाख रुपये निधी मंजूर झाला असून यामध्ये जवळपास 7 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने पसंतीच्या कंपनीचा संच बसवून घ्यावयाचा आहे. त्यांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मागील वर्षी देखील सुमारे 8 हजार शेतकऱ्यांना 23 कोटी रुपयांचे अनुदान दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये मजूर टंचाईमुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरीणाद्वारे शेती करण्याचा कल वाढला असून सन 2017-2018 मध्ये 7.50 कोटी रुपयांचे अनुदान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर , पॉवर विडर, फवारणी यंत्रे , पेरणी यंत्रे , मळणी, मशीन व विविध औजारे यासाठी शेतकऱ्यांना देण्यात आले असून यावर्षी देखील 5.50 कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले असून त्यांना त्यांच्या पसंतीची औजारे , यंत्रे खुल्या बाजारातून खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. पूर्वसंमती दिल्यानंतर तीस दिवसात औजारे खरेदी करुन प्रस्ताव दिल्यास अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कार्यक्रमातंर्गत विविध पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांना यावेळी सोडत पध्दतीद्वारे धान्य साठवणुकीसाठी प्रत्येकी एक असे पाच गोदामांना यावेळी मंजुरी दिली. प्रत्येक गोदामासाठी प्रत्येकी 50 टक्के प्रमाणे 12.50 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
गटशेतीला चालना देण्यासाठी एका शेतकरी गटाला ( 100 एकर किमान ) सुमारे 1.00 कोटी अनुदान देण्यात येणार असून यासाठी शेतकरी कंपनी / गट यांनी अर्ज करण्याचे आवाहनही या बैठकीप्रसंगी करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत रुपये 1.50 कोटीच्या प्रस्तावास 50.00 लाख अनुदान देण्यात येणार असून विविध कृषि प्रक्रियासाठी या योजनेमध्ये अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत यावेळी रुपये 6.00 कोटींच्या आराखड्यास जिल्हा समितीने मंजुरी दिली. यामध्ये शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर शेडनेट, हरितगृह यांचा लाभ देण्यात येणारी आहे. 100 टक्के अनुदानावर सामुदायिक शेततळे या घटकांचे काम देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडे फळबाग असल्याची अट काढून टाकण्यात आली असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहनही यावेळी करण्यात आले. हळद, मिरची, फळे, भाजीपाला यासाठी प्रक्रिया युनिट यासाठी 40 टक्के जास्तीत जास्त 10.00 लाख अनुदान यामध्ये देय आहे.
नानासाहेब देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा) योजनेतंर्गत जिल्ह्यातील 384 गावांची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 70 गावांची करण्यात आली आहे. बदलत्या वातावरणाशी अनुकूल कृषि पध्दती घेण्यासाठी गावस्तरीय बैठका घेवून सुक्ष्म आराखडे दुरुस्त करावेत अशी सुचनाही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी केली.
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत देशात व राज्यात विविध कृषि संशोधन प्रकल्पांना शेतकऱ्यांच्या भेटीचे नियोजन करुन अभ्यास दौरे आयोजित करण्यास याप्रसंगी मान्यता देण्यात आली .
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, विविध जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख, शेतकरी, शेतकरी गट प्रमुख, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.
*****   


सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी मुंबईसह नागपूरमध्ये
१८ सप्टेंबरला पेन्शन अदालत
नांदेड, दि. १४ : राज्य शासनाच्या सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत मुंबई आणि नागपूर येथे दि. १८ सप्टेंबर २०१८ रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली असून सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वित्त विभागाने केले आहे.
केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या दि. १८ जुलै २०१८ रोजीच्या ज्ञापनान्वये देशभरात सर्व राज्ये, केंद्र शासित प्रदेशांमध्ये पेन्शन अदालतआयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अशा पेन्शन अदालतीचे दि. १८ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी आयोजित करण्यात येईल.  
मुंबईत आयोजित होणाऱ्या पेन्शन अदालतीचे काम सकाळी १०.३० ते पूर्ण दिवस असे चालणार आहे. याचे स्थळ पु.ल. देशपांडे  महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई असे आहे.
दुसरी पेन्शन अदालत नागपूर येथे आयोजित होईल. तिचा वेळ सकाळी ९ ते पूर्ण दिवस असा आहे तर स्थळ साई सभागृह, गांधी नगर, नागपूर असे आहे.
महालेखाकार, मुंबई कार्यालयामार्फत प्राप्त झालेली प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांची यादी www.mahakosh.gov.in  या संकेतस्थळावर  Circulars and orders  या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालय प्रमुखांना या यादीतील त्यांच्याशी संबंधित प्रकरणाची पडताळणी करावी, कार्यालय प्रमुखांनी या प्रकरणांमधील त्रूटीची पुर्तता करून पेन्शन अदालतमध्ये उपस्थित राहावे तसेच संबंधित सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचारी यांनाही उपस्थित राहण्यासाठी कळवावे असे या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
ज्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा निवृत्ती वेतन प्रकरणाबाबत तक्रारी आहेत, त्यांनी त्यांच्या तक्रारी संबंधित प्रशासकीय विभागात लेखी किंवा ई-मेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे १८ सप्टेंबर २०१८ पूर्वी नोंदवाव्यात तसेच पेन्शन अदालतीस उपस्थित राहावे असेही वित्त विभागाने कळवले आहे.
००००


अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी
 ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 14 :-  अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार   सन  2018-19  या शैक्षणिक वर्षामध्ये धार्मिक अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती सांगण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  ऑनलाईन फार्म भरण्यासाठी कार्यशाळा मुदखेड, अर्धापूर व उमरी तालुक्यातील  सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांची  विद्याविकास पब्लिक स्कूल किशोरनगर  नांदेड येथे शिक्षणाधिकारी (मा.) बी. आर. कुंडगीर व शिक्षणाधिकारी (मनपा) तथा उपशिक्षणाधिकारी (मा.) डी. आर. बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली.  
केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे अर्ज अल्पसंख्याक 23 जुलै पासून भरण्यास सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यासाठी 34 हजार 813 विद्यार्थ्यांचे रीनिवल  उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट येत्या 20 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी  श्री कुंडगीर यांनी केले आहे.
शिष्यवृत्ती फार्म भरणे संदर्भात जिल्हा समन्वयक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती शेख रुस्तुम  यांनी सादरीकरणाद्वारे माहिती सांगितली. या कार्यशाळेस  शिक्षण विस्तार अधिकारी मांदळे प्रविणा, रोहिदास बस्वदे यांनी शैक्षणिक बाबीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरत असताना  अडचण आल्यास शेख रुस्तुम मो. 9689357212 यांना संपर्क करावा. या कार्यशाळेस तिन्ही  तालुक्यातील 250 मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठक यशस्वितेसाठी मिनल देशमुख, मारोती ढगे यांनी परिश्रम घेतले आहे.
0000000


जिल्हा उद्योग केंद्राच्या
विविध सभांचे 28 सप्टेंबरला आयोजन
नांदेड दि. 14 :-  जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या विविध सभा जिल्हा उद्योग मित्र समिती सभा जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजार  उद्योग पुनर्जिवन जिल्हास्तरीय समिती सभा शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


महाइस्कॉल संगणक प्रणालीशी
निगडीत कार्यवाही त्वरीत करावी
नांदेड दि. 14 :-  महाइस्कॉल ही जुनी संगणक प्रणाली बंद करण्यात येणार असल्याने या प्रणालीत महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर काही अर्ज त्रुटीअभावी प्रलंबित असतील त्या अर्जातील त्रुटीची पुर्तता करुन गुरुवार 20 सप्टेंबर पुर्वी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करावीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
महाइस्कॉल संगणक प्रणालीशी निगडीत कार्यवाही त्वरित करण्यात येणार आहे. जे प्रकरण कागदपत्राअभावी प्रलंबित आहेत त्यांना प्रलंबित न ठेवात मान्य करावे. जे प्रकरण महाविद्यालय पातळीवर प्रलंबित आहे असे सर्व प्रकरणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्याकडे अद्याप पाठविले नसतील तर ते त्वरीत पाठवावे, असेही आवाहन केले आहे.  
000000


जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी  
28 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत
नांदेड दि. 14 :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत नेहरु युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने दरवर्षी युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संलग्नित युवा मंडळाला जिल्हा युवा मंडळ पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी युवा मंडळानी शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक विनायक धेंडे यांनी केले आहे.
1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या आर्थिक वर्षात युवा मंडळाने केलेल्या युवा विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. नेहरु युवा केंद्र नांदेड कार्यालयातर्फे आरोग्य शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, विविध शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय दिवस सामाजिक कार्यक्रम इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या संलग्नित युवा मंडळाना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या पुरस्कराचे स्वरुप 25 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संलग्नित ग्रामीण भागातील युवा मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ, सेवाभावी संस्था, व्यायामशाळानी अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र घटना आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा पुरावा, लेखा परिक्षण अहवाल व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिफारशीसह सर्व मंडळांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज नेहरु युवा केंद्र राज निवास घर नंबर 21, मालेगाव रोड जैन मंदिरा समोर शिवराय नगर नांदेड (दूरध्वनी नंबर 02462-263403) येथे मिळतील. शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज जमा करावे. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त युवा मंडळांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


स्क्रब टायफसचे संशयीत रुग्ण आढळुन
आल्याने नागरीकांनी घ्यावयाची काळजी
नांदेड दि. 14 :- सध्या स्क्रब टायफस हा आजार विदर्भातील काही जिल्हयात आढळुन येत असल्याने नांदेड जिल्हा हा विदर्भाच्या सिमेलगत असल्याने नांदेड जिल्हयात या आजाराची लागण हो शकते. त्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्यादृष्टीने गावातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.  
जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना स्क्रब टायफस आजारावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी सुचना दिल्या आहे. त्यानुसार सर्व प्रा. आ. केंद्राना सतर्क करण्यात आले आहे. सद्यस्थितीत स्क्रब टायफसचे रुग्ण विदर्भासह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश भागात आढळुन येत असुन नांदेड जिल्हा विदर्भ व आंध्र प्रदेशाच्या सिमेलगत असल्याने नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वायफना येथे दोन संशयीत रुग्ण आढळुन आले आहेत.
स्क्रब टायफस आजाराचा प्रसार
स्क्रब टायफस हा जिवानुजन्य आजार आहे. ओरिएन्शिया सुसुगामशी नामक बॅक्टेरीयामुळे होणारा अतिशय गंभिर पण उपचाराने बरा होणारा हा आजार आहे. ट्राम्बिक्युलीड माइटचे लारव्हे ज्याला चिगर म्हणतात ते चावल्यामुळे ओरिएन्टा सुसुगामुशी हे जंतु मानवाच्या शरिरात प्रवेश करतात. जिथे झाडेझडपे, गवत असते त्यावर हे चिगर असतात. गवत कापतांना गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करतांना ते मानसाला चावतात मानव हे माईटचे आकस्मिक पाहुणे आहेत. चिगर माइट उंदरांना चावतात आणि तिथून आजार पसरतो. मोठी माईट चावत नाही आणी ती जमिनीवरच असते. चिंगर चावल्यामुळे 5 ते 20 दिवसांनी आजाराची लक्षणे दिसु लागतात चिंगर लारवे साधारण 0.17 ते 0.22 मिमी आकाराचे अतिशय सुक्ष्म असतात ते डोळांनी दिसत नाही ते चावणाऱ्या ठिकाणी दुखत नाही त्यामुळे काही चावल्याने भान राहत नाही.
प्राथमिक लक्षणे
ताप, डोकदुखी, हातपाय दुखी, किडा चावलेल्या ठिकाणी व्रण दिसतो मळमळ, ओकारी, शुध्द झारपणे चालताना तोल जाने, ज्या ठिकाणी चिगर चावतो त्याठिकाणी एक व्रण असतो ज्याला इशर म्हणतात हा दिसला तर रोग निदान नक्की होते असे समजण्यात येते क 40 टक्के रुग्णामध्ये हा इशर दिसत नाही. कपडयाने झाकलेल्या भागात तो असला तर दिसणे आनखीनच कठीनच असते. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान जनजागरण, उंदरावर नियंत्रण मिळवले तर स्क्रब टायफस आटोक्यात येवू शकतो.
निदान
            स्क्रब टायफस आजाराचे निदान करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात
वेलफेलिक्स टेस्ट ज्यामध्ये 0XK Titre  हे वाढलेले आढळून येते. ही खात्रीशीर निदान चाचणी नसली तरी आपण या चाचणीच्या आधारावर स्क्रब टायपफसचे उपचार चालू करु शकतो. ही चाचणी स्क्रिनिंग टेस्ट म्हणून उपयुक्त आहे.
सिरजिकल निदान ज्यामध्ये एलिझा व इतर पध्दतीचा उपयोग करुन शरीरामधील स्क्रब टायफसच्या अॅण्टी बडीज पाहिल्या जातात. ही चाचणी खात्रीशीर निदान म्हणून उपयोगिली जाते.
उपचार
            स्क्रब टायफस आणि एकूणच रिकेटशियल तापामध्ये टेट्रायक्लिन, क्लोरॅमफेनिकल आणि डक्सीसायक्लिन ही औषधे परिणामकारक ठरतात. या आजाराचा उपचार जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रफग्णालय व जिल्हा रफग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
·         घराभोवती असलेल्या शेणाची उकंडे / कचऱ्याचे ढिगारे त्वरीत नष्ट करणे.
·         घराभोवती असलेल्या झाडे झडपी काढुन टाकावेत, गवताळ भागावर तणनाशक औषधाची फवारणी करावी.
·         अंगणवाडी परिसर स्वच्छ ठेवणे व बालकांना गवतावर खेळु देवु नये.
·         खुल्या जागेवर शौचास जाणे टाळावे.
·         गावात पाणी साचुन दलदल निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे.
·         शालेय परिसर स्वच्छ ठेवणे व विद्यार्थ्यांमध्ये जनजागती करणे.
·         गावातील मजुराना जंगलात कामावर जाताना पुर्ण अंग झाकेल असे कपडे, गमबुट वापरणे. जंगलातुन परत आल्यानंतर अंगावरील सर्व कपडे उकळत्या पाण्यात भिजविणे, जंगलात कामावर बालकांना ने नये.
·         गुराच्या गोठयामध्ये दलदल राहणार नाही याची दक्षता घेणे, किटकनाशक औषधाची फवारणी करणे, एका गोठयामध्ये गुराची गर्दी करु नये तसेच गुरासाठी साठविलेल्या चारामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेणे.
·         गुराच्या गोठयामध्ये भिंतीला, खांबाना असलेल्या भेगाना शेण व ओल्या मातीच्या माध्यमातुन बुजविणे, शेणाचे ढिगारे गावापासुन दुर लांब अंतरावर राहतील याची दक्षता घेणे.
·         चिगर (माईट) आढळुन आलेल्या ठिकाणी जमिनीची नांगरणी व तसेच जमिनीवरील सर्व पालापाचोळा जाळुन टाकणे. चिगर माईट हे किटक उष्णरक्त असलेले प्राणी यांच्या सिरमवर अवलंबुन असतात त्यामुळे हे किटक शेतामधील उंदीर, घुशी व इतर प्राणी यांच्या शरीरावर आढळुन येतात. त्यामुळे उंदीर व घुशीचा नायनाट करावा.
·         स्क्रब टायपफस या आजाराची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
सद्यस्थितीत नांदेड जिल्हयामध्ये हदगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वायफना  येथे स्क्रब टायफसचे दोन संशयीत रुग्ण आढळुन आले आहे.  त्याअनुषंगाने आरोग्य विभागामार्फत जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. मुंडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. देशमुख, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. रुईकर व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री. सातपुते यांनी संबंधित गावात 8 सप्टेंबर 2018 रोजी भेट देवुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत. संशयीत रुग्ण आढळुन आले असले तरीही नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास संबंधित किटकाचा नायनाट होईल म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेले उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवेल. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावाला, असे आवाहन आरोग्य खात्याकडुन जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...