Friday, September 14, 2018


सन 2019 मधील निवडणुकांसाठी
पात्र मतदारांनी नाव नोंदणी करावी
- उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयळे
नांदेड, दि. 14 :- येत्या सन 2019 मधील निवडणुका लक्षात घेऊन पात्र नागरिक, विद्यार्थी, मतदारांनी 31 ऑक्टोंबर पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती व स्थलांतरणाबाबत मतदार केंद्रावर विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दिपाली मोतीयळे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती कार्यक्रम येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट हॉल येथे नुकताच घेण्यात आला. त्यावेळी श्रीमती मोतीयळे बोलत होत्या.   
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख राजेश्वर डूडूकनाळे, दुरशिक्षण विभागाचे डॉ. राम जाधव, राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. डी. पवार, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे डॉ. कल्पना कदम, पीपल्स महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक सिद्धेवाड, छायाचित्रकार विजय होकर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती मोतीयळे म्हणाले, जिल्ह्यातील पात्र मतदारांची यादी ही 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकवर आधारीत तयार करण्यात येत आहे. मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत संबंधीत मतदान केंद्रावर विहित नमुन्यात अर्ज बिलओ मार्फत भरुन देता येईल. सन 2019 मधील निवडणुकीसाठी या मतदार यादीचा उपयोग होणार आहे. यासाठी 18 वर्षे पुर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा. नागरिक, विद्यार्थ्यांनी मतदार यादी नाव नोंदणी व दुरुस्तीबाबत जनजागृती करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
कुलसचिव डॉ. मुलानी म्हणाले, विद्यापिठातील निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा असतो त्याप्रमाणे इतर निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणीमध्ये सहभाग घ्यावा, असे सांगितले.
श्रीमती कल्पना कदम म्हणाल्या, लोकशाहीमध्ये मतदानाला खूप मोठं महत्व आहे. यासाठी मतदार यादीत नाव असल्याची खात्री करुन नाव नोंदणी करावी. याबाबत राष्ट्रीय सेवा योजन मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रबोधन करता येईल, असे सांगितले.
अशोक सिध्देवाड यांनी मतदार नाव नोंदणी अभियानाकडे व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे. लोकशाहीत मतदाराचे वरचे स्थान आहे. निवडणूकीत लोकांचा सहभाग वाढला तर लोकशाहीचे संरक्षण होते. मतदारांनी निर्णय घेण्याबाबत स्वतंत्र असावे. निवडणूका पारदर्शी पार पाडण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु असतात. यात समाजातील शेवटच्या व्यक्तीची मोठी भुमिका असून जागरुक मतदार हा लोकशाहीचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले.
राम जाधव यांनी शाळा-महाविद्यालय स्तरावरुन मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम व्यापक प्रमाणात शासन राबवित आहे. यात तरुण मतदारांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. जास्तीजास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करुन मतदार होण्यासाठी सहभाग वाढवावा, असे सांगितले.  
प्रास्ताविक डॉ. पवार यांनी या अभियानात जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. शिवराज बोकडे यांनी केले तर शेवटी काशिनाथ चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, विविध महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.  
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...