Thursday, July 17, 2025

 वृत्त क्र. 738

विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणासाठी

नागरीकांना सहभाग घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. 17 जुलै :- भारत सरकारच्या विकसित भारत-2047 या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र-2047 ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यांमध्ये जनतेचा सहभाग घेऊन व्यापक चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. जनतेच्या सूचना, गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन सदर व्हिजन डॉक्यूमेंट Vision Document तयार केले जाणार आहे. या सर्वेक्षणात नांदेड जिल्हयातील सर्व नागरीकांनी https://wa.link/o93s9m या लिंकवर आपले मत नोंदवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी आवाहन केले आहे. 

विकसित महाराष्ट्र-2047 करिता व्हिजन डॉक्यूमेंट Vision Document तयार करण्याच्या अनुषंगाने नियोजन विभागाच्या 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दिनांक 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 अशा 150 दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी Vision Document तयार केला जात आहे. ज्यामध्ये कृषी व सलग्न क्षेत्र, उद्योग व सेवा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रशासन व पर्यावरणीय इ. क्षेत्रांच्या क्षेत्रनिहाय अभ्यास समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

वृत्त क्र. 737

एचएसआरपी नंबर प्लेट 15 ऑगस्टपर्यत बसवून घ्यावी

प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन

नांदेड दि. 17 जुलै :- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 15 ऑगस्ट 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी केले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018 व S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागातर्फे दंड आकारणी करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 01.04.2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनधाकारंनी वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रॅक्टरसाठी दर 450 रुपये तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी 745रुपये इतका दर आकारला जाणार आहे. या व्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे व हे शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे.

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये 17 जुलै 2025 रोजीपर्यत 50 हजार 273 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी करण्यात आली आहे.  एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम 15 ऑगस्ट 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे एचएसआरपी बसविण्याकरिता ॲपाईटमेंट घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 736

ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या 95 बालकांची टुडी ईको तपासणी 

 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र 24 बालकांवर लवकरच मुंबई येथे उपचार   

नांदेड, 17 जुलै :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची 2 डी इको तपासणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नांदेड येथे नुकतीच करण्यात आली. या शिबिरात नांदेड जिल्ह्यातील एकूण 95 बालकांची तपासणी करण्यात आली असून बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र एकूण 24 बालकांची शस्त्रक्रिया ऑगस्ट महिन्यात करण्यात येणार आहे.  

या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर अप्पनगिरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या नेवृत्वात्वाखाली  हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 डी इको तपासणी करण्यात आली.  ही तपासणी बालाजी रुग्णालय, मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. जयश्री मिश्रा आणि रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडले.  

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुन्य ते 18 या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात. 

हृदयरोग तपासणी, नेत्ररोग, आकडी/फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजित करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमांचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो. 

तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत शुन्य ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळल्यास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे. या शिबिरासाठी RBSK जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, DEIC चे व्यवस्थापक विठ्ठल तावडे,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000



 वृत्त क्र. 735

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 22 जुलै रोजी आयोजन

नांदेड, दि. 17 जुलै : नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगारची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 22 जुलै 2025 रोजी  सकाळी 10 वाजेपासून यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्हृयातील बेरोजगार उमेदवारांनी 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपासून यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार यांचा क्रमांक 9860725448 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्रमांक  798 उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  शासकीय वसतिगृह योजना सुरू   नांदेड दि. 1 ऑगस्ट :- इतर मागास बहुजन कल्याण विभ...