Sunday, June 6, 2021

                                                  लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 92 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 92 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 7 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 8 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय 20 डोस, दशमेश हॉस्पीटल 20 डोस, सिडको 20 डोस,  डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय 10 डोस, हैदरबाग 10 डोस या केंद्रावर उपलब्ध आहेत.    

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. हे डोस प्राधान्याने 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दिले जातील.

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव व उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय बारड 30 डोस उपलब्ध करुन देण्यात आले असून हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध असून ही लस 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींसाठी प्राधान्याने दिली जाईल. 

 

जिल्ह्यात 5 जून पर्यंत एकुण 4 लाख 42 हजार 108 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 5 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 27 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 25 हजार 700 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 53 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

                                                नांदेड जिल्ह्यात 107 व्यक्ती कोरोना बाधित

तर 141 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 381 अहवालापैकी  107 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर अँटिजेन तपासणीद्वारे 56 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 369 एवढी झाली असून यातील 87 हजार 261 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 702 रुग्ण उपचार घेत असून 15 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

आजच्या अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 890 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 26, कंधार 1, मुखेड 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 3, नायगाव 1, परभणी 1, बिलोली 1, लोहा 1, उमरी 3, देगलूर 7, माहूर 1, हिंगोली 3 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 30, मुदखेड 1, नांदेड ग्रामीण 15, मुखेड 2, किनवट 1, परभणी 2, माहूर 4, हिंगोली 1 असे एकूण 107 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 141 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 7,  मुखेड कोविड रुग्णालय 2, लोहा कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 25, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 93, किनवट कोविड रुग्णालय 3, अर्धापूर तालुक्यांतर्गत 4, उमरी तालुक्यातंर्गत 2, बिलोली तालुक्यातंर्गत 1, हदगाव कोविड रुग्णालय 1 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 702 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 37, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2, किनवट कोविड रुग्णालय 23, देगलूर कोविड रुग्णालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 4, लोहा कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 334, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 218, खाजगी रुग्णालय 50 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 112, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 119 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 58 हजार 64

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 56 हजार 253

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 369

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 261

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 890

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-97

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-263

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 702

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15

00000

 

 स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य हा मुलमंत्र

प्रामाणिकपणे अंमलात आणण्याची गरज

-         पालकमंत्री अशोक चव्हाण  

जिल्हा परिषदेत उभारली भगव्या स्वराज्य ध्वजासह

 शिवशक राजदंड स्वराज्यगुढी


नांदेड, दि. 6 (जिमाका,नांदेड):- छत्रपती शिवाजी महाराजाची स्वराज्याची संकल्पना आणि त्यांची दूरदृष्टी ही युगानुयुगासाठी प्रेरणादायी आहे. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य हा लोककल्याणकारी वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हाच त्यांचा मुलमंत्र होता. स्वराज्यातील शेतकरी, मजूर आणि गोरगरिब आणि बहुजनांना न्याय मिळावा याची त्यांनी सदैव दक्षता घेतली. जाती-पातीवरुन, धर्मावरुन त्यांनी भेदभाव केला नाही. 18 पगड जाती आणि सर्वच धर्मातील शिलेदार यांना सोबत घेवून त्यांनी स्वराज्य उभारले. स्वराज्याचे हे मूलतत्त्व आजही मोलाचे असून यातूनच सर्वांच्या सर्वांगिण विकासाचा मार्ग अधिक दृढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

शिवस्वराज्य दिनानिमित्त त्यांनी आज जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून शुभेच्छा दिल्या.

शिवस्वराज्य दिनाचा मुख्य समारंभ आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी यवनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, शिक्षण सभापती संजय बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई बेटमोगरेकर, माजी आमदार हणमंराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे आदि विभाग प्रमुख उपस्थित होते.

मागील 14-15 महिन्यांपासून आपण सर्व कोरोनाशी लढत आहोत. सुरुवातीला काही काळ आपण नांदेड जिल्ह्यात याचा शिरकाव होवू दिला नाही. नंतर मात्र याचा महाभयंकर प्रकोप अनुभवला जिल्हा मुख्यालयातील प्रशासकीय यंत्रणेपासून आपल्या ग्रामपंचायत पातळीपर्यंत एकत्र होवून सर्व विभाग व विशेषत: आरोग्य विभागाने कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याचे काम केले आहे. यात अनेक ग्रामपंचायती स्वत:हून पुढे येत त्यांनी त्यांचे व्यवस्थापन पणाला लावले. जवळपास 1 हजार 900 लोकांनी यात प्राण गमावले आहेत. अशा या आव्हानात्मक काळात शिवस्वराज्यातील दक्षतेचा आणि खबरदारीचा मंत्रही आपल्याला यापुढील काळात अधिक जबाबदारीने जपावा लागणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील अनेक व्यवस्थापनांना शासनाच्या निर्देशानुसार अनलॉक करित असतांना आता प्रत्येकाची जबाबदारी वाढली असून ग्रामीण भागासह महानगरातील नागरिक यात खबरदारी घेवून सहकार्य देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

0000

  

 

 युवकांच्या क्रिडा गुणांना चालना देण्यासाठी

छोटी क्रिडागंणे अधिक महत्वाची

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

टेनिस कोर्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  

 


नांदेड, दि. 6 (जिमाका,नांदेड):- शहराच्या सर्वांगिण विकासाच्या संकल्पनेत उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागेवर छोटी-छोटी क्रिडांगणे, खेळाची मैदाने विकसित केली तर यातून युवा खेळाडूना, क्रिडा कौशल्याला त्यांच्यातील क्रिडा गुणांना वाव मिळेल. या दृष्टिकोनातून नांदेड शहरातील स्नेह नगर भागातील अडगळ ठरलेली जागा आज एका सुंदर टेनिस कोर्टमध्ये रुपांतरित झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी टेनिस कोर्ट विकसित करण्यासाठी लोकसहभागाला चालना देवून हे टेनिस कोर्ट साकरले. या टेनिस कोर्टचे उद्घाटन करतांना मला मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

 


स्नेह नगर येथील शासकीय वसाहतीमध्ये अडगळीत पडलेल्या जागेवर साकारलेल्या टेनिस कोर्टचे ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सदस्य अमर राजूकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर मोहिनी येवणकर, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

 


आपल्या जिल्ह्यातून राष्ट्रीय पातळीवरील क्रिडापट्टू घडावेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नांदेडसारख्या जिल्ह्यातील तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या धर्माबादपासून जवळपास सर्वच तालुक्यात अतिशय चांगले गुणवान युवा खेळाडू दडलेले आहेत. त्यांना पुढे आणण्यासाठी तालुका पातळीवर असलेल्या आपल्या विविध क्रिडा विभागाच्या सुविधा प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहचविल्या तर युवकांनाही क्रिडा क्षेत्रातील वेगळी संधी उपलब्ध करुन देता येईल, असा विश्वासही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.  

 

0000

नांदेड जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊन निर्बंधात

निवडक सेवा, आस्थापन व उपक्रमांना मर्यादेत सुट

लग्न समारंभासाठी शंभर व्यक्तींची मर्यादा

-         जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड, दि. 6 (जिमाका,नांदेड):- नांदेड जिल्ह्यातील कोविड बाधितांचे प्रमाण शासन आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे सद्यस्थितीत नियंत्रणात आले आहे. याचबरोबर कोविड उपचारात ऑक्सिजन बेड्सचे व्यापलेले प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्यातील ही आकडेवारी लक्षात घेवून शासनाने नांदेड जिल्ह्याचा कोविड निर्बंध उठविण्याच्या पहिल्या स्तरामध्ये समावेश केला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवडक सेवा, आस्थापना व उपक्रमांना मर्यादेत सुट देण्याचा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला. स्तर एक नुसार निर्बंध शिथीलीकरणाबाबत त्यांनी पुढील आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय व सुट असलेल्या खाजगी कार्यालये हे शंभर टक्क्यांसह सुरु राहतील. खेळ क्रिडा प्रकार नियमित सुरु राहतील. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक / करमणुकीचे कार्यक्रम / मेळावे यांना नियमित सुरु ठेवण्यास सुट दिली आहे. जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट्स, मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रिनसह), नाट्यगृह नियमित सुरु राहतील. लग्न समारंभाला शंभर व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलींग नियमित सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा, अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा नियमित सुरु राहतील. 

 

विविध बैठका, निवडणूक - स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा

यांना नियमितप्रमाणे होतील. जिल्ह्यातील बांधकाम नियमितप्रमाणे करता येईल. कृषि व कृषि पुरक सेवा, ई कॉमर्स - वस्तू व सेवा नियमित सुरु राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियमितप्रमाणे निर्बंधाविना सुरु राहतील. मालवाहतूक ( जास्तीत जास्त तीन व्यक्ती,चालक /मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमित सुरु राहतील. खाजगी वाहने/ टॅक्सी/बसेस/लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरु राहतील. परंतु, स्तर पाचमध्ये जाण्यासाठी किंवा स्तरमध्ये थांबा घेवून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना ई-पास आवश्यक राहील.  

 

उत्पादक घटक (निर्माणक्षेत्र) अंतर्गत निर्यात जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आवश्यकता असलेली उद्योगक्षेत्र, लघु व मध्यम उद्योगासह युनिट्स नियमित सुरु राहतील. निर्माणक्षेत्र यात

अ] अत्यावश्यक वस्तू निर्माण करणारे उद्योग

ब ] सातत्याने व निरंतर चालु असणारी उद्योगक्षेत्र

क] राष्ट्रीय सुरक्षे करिता आवश्यक संसाधनांची निर्मिती करणारे उद्योग

ड] डाटा सेंटर, क्लाउड सर्विसेस, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र इत्यादी व इतर सर्व निर्माण क्षेत्र जे अत्यावश्यक तसेच निरंतर उद्योग या सदराखाली समाविष्ट नाहीत ते सर्व नियमितपणे सुरु राहतील.

व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स हे नियमित सुरु राहतील. अंत्यविधी, अंतयात्रेसाठी 50 व्यक्तींचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

सदर आदेश साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्‍या मधील तरतूदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना दिनांक 14,मार्च 2020 अन्‍वये मला उक्‍त प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाय योजना करणे आवश्‍यक आहेत त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नूसार प्रदान अधिकारान्‍वये जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर  यांनी दिनांक 07 जनू,2021 रोजी पासून शासनाकडील आदेशापर्यंत वरीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

0000              


समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...