Tuesday, January 23, 2018

रास्तभाव धान्य दुकानात
दोन महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड दि. 23 :-सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने जानेवारी व फेब्रुवारी 2018 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 1563.24 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.   
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड व लोहा- 128.7 , हदगाव- 135.42, किनवट- 306.08, भोकर- 61.56, बिलोली- 112.6, देगलूर- 98.78, मुखेड- 134.28, कंधार- 81.52, लोहा- 70.06, अर्धापूर- 29.7, हिमायतनगर- 65.52, माहूर- 130, उमरी- 56.22, धर्माबाद- 50.5, नायगाव- 76.26, मुदखेड- 25.44 याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.

0000000
राष्ट्रध्वज विक्रीसाठी
खादी कार्यालयात उपलब्ध
नांदेड दि. 23 :-  भारताचा राष्ट्रध्वज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नांदेड येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राष्ट्रध्वज खरेदी करण्यासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी उद्योग भवन शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
यामध्ये भारताचा राष्ट्रध्वज 2 बाय 3 व 4 बाय 6 फुट, भारताचा राष्ट्रध्वज (टेबलवर ठेवण्यासाठी) 4 बाय 6 इंच व ब्रास टेबलावरील स्टॅड उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय, नांदेड उद्योग भवन बिल्डींग शिवाजीनगर, नांदेड येथे दुरध्वनी क्र. 02462-240674 मो. 8830364425, 8600842601 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
अत्याचार प्रतिबंधक विषयी
आज कार्यशाळेचे आयोजन  
नांदेड दि. 23 :- सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती / जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 अंतर्गत अंधश्रद्धा, रुढी, परंपरा, व्यसनाच्या घातक सवयी, अंमली पदार्थ सेवन, जेष्ठ नागरीकांच्या अडीअडचणी, त्यांचे संदर्भात शासनाचे धोरण, जेष्ठ नागरीकांसाठी कायदा व नियम, जादुटोणा, नरबळी, अंधश्रद्धा आदी विषयावर बुधवार 24 जानेवारी 2018 रोजी जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नांदेड येथे सकाळी 9 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  
या कार्यशाळेत जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, समाज कार्य विषय शिकणारे विद्यार्थी, अधिकारी जिल्हा दक्षता समिती सदस्य, जिल्हा सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील यांची उपस्थिती राहणार आहे. संबंधीत सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी यांनी कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

000000
अल्पसंख्याक बहुल शाळांना
पायाभूत सुविधेसाठी अनुदान योजना
नांदेड दि. 23 :- अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था अपंग शाळा यांचेसाठी पायाभ सोयी सुविधा अनुदान योजनेंतर्गत इच्‍छुकानी अर्ज बुधवार 31 जानेवारी 2018 पर्यंत जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर  करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष उच्चस्तरीय निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
 या योजनेंतर्गत यापुर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा, संस्‍थेला यावर्षी अनुदानासाठी पात्र असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत. शासन निर्णय व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. शासन निर्णय दि. 7 ऑक्टोंबर 2015  अन्‍वये जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांचेकडून, शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व नगरपालिका / नगरपरिषद शाळामध्‍ये अल्‍पसंख्‍याक समाजाचे (मुसिलम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख, व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. पायाभूत सोयी सुविधा अनुदान योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्‍यासाठी विहीत नमुन्‍यात अर्ज मागविण्‍यात येत आहेत.
योजनेच्‍या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे. शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतींचे नुतनीकरण व डागडजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे / अद्यावत करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फिर्निचर, इन्‍व्‍हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्‍ययनाची साधने (Learning Material)/ एल.सी.डी. प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध सॉफटवेअर इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब, शुध्‍द पेयजलाची व्‍यवस्‍था करणे, प्रयोगशाळा उभारणे, अद्यावत करणे. प्रसाधनगृह / स्‍वच्‍छतागृह उभारणे डागडूजी करणे, झेरॉक्‍स मशीन, संगणक हार्डवेअर / सॉफ्टवेअरचा समावेश करण्यात आला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

00000
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाज भूषण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड दि. 23 :- जिल्हयातील अस्पृश्यता निर्मलनार्थ दलित व इतर समाजातील समाज सेवक आणि स्वयंसेवी संस्था यांना सन 2018-19 या वर्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हयातील कलावंत, प्रतिष्ठीत नागरिक आणि स्वयंसेवी संस्था यांचेकडून प्रस्ताव शुक्रवार 9 फेब्रुवारी 2018 पर्यंत मागविण्या आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ता यांनी दलित समाज आदी सामाजिक, दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत. पुरस्कारासाठी जा, धर्म, लिंग, क्षेत्र या गोष्टीचा विचार केला जाणार नाही. सामाजिक क्षेत्रात किमान 15 वर्ष कार्य असावे. वय पुरुष कार्यकर्त्याचे किमान 50 वर्ष आणि महिलासाठी  40 वर्षापेक्षा कमी नसावे. एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजल्या जाणार नाहीत. पुरस्कारासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा कोणताही पदाधिकारी पात्र असणार नाहीत. सक्षम अधिकारी , पोलीस अधीक्षक नांदेड यांचेकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. समाज कार्य बाबतचा संक्षिप्त अहवाल स्वतंत्र  जोडण्यात यावा.
स्वयंसेवी संस्थेसाठी समाज कल्याण क्षेत्रात दलित समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय अत्याचार अस्पृश्यता निर्मुलन, अंधश्रद्धा रूढी निर्मुलन जनजागरण इत्यादी कार्य करणा-या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल. तसेच सामाजिक कार्याचा संक्षिप्त अहवाल स्वतंत्र जोडावा. संस्था पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 सोसायटी रजिस्ट्रेशन नुसार पंजीबद्ध असावी. समाज कल्याण क्षेत्रातील सेवा कार्य 10 वर्षापेक्षा अधिक असावे. विशेष मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल. संस्थेचे कार्य राजकारण पक्षापासून अलिप्त स्वतंत्र असावे. पाच वर्षाचा अहवाल जोडणे आवश्यक आहे.संस्थेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसल्याबाबतचे सक्षम अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
इच्छ सामाजिक कार्यकर्ता संचालक स्वयंसेवी संस्था यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक रोड, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड यांचे कार्यालयात विहित नमुना आवश्यक माहिती प्राप्त करून घेवून आपला प्रस्ताव 9 फेब्रुवारी  पर्यंत कार्यालयीन वेळेत तीन प्रतीत सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे. 

000000
वित्त आणि नियोजन, वने मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा
 नांदेड दि. 23 :- राज्याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे 27 व 28 जानेवारी 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 27 जानेवारी 2018 रोजी नागपूर येथुन शासकीय विमानाने सकाळी 9.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. लोकतंत्र सेनानी संघ-मेळाव्यास उपस्थिती स्थळ- वासवी माता परमेश्वरी भवन, कॅन्सर हॉस्पीटल जवळ सिडको रोड नांदेड. दुपारी 12 वा. श्री नगरेश्वर वैश्य मंदिर आयोजित आर्य-वैश्य समाज उपवर-वधू परिचय मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- चांदोजी पावडे मंगल कार्यालय, कॅनॉल रोड, नांदेड. सायं. 6 वा. भाजपा व्यापारी आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- गुरुकृपा मार्केट महावीर चौक नांदेड. रात्री नांदेड शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
रविवार 28 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.30 वा. श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित केलेल्या 12 व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनास उपस्थिती स्थळ- श्री हनुमान मंदिर विजयनगर प्रांगण नांदेड. दुपारी 12 वा. श्री नगरेश्वर वैश्य मंदिर आयोजित आर्य-वैश्य समाज उपवर-वधू परिचय मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- चांदोजी पावडे मंगल कार्यालय कॅनॉल रोड नांदेड. सायं. 7 वा. नांदेडहून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000
नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करतांना
वैयक्तीक माहिती गोपनीय ठेवावी
माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर सुरक्षेविषयी कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. 23 :- नागरिकांनी ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन शॉपींग आणि सोशल मिडियाचा वापर करतांना आपल्या खात्यासंबंधी वैयक्तीक माहिती गोपनीय ठेवावी, असे आवाहन करण्यात आले. "महाराष्ट्र सायबर" ट्रान्सफॉर्मिग अंतर्गत माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर सुरक्षेविषयक प्रशिक्षणाचे आयोजन सायबर पोलीस स्टेशन व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे यांनी सायबर गुन्ह्याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.  
यावेळी पोलीस निरीक्षक श्री शहाणे म्हणाले, नागरिकांनी मोबाईलवर येणाऱ्या फसव्या फोन कॉल्स पासून सावध रहावे, बक्षीस किंवा लॉटरी संदेशाकडे दुर्लक्ष करावे, एटीएमकार्ड व पासवर्ड काळजीपूर्वक वापरावे. वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी, मोबाईल किंवा संगणकावरुन सुरक्षित https आणि पॅडलॉक असलेल्या संकेतस्थळाचाच वापर करावा. ऑनलाईन शॉपींग करताना सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा. एटीएम मशीनमध्ये कार्ड वापरताना त्याठिकाणी यंत्र चिटकवले आहे काय ? याची खात्री करुन एटीएम कार्ड वापरावे. एटीएम मशीनच्या ठिकाणी किबोर्डच्या दिशेने सुक्ष्म कॅमेरा बसविण्यात आलेला नाही याची खात्री करावी. पीनकोड अनओळखी व्यक्तीला दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. बॅक खात्यासंबंधी माहितीची पावती कचऱ्यात न टाकता वापर झाल्यानंतर पावती नष्ट करावी किंवा अनोळखी व्यक्तीच्या हाती पडणार नाही याची दक्षता घ्यावी. मौल्यवान वस्तु एटीएम सेंटरमध्ये विसरुन जाऊ नये. बँक खातेधारकांना कधीही एटीएम संबंधी माहिती फोनवर विचारल्या जात नाही. अशावेळी फोनवर एटीएम संबंधी विचारणा करणाऱ्या व्यक्तीला माहिती न देता नजीकच्या बँक शाखेत संपर्क करावा. सोशल मिडिया वापरताना धार्मिक, जातीय, राजकीय, सामाजिक भावना दुखावतील असे मजकूर, छायाचित्रे, व्हिडीओ क्लिप्स तयार करुन पोस्ट करणे, लाईक, शेअर, कमेंट, फॉरवर्ड, प्रसारित करणे हा दंडनिय व दखलपात्र गुन्हा आहे. सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्राप्त झाल्यास तात्काळ डिलीट करावी, असे सांगितले.
या संबंधीत काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरीत जवळच्या बॅक शाखेशी किंवा पोलीस स्टेशनशी त्वरीत संपर्क साधुन तक्रारी करावी.  सायबर गुन्ह्याचे प्रकार फिशींग, हॅकींग, पोर्नोग्राफी, सोशल मिडिया वापर, एटीएम फ्रॉड आदी विषयी माहिती देऊन नागरिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर क्राईम पासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्री शहाणे यांनी केले. यामध्ये प्रामुख्याने फसवणूक झालेल्या नागरिकांच्या चुकांबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सिरसेवाड, श्री राठोड, जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे, काशिनाथ आरेवार यांनी केले. यावेळी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.   
00000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...