Saturday, December 10, 2022

9.12.2022

 सर्व पक्षीय सहभागातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा

अमृत महोत्सव अधिक लोकाभिमूख करू

- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

 

·         सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत

सर्वसमावेशक समितीचा शासन निर्णय    

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- अनेक अर्थाने महत्वपूर्ण असलेला मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव अधिक व्यापक व सर्वसमावेशक व्हावा यासाठी शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शासन निर्णयाद्वारे समिती गठीत केल्याची माहिती खासदार तथा या समितीचे अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. हे अमृत महोत्सवी वर्षे लोकशाही मुल्यांच्यादृष्टिने, सांस्कृतिक मुल्यांच्यादृष्टिने अधिक व्यापक व्हावे यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींसह साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांची समिती आवश्यक होती, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील कला, साहित्य, इतिहास या क्षेत्रात भरीव योगदान देणारे साहित्यिक यांचा समावेश करतांना अधिक आनंद असल्याचे ते म्हणाले.

 

या समितीच्या अशासकीय सदस्यपदी माजी पालकमंत्री आमदार अशोकराव चव्हाण, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकरराव श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार सुभाषराव साबणे यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

 

याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव, नांदेड मसापचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, प्रा. सुरेश सावंत, श्रीमती वृषाली माधवराव किन्हाळकर, प्रा. जगदीश कदम, देविदास फुलारी, यशवंत गादगे, ज्येष्ठ गायक संजय जोशी, श्रीमती आनंदी विकास, रत्नाकर आपस्तंभ, ज्येष्ठ नाट्यकर्मी लक्ष्मण संगेवार, नाथा चिंतळे, प्रा. निवृत्ती कौसल्ये, राजेश कपूर, राम तुप्तेवार, डॉ. सान्वी (भरत) जेठवाणी, शाहीर रमेश गिरी हे अशासकीय सदस्य आहेत.

 

ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, संपादक विजय सोनवणे, संपादक शंतनू डोईफोडे, पत्रकार विजय जोशी,  चारुदत्त चौधरी, प्रल्हाद उमाटे, व्यंकटराव गोजेगावकर, प्रविण साले, दिलीप कंदकुर्ते, गंगाधरराव जोशी, सुनील नेरलकर, प्रविण पाटील चिखलीकर, मिलिंद देशमुख, डॉ. शाम तेलंग, ॲड दिलीप ठाकूर, सुरेश गायकवाड, दिपकसिंह रावत यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

 

शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, उपवनसंरक्षक, अधिक्षक अभियंता, जिल्हा माहिती अधिकारी, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई हे या समितीचे शासकीय सदस्य म्हणून असतील.

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचे नियोजन व रुपरेषा याबाबत सदर समिती संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यामार्फत शासनास शिफारस करेल. समितीची ही कार्यकक्षा असून दिनांक 30 सप्टेंबर 2023 किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत ही समिती कार्यरत राहील.

0000

9.12.2022

 प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विम्याची

85 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा   

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम सन 2022 मध्ये 10 लाख 57 हजार 508 शेतकऱ्यांनी 6 लाख 51 हजार 422 हेक्टर क्षेत्रावर पिक विमा उतरविला आहे. पिक कापणी प्रयोगानुसार उंबरठा उत्पादनावर आधारित पिक विमा ज्या महसूल मंडळाला लागू होईल अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना जी रक्कम वाढीव मिळेल ती यानंतर जमा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने पिक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन ॲडव्हर्सिटी) घटकातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळाली. यासाठी जिल्हाधिकारी यांनी सोयाबीन, ख. ज्वार, कापूस व तूर पिकांसाठी मिड सिझन ॲडव्हसिटीची अधिसूचना लागू केली होती. सदर अधिसूचना विमा कंपनीने मंजूर केली आहे. त्या अंतर्गत 367 कोटी रुपये रक्कम मंजूर झाली आहे. त्यापैकी 310 (85 टक्के) कोटी रुपये सोयाबीन, ख. ज्वारी, तूर आणि कापूस पिकाच्या विमाधारक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. उर्वरित 57 (15 टक्के) कोटी रुपये रक्कम सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनी शासनाकडून निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे.

पिक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या घटकाअंतर्गत जवळपास 4 लाख  73 हजार 570 पूर्वसूचना कंपनी स्तरावर प्राप्त झाल्या आहेत. त्यांचे पंचनामे विमा कंपनीने पूर्ण केलेले आहेत. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत 97. 97 कोटी रुपये रक्कम व काढणी पश्चात नुकसान या घटकाअंतर्गत 3 कोटी 28 लाख रुपये असे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकासह एकूण 467 कोटी 75 लाख रुपये रक्कम नांदेड जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मंजूर झाली आहे. आतापर्यत 310 कोटी रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. लवकरच उर्वरित 157 कोटी 75 लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे ती वजा करुन उर्वरित रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनी जमा करणार आहे असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविले आहे.

00000

9.12.2022

 जिल्हा जात पडताळणी कार्यालयात

संत जगनाडे महाराज जयंती साजरी

नांदेड (जिमाका) दि. 9 :- संत जगनाडे महाराज यांचा जन्म इ. स. 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाली. ते संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्या पैकी होते. अशा महापुरुषांची जयंती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात नुकतीच साजरी करण्यात आली.

यावेळी जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एस. जे. रणभीरकरव्ही. बी. आडेसंजय पाटीलसाजिद हासमीशिवाजी देशमुखवैजनाथ मुंडेबाबू कांबळेसोनू दरेगावकरमनोज वाघमारेओमशिवा चिंचोलकरशंकर होनवडजकरसुनील पतंगे, अनिकेत वाघमारेमोशीन शेखसंजय मंत्रे लहानकर यांची उपस्थिती होती.

संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार होते. मुलांला हिशोब करता येणे आवश्यक असल्यामूळे संताजी महाराजांना लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण त्यांना मिळाले होते. घरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले होते. त्यामूळे त्यांना कीर्तनालाभजनाला जाण्याची सवय लागली.

0000

9.12.2022.

 लेख                                                     दि. 9 डिसेंबर 2022                                                                                                         

लम्पी नियंत्रणासाठी माझा गोठा स्वच्छ गोठा !

 

लम्पी चर्मरोग हा संसर्गजन्य आजार असून तो विषाणू पासून पसरतो. प्रामुख्याने गायी व म्हशींमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात सुरवातीला हा आजार गुजरातराजस्थान या राज्यामध्ये आढळून आला. त्यानंतर हा संसर्ग महाराष्ट्र राज्यातील गायवर्ग जनावरामध्ये दिसून आला. या रोगाने लक्षणे असलेल्या जनावरांना सुरवातीला ताप येतो. त्यांचे वजन कमी होते. जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टपकते. तोंडातून लाळ पडतेशरीरावर छोटया गाठी येतात. अशी लक्षणे पशुधनात आढळल्यास पशुपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी जनावरांना तात्काळ उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे. तसेच रोग प्रादुर्भाव झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अथवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 वर द्यावी . शासनाच्यावतीने पशुपालकांना याबाबत सर्व ते सहकार्य करण्यात येत आहे.  

 

लम्पी चर्मरोगाचा प्रसार हा गोचिडडास आणि माशा यांच्या माध्यमातून पसरतो. बाधित जनावरांच्या सानिध्यात आलेल्या जनावरांना हा आजार होतो. त्यामुळे लम्पी चर्म रोग नियंत्रणासाठी जनावरांचे लसीकरण व जनावरे बांधण्याच्या ठिकाणाची म्हणजेच गोठ्याची स्वच्छता अत्यंत आवश्यक बाब आहे. या रोगाचा समूळ उच्चाटनासाठी व नियंत्रणासाठी पशुपालकांनी बाधित जनावरे विलगीकरण करणेजनावराच्या गोठ्यातील गोचिडडास आणि माशा हे समूळ नष्ट करणे, गोठयाला किटकनाशकऔषधाची फवारणी करणे. या सर्व बाबी अंमलात आणल्यास लम्पी चर्मरोगाचे नक्कीच उच्चाटन होण्यास मदत होईल.

 

शासनाने गोवंशीय पशुधनास लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरवातीलाच जनावरांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात 30 ऑक्टोंबरपर्यत 98 टक्के लसीकरण करण्याची कार्यवाही केली आहे. लसीकरणाबरोबर जनावरांचे गोठ्याची स्वच्छतागायी-म्हशींचा बाजार भरवण्यास मनाईबाधित जनावरांना स्वतंत्र बांधण्याची व्यवस्था करण्याबाबत वेळोवेळी पशुपालकांना मार्गदर्शक सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. जिल्हातालुका पातळीवर याबाबीची अंमलबजावणी होण्यासाठी मोठया प्रमाणात सर्व माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.  

 

शासनाने माहे नोव्हेंबर 2022 मध्ये लम्पी चर्मरोग आटोक्यात येण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण राज्यात माझा गोठा स्वच्छ गोठा ही मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी गावोगावी गोठा भेटी देत आहेत. या मोहिमे दरम्यान पशुपालकांना गोठा स्वच्छ करणे, गोठयात औषधोपचाराची फवारणी करणे, पशुपालकांना मार्गदर्शन करणे, जनावरांमध्ये रोगाची लक्षणे आढळल्यास उपचारासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती दिली जाते. गावात स्थानिक ग्रामपंचायतीद्वारे नियुक्त व्यक्तीमार्फत गोठा व सभोवतालच्या परिसरात किटकनाशक तथा जंतूनाशकांची फवारणी केली जाते.

 

पशुपालकांचे पशुधन रोग प्रादुर्भावग्रस्त होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून रोग प्रादुर्भाव भागात नियंत्रणासाठी मोफत औषधोपचार तसेच लसीकरणाच्या सुविधा पशुपालकांच्या दारात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच बाधित जनावरे आढळल्यास त्याबाबत पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेला तात्काळ कळवावी व उपचाराच्या सुविधा प्राप्त करुन घ्यावी याबाबत घरोघरी जावून मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत जनावरांना औषधोपचार किंवा लसीकरणासाठी तात्काळ करुन त्वरीत उपचार सुरु केल्यास हा रोग निश्चित बरा होतो या मोहिमेद्वारे सांगण्यात आले. लम्पी आजाराचे तात्पुरते नव्हे तर कायमचे उच्चाटन करण्याचे सर्वाचे उद्दिष्ट आहे.  लसीकरणाच्या माध्यमातून या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. पशुपालकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात आपल्या गुरांना लसीकरण करुन घ्यावे.

 

अलका पाटील, 

उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

 

00000

 विशेष लेख  :

 

राज्याच्या वैभवाची नांदी :

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

 

सन 1995 पर्यंत राज्यातील महामार्गांची स्थिती एका आव्हानात्मक पातळीवर पोहचलेली होती. ती या अर्थाने, ज्या गतीने वाहनांची नोंदणी राज्यामध्ये होती त्या वाहनांची संख्या व उपलब्ध असलेल्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाची स्थिती रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून परीपूर्ण असणे अत्यंत गरजेची होती. राज्यातील मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, मुंबई-नागपूर, मुंबई-सोलापूर व राज्याच्या इतर भागाला जोडणारे महामार्ग विकसीत होणे आवश्यक असल्याचे त्या काळातील सर्वच रस्ते वाहतूक तज्ज्ञांनी आग्रहाने सांगितले होते. एकाबाजुला मर्यादीत रस्ते, दुसऱ्या बाजुला या मार्गांवर वाढलेल्या वाहतुकीची संख्या हे गणित वाहतूक कोंडीला जागोजागी निमंत्रण देणारे होते.

 

मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक या महामार्गावरील वाहतुक कोंडी ही महिन्यातील अनेक दिवस पाच-पाच तासांच्या पुढे असायची. ही स्थिती नवीन एक्सप्रेसवे होईपर्यंतची होती. दोन तासात पुण्यावरून मुंबईला पोहचू हे तेंव्हा दिवास्वप्न होते. कालांतराने अभियंत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून हा मार्ग विकसित केला. वाहनाच्या गतीच्या तुलनेत ज्या प्रमाणात जिथे कुठे आवश्यक असेल तेवढ्या रुंद आकाराचे वळण यात ठेवण्यात आले. वाहनाच्या गतीप्रमाणे चालकाच्या लक्षात येईल अशा पद्धतीने काही कि.मी. अगोदर पासून रस्त्याला दिशादर्शक असणारे साईनबोर्डस् यामुळे चालकांना कमालीची सुविधा झाली. अपघाताचे प्रमाण रस्त्यांमुळे न होता केवळ मानवी चुकांपुरते मर्यादीत व्हायला वेळ लागला नाही.

 

सन 2000 पर्यंत म्हणजेच 22 वर्षाखाली मुंबई-सोलापूर, मुंबई-कोल्हापूर, नागपूर-अमरावती अशा चारपदरी, सहापदरी मार्गांनी महाराष्ट्रातील रस्ते वाहतुकीचे जाळे भक्कम व्हायला सुरूवात झाली. महाराष्ट्राच्या रस्ते वाहतुकीतील एक आदर्श मापदंड ठरणारा नवा अध्याय आता नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या रुपाने निर्माण होत आहे. या महामार्गाच्या माध्यमातून हजारो गावांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ज्या शिवारातून हा रस्ता धावत आहे त्या शिवारातील भाजीपाल्यापासून ते अनेक वैविध्यपूर्ण असलेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीचे नवी बाजारपेठ यातून साकारत आहे. ही बाजारपेठ, विक्री केंद्र टोल नाक्याच्या आजूबाजूला, हॉटेल्स व विसाव्याच्या ठिकाणी उपलब्ध होत आहे.

 

विकासाचा मार्ग हा दळण-वळणाच्या, वाहतुकीच्या भक्कम सुविधेतूनच विकसित होत असतो. हा मार्ग कृषि क्षेत्रापासून, ग्रामीण उद्योगापासून सर्वांना प्रवाहित करतो. ती सुविधा आता उपलब्ध होऊ घातली आहे. महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा म्हणून या महामार्गाकडे पाहिले जात आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील पहिल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला संपूर्ण समर्थन देऊन हा प्रकल्प साकारण्यात ज्यांनी महत्वपूर्ण पाठराखण केली, योगदान दिले असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या महामार्गाला दिले गेले आहे. ही भाग्यरेषा आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या  नावाने पिढ्यानपिढ्या जपली जाईल.

 

राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून उद्घाटन सोहळ्याच्या पूर्व तयारीला एक दिशा दिली. रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 पासून हा महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केला जात आहे. राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांतीचे नवे मार्ग यातून भक्कम होतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा लोकार्पण सोहळा राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

-         विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

 

समृद्धी महामार्गाविषयी :

नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा महत्वाचा प्रकल्प म्हणुन अधिसुचित करण्यात आला आहे. सदर महामार्गास दिनांक 22 डिसेंबर, 2019 रोजीच्या शासननिर्णयाव्दारे "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" असे नाव देण्यात आले आहे.

• पुर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे. 

• सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी 8861.02 हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी + इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे.

• सदर प्रकल्प 16 पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प माहे जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

• प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकुण 84 बांधकामे प्रस्तावित होती तथापि गरजेनुसार ही बांधकामे 100 पर्यंत वाढविण्यात आली आहेत, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. 

सद्यस्थितीत 1 ते 11 (शिर्डी पर्यंत) पॅकेजेसचे काम पुर्ण झाले आहे.

पहिला टप्पा म्हणून, नागपूर ते शिर्डी 701 किमी पैकी 520 किमी लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै 2023 पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...