लेख
लम्पी नियंत्रणासाठी माझा गोठा स्वच्छ गोठा !
लम्पी चर्मरोग हा संसर्गजन्य आजार असून तो विषाणू पासून पसरतो. प्रामुख्याने गायी व म्हशींमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात सुरवातीला हा आजार गुजरात, राजस्थान या राज्यामध्ये आढळून आला. त्यानंतर हा संसर्ग महाराष्ट्र राज्यातील गायवर्ग जनावरामध्ये दिसून आला. या रोगाने लक्षणे असलेल्या जनावरांना सुरवातीला ताप येतो. त्यांचे वजन कमी होते. जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टपकते. तोंडातून लाळ पडते, शरीरावर छोटया गाठी येतात. अशी लक्षणे पशुधनात आढळल्यास पशुपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी जनावरांना तात्काळ उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे. तसेच रोग प्रादुर्भाव झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अथवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 वर द्यावी . शासनाच्यावतीने पशुपालकांना याबाबत सर्व ते सहकार्य करण्यात येत आहे.
लम्पी चर्मरोगाचा प्रसार हा गोचिड, डास आणि माशा यांच्या माध्यमातून पसरतो. बाधित जनावरांच्या सानिध्यात आलेल्या जनावरांना हा आजार होतो. त्यामुळे लम्पी चर्म रोग नियंत्रणासाठी जनावरांचे लसीकरण व जनावरे बांधण्याच्या ठिकाणाची म्हणजेच गोठ्याची स्वच्छता अत्यंत आवश्यक बाब आहे. या रोगाचा समूळ उच्चाटनासाठी व नियंत्रणासाठी पशुपालकांनी बाधित जनावरे विलगीकरण करणे, जनावराच्या गोठ्यातील गोचिड, डास आणि माशा हे समूळ नष्ट करणे, गोठयाला किटकनाशक, औषधाची फवारणी करणे. या सर्व बाबी अंमलात आणल्यास लम्पी चर्मरोगाचे नक्कीच उच्चाटन होण्यास मदत होईल.
शासनाने गोवंशीय पशुधनास लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरवातीलाच जनावरांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात 30 ऑक्टोंबरपर्यत 98 टक्के लसीकरण करण्याची कार्यवाही केली आहे. लसीकरणाबरोबर जनावरांचे गोठ्याची स्वच्छता, गायी-म्हशींचा बाजार भरवण्यास मनाई, बाधित जनावरांना स्वतंत्र बांधण्याची व्यवस्था करण्याबाबत वेळोवेळी पशुपालकांना मार्गदर्शक सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. जिल्हा, तालुका पातळीवर याबाबीची अंमलबजावणी होण्यासाठी मोठया प्रमाणात सर्व माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.
शासनाने माहे नोव्हेंबर 2022 मध्ये लम्पी चर्मरोग आटोक्यात येण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण राज्यात “माझा गोठा स्वच्छ गोठा” ही मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी गावोगावी गोठा भेटी देत आहेत. या मोहिमे दरम्यान पशुपालकांना गोठा स्वच्छ करणे, गोठयात औषधोपचाराची फवारणी करणे, पशुपालकांना मार्गदर्शन करणे, जनावरांमध्ये रोगाची लक्षणे आढळल्यास उपचारासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती दिली जाते. गावात स्थानिक ग्रामपंचायतीद्वारे नियुक्त व्यक्तीमार्फत गोठा व सभोवतालच्या परिसरात किटकनाशक तथा जंतूनाशकांची फवारणी केली जाते.
पशुपालकांचे पशुधन रोग प्रादुर्भावग्रस्त होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून रोग प्रादुर्भाव भागात नियंत्रणासाठी मोफत औषधोपचार तसेच लसीकरणाच्या सुविधा पशुपालकांच्या दारात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच बाधित जनावरे आढळल्यास त्याबाबत पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेला तात्काळ कळवावी व उपचाराच्या सुविधा प्राप्त करुन घ्यावी याबाबत घरोघरी जावून मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत जनावरांना औषधोपचार किंवा लसीकरणासाठी तात्काळ करुन त्वरीत उपचार सुरु केल्यास हा रोग निश्चित बरा होतो या मोहिमेद्वारे सांगण्यात आले. लम्पी आजाराचे तात्पुरते नव्हे तर कायमचे उच्चाटन करण्याचे सर्वाचे उद्दिष्ट आहे. लसीकरणाच्या माध्यमातून या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. पशुपालकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात आपल्या गुरांना लसीकरण करुन घ्यावे.
अलका पाटील,
उपसंपादक,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
00000
No comments:
Post a Comment