Saturday, December 10, 2022

9.12.2022

 प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विम्याची

85 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा   

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम सन 2022 मध्ये 10 लाख 57 हजार 508 शेतकऱ्यांनी 6 लाख 51 हजार 422 हेक्टर क्षेत्रावर पिक विमा उतरविला आहे. पिक कापणी प्रयोगानुसार उंबरठा उत्पादनावर आधारित पिक विमा ज्या महसूल मंडळाला लागू होईल अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना जी रक्कम वाढीव मिळेल ती यानंतर जमा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने पिक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन ॲडव्हर्सिटी) घटकातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळाली. यासाठी जिल्हाधिकारी यांनी सोयाबीन, ख. ज्वार, कापूस व तूर पिकांसाठी मिड सिझन ॲडव्हसिटीची अधिसूचना लागू केली होती. सदर अधिसूचना विमा कंपनीने मंजूर केली आहे. त्या अंतर्गत 367 कोटी रुपये रक्कम मंजूर झाली आहे. त्यापैकी 310 (85 टक्के) कोटी रुपये सोयाबीन, ख. ज्वारी, तूर आणि कापूस पिकाच्या विमाधारक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. उर्वरित 57 (15 टक्के) कोटी रुपये रक्कम सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनी शासनाकडून निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे.

पिक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या घटकाअंतर्गत जवळपास 4 लाख  73 हजार 570 पूर्वसूचना कंपनी स्तरावर प्राप्त झाल्या आहेत. त्यांचे पंचनामे विमा कंपनीने पूर्ण केलेले आहेत. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत 97. 97 कोटी रुपये रक्कम व काढणी पश्चात नुकसान या घटकाअंतर्गत 3 कोटी 28 लाख रुपये असे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकासह एकूण 467 कोटी 75 लाख रुपये रक्कम नांदेड जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मंजूर झाली आहे. आतापर्यत 310 कोटी रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. लवकरच उर्वरित 157 कोटी 75 लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे ती वजा करुन उर्वरित रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनी जमा करणार आहे असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...