Friday, September 15, 2023

 गणेश उत्सवाची परवानगी आता ऑफलाईन पद्धतीने

· 16 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालय राहणार सुरू

नांदेड (जिमाका) दि. 15 :- गणेश मंडळांना परवानगी देण्याच्या कामासाठी शनिवार 16 सप्टेंबर 2023 रोजी या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरू राहणार असल्याचे धर्मादाय उप आयुक्त सौ. ममता राखडे यांनी कळविले आहे. गणेश उत्सवासाठी वर्गणी गोळा करण्याच्या परवानगीसाठी अर्जदाराच्या ओळखत्राची प्रत तसेच जागेचा पुरावा देणे आवश्यक आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी 19 सप्टेंबर 2023 पासून गणेश उत्सवास प्रारंभ होत आहे. गणेश उत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 सी प्रमाणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत होती. तथापि धर्मादाय आयुक्तांच्या संकेत स्थळावर अचानक तांत्रीक बिघाड झाल्याने आता ही परवानगी ऑफलाईन पद्धतीने देण्यात येत आहे, असे धर्मादाय उप आयुक्त नांदेड विभाग नांदेड यांनी कळविले आहे.
00000

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड जिल्ह्यात 25 सप्टेंबर 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 25 सप्टेंबर 2023 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त

मॅरेथॉन व जिल्हास्तर क्रीडा महोत्सवाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त 16 व 17 सप्टेंबर रोजी मॅराथॉन व जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी मॅराथॉन स्पर्धा व जिल्हास्तर क्रीडा महोत्सवात जिल्हयातील खेळाडू, मुले-मुली, शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकारी/ कर्मचारी, पुरुष व महिला आदीनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

या स्पर्धाचा मुख्य उद्देश म्हणजे खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी व भविष्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने मॅरेथॉन व जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मॅरेथॉन


16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 वा. महात्मा फुले पुतळा (आयटीआय चौकयेथून सुरुवात होवून  शिवाजीनगर मार्गे बस स्टॅन्ड, कलामंदीर,  छशिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, चिखलवाडी कॉर्नर, ओव्हर ब्रीज, अण्णाभाऊ साठे चौक, व्ही.आय.पी.रोड, कुसुमताई सभागृह (आयटीएम कॉलेज), स्टेडीयम मार्ग, विसावा उद्यान हुतात्मा स्मारक येथे समाप्त होईल.

 

जिल्हास्तर क्रीडा महोत्सव

बास्केट बॉल क्रीडा स्पर्धा (17 मुले व खुला गट पुरुष व महिला) दिनांक 16 व 17 सप्टेंबर 2023   सकाळी 10 वा., बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा  (खुला गट एकेरी व दुहेरी ) 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा (खुला गट एकेरी व दुहेरी ) स्पर्धाचे आयोजन केले आहे.

 

या स्पर्धाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, स्टेडियम परीसर, गोकूळनगर, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धाचे बक्षीस वितरण कार्यक्रम 17 सप्टेंबर,2023 रोजी सांय 6 वा. करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी मॅरेथॉनसाठी आनंद जोंधळे (9511676818), बन्टी सोनसळे (9096051532), जिल्हास्तर क्रीडा महोत्सव अंतर्गत बास्केटबॉलसाठी विष्णु शिंदे (9767047525), बॅडमिंटनसाठी महेश वाखरडकर (9960052344), संजय चव्हाण (9860521534) व टेबलटेनिस करीता हनमंत नरवाडे (9604866253) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाने केले आहे.

0000

जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे

17 सप्टेंबर रोजी पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

नांदेड, (जिमाका) दि. 15:-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 ते 8 या कालावधीत पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी व इतर महाविद्यालयातील सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येन सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धा  संपूर्ण राज्यात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे 5 कि.मी. अंतराची पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत करण्यात आलेले आहे, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

18 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन 

 

नांदेड, (जिमाका) दि. 15:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

कचरा मुक्त गाव व कचरा मुक्त शहरासाठी पुढाकार घ्यावा

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- कचरा मुक्त भारतासाठी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नागरिकांनी सहभागी होऊन कचरा मुक्त गाव व कचरा मुक्त शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

स्वच्छता ही सेवा पंधरवडा व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी नांदेड शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माजी खासदार व्यंकटेश काब्दे, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,  उपविभागीय अधिकारी संदीप कुलकर्णी, डॉ. विकास माने, तहसीलदार संजय वारकड, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे खाते प्रमुख, कर्मचारी अधिकारी, शिक्षक आणि शालेय विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

पुढे ते म्हणाले, घर व परिसराची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. कचरा मुक्त भारत या उपक्रमांतर्गत प्रत्येकाने स्वच्छता अभियान सहभागी होऊन आपले घर, गाव, परिसर व  कार्यालयाची ठिकाणे स्वच्छ ठेवावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी खासदार डॉ. व्यंकटेश कांब्दे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. 

 

याप्रसंगी स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ उपस्थित त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय ते आयटीआय पर्यंत  काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळेतील सुमारे साडेचार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यात विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, स्वंयसेवी संस्था आदींनी सहभाग नोंदवला होता. स्वच्छतेविषयी असलेले विविध फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थी महापुरुषांचे वेश परिधान करून रॅलीत आले होते. संपूर्ण नांदेड शहर स्वच्छतेच्या घोषवाक्यांनी दणाणून गेले होते.

00000







 भारतातील शेवटच्या राजाविरुद्ध

स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

·         मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त परिसंवादाचे आयोजन

·         मराठवाडा मुक्ती संग्रामात महिलांचे योगदान लक्षणीय

नांदेड, (जिमाका) दि. 15:- निझाम हा भारतातील शेवटचा राजा होता. त्यांची राजसत्ता जूलमी राजसत्ता होती. या राजसत्तेला सामान्य जनतेने स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्राम अधिक महत्वाचा आहे. या लढ्याची माहिती परिसंवादाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मुक्तीच्या या लढयात स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याची, घटनांची, योगदानाची माहिती आपण करुन घेवून ती इतरापर्यत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. नियोजन भवन येथे आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

 

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, प्राध्यापक  डॉ. विशाल पंतगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा अभ्यास एल.के.कुलकर्णी, सहसंशोधक श्रीमती प्रतिक्षा तालंणकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पांचगे व आदी मान्यवर व शालेय विद्यार्थ्याची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

 

मराठवाडा मुक्ती च्या लढ्यातील

स्मृतींना जपणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य

-         संचालक डॉ. पृथ्वीराज तौर

मराठवाडा मुक्तीचा लढा हा सामान्य माणसाने एका जुलमी राजसत्तेविरुध्द दिलेला  लढा असून यात सर्व जाती धर्मातील लोक सामिल होते. यात सामान्य माणसे, महिला, तरुण मुले, सर्व घटकातील लोकांनी दिलेला सहभाग लक्षणीय आहे. या लढ्यात अनेक जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतीना आज आपण उजाळा देवून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविल्या पाहिजे. तसेच पुढील पिढीनेही या स्मृतीचा आदर करुन त्यांची जपवणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी काढले.

 

मराठवाडा मुक्तीच्या हा लढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात स्वांतत्र्यसैनिकांनी आपले योगदान दिलेले आहे. या लढयात स्टेट काँग्रेस सोबत आर्य समाज, हिंदु सभा, आंबेडकरी जनता, मजूर, गोरगरीब जनता यांनी संघटीतपणे दिलेला लढा आहे. या सशस्त्र लढयातील अनेक घटनावर आधारीत विविध पुस्तके आली आहेत. या लढयाची विस्तृत माहिती, घटनाक्रम, स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले कार्य सर्वापर्यत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असे डॉ. पृथ्वीराज तौर यांनी सांगितले.

 

हैद्राबाद संस्थानाच्या मुक्तीचा लढयात संस्था आणि संघटनाच्या माध्यमातून आपण लोकशाही मूल्यांकडे, मराठवाडयाच्या मुक्तीकडे वाटचाल केली. विविध संस्था व संघटनाच्या माध्यमातून समाजात जाणीव जागृती, वैचारिक जाणीवा, प्रबोधन, सामाजिक, शैक्षणिक चळवळीच्या योगदानातून राजकीय चळवळी निर्माण झाल्या. अनेक चळवळीच्या माध्यमातून शस्त्रास्त्रासोबत हा लढा वैचारिक पध्दतीने लढला गेला हे या लढयाचे महत्वाचे वैशिष्ट आहे असे मत पिपल्स महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विशाल पंतगे यांनी व्यक्त केले. या लढयात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी हिंसेला हिंसेने उत्तर देण्यासोबतच वैचारिक प्रबोधनारवरही भर दिला.  अशा विविध संस्था व संघटनामधून हा वैचारिक लढा दिला गेला व यातून एक राष्ट्रप्रेमाची पिढी निर्माण झाली असे विचार  प्राध्यापक डॉ. विशाल पतंगे यांनी मांडले.

 

मराठवाडा मुक्तीच्या लढयात चूल व मुल सांभाळत महिला ही पुरुषांच्या बरोबरीने लढल्या. या लढयात महिलांनी आपले योगदान अधोरेखित केले आहे. रझाकाराच्या विरोधाला झुंगारुन देत या लढयात त्यांनी अनेक जोखमीची कामे केली. यासोबतच स्वातंत्र्यसैनिकांच्या पोषणाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती ती त्यांनी जबाबदारीने पार पाडली. वेळप्रसंगी आपल्या कुटूंबाला दुय्यम स्थान देवून अनेक प्रसंगाना धीराने तोंड दिले याबाबत स्वारातीम विद्यापीठाच्या सहसंशोधक प्रतिक्षा तालंणकर यांनी अनेक प्रसंग यावेळी सांगितले. मराठवाडा मुक्ती संग्रामातील गंगुताई देव, दगडाबाई शेळके, गोदावरीबाई टेके, बोधनकर भगिनी, कावेरीताई, ताराबाई परांजपे, प्रतिभाताई वैशपान, विमलताई मेलटेके अशा अनेक ज्ञात अज्ञात महिलांनी दिलेले योगदान, सहभाग, घटना, प्रसंग यांची सविस्तर माहिती  प्रतिक्षा तालंणकर यांनी दिली.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मराठवाडयातील 200 तरुण मुलांना प्रशिक्षण देवून या सामान्य घरातील मुलांनी 8 गावे स्वातंत्र्य करुन गोवर्धन सराळा समाजवादी जनराज्य निर्माण केले. ही इतिहासातील घटना अनेक जणांना माहिती नाही. आपल्या जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र सैनिकांचा या लढयात सहभाग होता. इतिहासात हा गोवर्धन सराळा मुक्तीचा लढा म्हणून हा ओळखला जातो.  या लढयात स्वातंत्र्यसैनिकांनी निरपेक्षपणे लढून 8 गावाचे मिळून एक वेगळया जनराज्याची निर्मिती केली ही विशेष घटना आहे. या लढयातील स्वातंत्र्य सैनिकांसारखे आपणही निरपेक्ष जगले पाहिजे, असे सेवानिवृत्त शिक्षक एल.के.कुलकर्णी यांनी विद्यार्थी व उपस्थितीना सांगितले. जगात नेहमी महान कार्य झाले, महान कार्य करायचे आणि महान कार्य होतील आपण यापैकी एक व्हायचे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच या लढयातील अनेक घटनाक्रमावर कुलकर्णी सरांनी प्रकाश टाकला. या लढयात केशवराव कुलकर्णी या त्यांच्या वडीलांचा असलेला सहभाग त्यांनी केलेले कार्य याबाबतही माहिती सांगितली. तसेच स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याबाबत विस्तृत घटनांची माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले.

00000






वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...