Monday, November 22, 2021

 रब्बी व उन्हाळी  हंगामासाठी 

पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी असे असेल पाणी पाळ्याचे नियोजन 

नांदेड (जिमाका)  दि. 22 :- नांदेड जिल्ह्यातील सिंचनाच्यादृष्टिने आवश्यक असलेल्या शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात यावर्षी चांगल्या पावसामुळे 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तथापि या प्रकल्पातील पाणी कालव्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी नाही त्याठिकाणी पोहचविण्यासाठी अधिक जबाबदारीचे नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि ज्या क्षेत्रामध्ये शेतीसाठी पाणी नाही त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना एखादे पिक हाती कसे घेता येऊ शकेल याची पुरेपुर काळजी घेऊन प्रत्येक प्रकल्पनिहाय आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आज सिंचना प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजुभैय्या नवघरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता बि. के. शेटे, सुधाकर कचकलवार, कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे, श्री. बिराजदार, चौगुले, जगताप व  वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. 

पुर्णा प्रकल्प

पुर्णा प्रकल्पात येलदरी व सिध्देश्वर दोन धरणे असून या वर्षी धरणात 890.73 दलघमी (100%) पाणी आले. यातून प्रकल्पात आलेला गाळ व बाष्पीभवन 228.25 दलघमी वजा करता 662.48 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी परभणी, हिंगोली, जिंतूर, वसमत, औंढा नागनाथ ही शहरे व ग्रामीण भागासाठी 76.65 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. सिंचनासाठी 585.82 दलघमी पाणी उपलब्ध असून या पाण्यातून सुमारे 59500 हे. शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयाचे नियोजन केले आहे. 

रब्बी हंगामासाठी 27 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 27 डिसेंबर 2021 ते 23 जानेवारी 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन, दिनांक 26 जानेवारी  ते 22 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तिसरे आवर्तन देण्यात येईल. 

उन्हाळी हंगामासाठी दिनांक 1 ते 28 मार्च 2022 या कालावधीत पहिले आवर्तन, 1 ते 28 एप्रिल 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन तर तिसरे आवर्तन 1 ते 28 मे 2022 या कालावधीत देण्यात येईल. चौथे आवर्तन सोडण्याबाबत त्यावेळी धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल. 

निम्न मनार

निम्न मनार या प्रकल्पात 100% (123.49 दलघमी) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातून प्रकल्पातील बाष्पीभवन व गाळ 24.88 दलघमी वजा करता 98.61 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नायगांव, कंधार व या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी 3.93 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 94.68 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून सुमारे 17000 हे. शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तन दिले जाणार आहे. 

रब्बी हंगामासाठी 27 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 1 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन, दिनांक 1  ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तिसरे आवर्तन देण्यात येईल. 

उन्हाळी हंगामासाठी दिनांक 1 ते 15 मार्च 2022 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 1 ते 15 एप्रिल 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन तर तिसरे आवर्तन सोडण्याबाबत त्यावेळी धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल. 

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प

या प्रकल्पात यावर्षी 964.10 दलघमी (100%) पाणी उपलब्ध झाले आहे. यातून प्रकल्पातील गाळ व बाष्पीभवन 169.90 दलघमी वजा जाता 794.22 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड जिल्हा, हिंगोली व यवतमाळ जिल्हयातील ग्रामीण भागासाठी 71.54 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 722.66 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून 78000 हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयांचे नियोजन केले आहे. 

रब्बी हंगामासाठी 1 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 4 ते 24 जानेवारी 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन, दिनांक 1  ते 20 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तिसरे आवर्तन देण्यात येईल. 

उन्हाळी हंगामासाठी दिनांक 1 ते 24 मार्च 2022 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 27 मार्च ते 17 एप्रिल 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन तर तिसरे आवर्तन 23 एप्रिल ते 14 मे 2022 या कालावधीत तसरे आवर्तन सोडले जाईल. चौथे अवर्तन सोडण्याबाबत त्यावेळी धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल. 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प

विष्णुपूरी प्रकल्पात 100 टक्के (80.79 दलघमी) पाणी उपलब्ध आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले असून त्यातून 21.10 दलघमी व दिग्रस बंधाऱ्यातून 24.0 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. असे एकूण 125.95 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. यातून बाष्पीभवन 16.32 दलघमी वजा करता 109.63 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एम.आय.डी.सी. व ग्रामीण भागासाठी 39.37  दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 70.26 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून सुमारे 15000 हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळया दिल्या जाणार आहेत. 

रब्बी हंगामासाठी 27 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 5 ते 30 जानेवारी 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन, दिनांक 5  ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तिसरे आवर्तन देण्यात येईल. 

वरील तारखांमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी नांदेड, परभणी, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व लाभधारक उपस्थित होते.

000000





 तेलंगणाच्या सिमेवरील पिंपशेडा आदिवासी गावही आता पक्क्या रस्त्याने जोडले जाणार  

·    पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे कौतुक  

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- महाराष्ट्राच्या तेलंगणाशी असलेल्या सिमेवर जे गाव आजवर पक्क्या रस्त्याने जोडले नव्हते ते गाव आता जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर पक्क्या रस्त्याने जोडले जाणार आहे. किनवट तालुक्यातील पिंपशेडा हे पूर्णत: आदिवासी गाव कच्च्या रस्त्याने जोडलेले होते. या गावाला तेलंगणातून जावे लागत होते. याचबरोबर प्रत्येक पावसाळ्यात हे गाव संपर्कापासून तुटल्या जायचे. या आदिवासी बहूल गावाला व येथील आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रवाहात घेता यावे यादृष्टिने जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांना आता वित्त विभागाने नागपूर ते पिंपशेडा रस्ता  (व्हिआर 22एमआरएल 4) दर्जोन्नतीच्या कामास राज्य निधी अंतर्गत मंजुरी देण्यात येत असल्याचे वित्त नियंत्रक तथा उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी स्पष्ट केले आहे.

 

जिल्हा प्रशासनातर्फे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेऊन जो पाठपुरावा केला त्याबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौतूक केले. आदिवासी बहूल किनवट व इतर तालुक्यातील रस्ते विकासासाठी प्राधान्याने लक्ष देण्यात  येत असून सर्वसमावेशक लोकाभिमूख प्रशासनासाठी येणाऱ्या अडचणी मंत्रालयीन पातळीवर सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

0000

 मधमाशा पालन जनजागृती मेळाव्याचे बुधवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका)  दि. 22 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नांदेड जिल्हा कार्यालयाच्यावतीने आयोजित मधमाशा पालन उद्योगाचा मधकेंद्र योजनेचा एक दिवशीय जानजागृत्ती मेळाव्याचे आयोजन बुधवार 24 नोव्हेंबर 2021 वार कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथे सकाळी  11 वा. आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सुशिक्षीत बेरोजगार व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे अवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शिवशंकर भोसीकर यांनी केले आहे.

 

या मेळाव्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदेप्रमुख कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, पिक संरक्षक तज्ज्ञ प्रा. माणिक कल्याणकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. मध उद्योगासाठी शासनाच्या योजनेची माहिती देण्यात येणार आहे. मधमाशा पालन उद्योगामुळे परागिकरणामुळे शेती पीकेफळबागा यांच्या उत्पादनात 25 ते 30 टक्के उत्पन्नात वाढ वाढते. शुद्ध मधाचे व मेणाचे उत्पादन होते. मध उद्योग हा शेतकऱ्यास एक शेती पुरक जोडधंदा आहे. शासनाच्या मधकेंद्र योजनेची या मेळाव्यात सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळजिल्हा कार्यालय उद्योग भवन एमआयडीसी एरिया शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-240674 व मोबाईल 9921563053 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

00000 

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 640 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 467 एवढी झाली असून यातील 87 हजार 788 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1 असे एकुण 4 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 3शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, खाजगी रुग्णालयातील एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

 

आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालयात 4 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 69 हजार 311

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 65 हजार 418

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 467

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 788

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नाबाबत

दक्षिण मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ?

-         सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 

· भोकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका)  दि. 22 :- मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांसमवेत अलिकडच्या काही वर्षात रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांबाबत अक्षम्य दिरंगाई होत आहे. भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम हे त्या दुजाभावाचे प्रतिक आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे सर्व सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजुला वाहतुकीची होणारी कोंडी तर दुसऱ्या बाजुला रेल्वे विभागाकडून कामामध्ये केली जाणारी दिरंगाई ही न समजण्यापलीकडची आहे. दक्षिण मध्य रेल्वेची मराठवाड्याच्या विकासाकडे पाहण्याची दृष्टी दुजाभाव करणारी असल्याची संतप्त भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव-तामसा-भोकर-उमरी रस्त्याच्या रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूकीस आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार अमिता चव्हाण, भोकरचे नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांबाबत व्यापक भूमिका घेणे गरजेचे असून याबाबत लवकरच रेल्वे मंत्रालय, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मी चर्चा करेल असे त्यांनी स्पष्ट केले. भोकर येथील आज उद्घाटन झालेल्या उड्डाण पुलाला सन 2016 मध्ये मान्यता प्रदान केली गेली. अनेक वर्षे हे काम प्रलंबित होते. या प्रलंबित असलेल्या कामाला मागील 2 वर्षात युद्ध पातळीवर गती देऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करतांना मला आत्मिक समाधान असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. याचबरोबर ज्या सर्वसामान्य जनतेनी संपूर्ण गावाला वळसा घालून इतके वर्षे त्रास सहन केला त्यांच्याप्रती शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली. या पुलाच्या भुयारी मार्गाची पुर्तता येत्या 3 महिन्यात करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

भोकरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. लवकरच येथे 100 खाटाचे रुग्णालय आपण उभारत आहोत. न्यायालयाची स्वतंत्र इमारत तयार करुन जनतेच्या प्रशासकीय सुविधेसाठी दर्जेदार कामे आपण करीत आहोत. या तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर स्वरुप धारण करतो. याची मला कल्पना असून त्याबाबतही आमचे नियोजन सुरू असून सुधा प्रकल्पाची उंची वाढवून अधिक पाणीसाठा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन उंची वाढविण्यास शासनाची मान्यता मिळाल्याचेही त्यांनी जाहीर केले. यातून सर्वच गावांचा प्रश्न सुटेल असे नाही तर सुधा प्रकल्पासमवेत पिंपळढव प्रकल्पालाही आपण चालना देत असल्याचे त्यांनी सांगून पाणी पुरवठ्याच्या प्रलंबित प्रकल्पांना मार्गी लावू असे स्पष्ट केले.   

राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक बिकट आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आमाप नुकसान झाले. अशावेळेस महाविकास आघाडी शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना दर हेक्टरी पूर्वी जी 6 हजार 800 रुपये आर्थिक मदत मिळायची यात भरघोस वाढ करुन ती मदत आम्ही 10 हजार रुपये हेक्टरी पर्यंत वाढविली. यात शेतकऱ्यांचे इतर प्रश्न आमच्या निदर्शनास आले. पिक विमा योजनेच्या नावाखाली एरवी शेतकऱ्यांची जी दिशभूल केली गेली ती होऊ नये यावर प्रशासनाला दक्ष राहण्यास सांगितले. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी आपण जवळपास 1100 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू शकलो. यात पिक विमा योजनेचे 550 कोटी रुपये हे संपूर्ण महसूल यंत्रणा दक्ष ठेवून त्या विमा कंपनीकडून आपल्याला घेता आले. तथापि पिक विमा योजनेतून मिळणारी भरपाई ही नगण्य असून राज्य शासनाच्या धर्तीवर ही सुधा हेक्टरी 10 हजार रुपयापर्यंत कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नात असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

या रेल्वे उड्डाण पुलाच्या वाहन मार्गाची रुंदी 7.5 मिटर असून एकुण लांबी 874 मिटर इतकी आहे. एकुण मान्यता 40 कोटी रुपयाची असून सार्वजनिक बांधकाम विभागाने 32.16 कोटी रुपयाचा निधी व तांत्रिक मान्यता प्रदान केली.

कामाचा दर्जा व वेळेवर कामाची निर्मिती

यात कोणतीही तडजोड नाही 

विकास कामांना मिळणारा निधी हा अनेक आव्हानातून मिळावावा लागतो. ज्या विकास कामांसाठी आपण हा निधी आणलेला आहे त्या कामांवरच हा निधी कामातील गुणवत्तेसह दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करुन घेऊन खर्ची घालणे हे प्रत्येक विभाग प्रमुखांचे कर्तव्य आहे. रस्ते विकासासह इतर कामात जर काही गडबड आढळली तर खुशाल आमच्याकडे तक्रार करा आम्ही वेळेवर त्याचा बंदोबस्त करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

आज सकाळी त्यांच्या हस्ते पिंपळढव येथे नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन व इतर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

00000







 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...