Monday, November 22, 2021

 रब्बी व उन्हाळी  हंगामासाठी 

पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी असे असेल पाणी पाळ्याचे नियोजन 

नांदेड (जिमाका)  दि. 22 :- नांदेड जिल्ह्यातील सिंचनाच्यादृष्टिने आवश्यक असलेल्या शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात यावर्षी चांगल्या पावसामुळे 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तथापि या प्रकल्पातील पाणी कालव्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी नाही त्याठिकाणी पोहचविण्यासाठी अधिक जबाबदारीचे नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि ज्या क्षेत्रामध्ये शेतीसाठी पाणी नाही त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना एखादे पिक हाती कसे घेता येऊ शकेल याची पुरेपुर काळजी घेऊन प्रत्येक प्रकल्पनिहाय आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आज सिंचना प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजुभैय्या नवघरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता बि. के. शेटे, सुधाकर कचकलवार, कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे, श्री. बिराजदार, चौगुले, जगताप व  वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. 

पुर्णा प्रकल्प

पुर्णा प्रकल्पात येलदरी व सिध्देश्वर दोन धरणे असून या वर्षी धरणात 890.73 दलघमी (100%) पाणी आले. यातून प्रकल्पात आलेला गाळ व बाष्पीभवन 228.25 दलघमी वजा करता 662.48 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी परभणी, हिंगोली, जिंतूर, वसमत, औंढा नागनाथ ही शहरे व ग्रामीण भागासाठी 76.65 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. सिंचनासाठी 585.82 दलघमी पाणी उपलब्ध असून या पाण्यातून सुमारे 59500 हे. शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयाचे नियोजन केले आहे. 

रब्बी हंगामासाठी 27 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 27 डिसेंबर 2021 ते 23 जानेवारी 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन, दिनांक 26 जानेवारी  ते 22 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तिसरे आवर्तन देण्यात येईल. 

उन्हाळी हंगामासाठी दिनांक 1 ते 28 मार्च 2022 या कालावधीत पहिले आवर्तन, 1 ते 28 एप्रिल 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन तर तिसरे आवर्तन 1 ते 28 मे 2022 या कालावधीत देण्यात येईल. चौथे आवर्तन सोडण्याबाबत त्यावेळी धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल. 

निम्न मनार

निम्न मनार या प्रकल्पात 100% (123.49 दलघमी) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातून प्रकल्पातील बाष्पीभवन व गाळ 24.88 दलघमी वजा करता 98.61 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नायगांव, कंधार व या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी 3.93 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 94.68 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून सुमारे 17000 हे. शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तन दिले जाणार आहे. 

रब्बी हंगामासाठी 27 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 1 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन, दिनांक 1  ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तिसरे आवर्तन देण्यात येईल. 

उन्हाळी हंगामासाठी दिनांक 1 ते 15 मार्च 2022 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 1 ते 15 एप्रिल 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन तर तिसरे आवर्तन सोडण्याबाबत त्यावेळी धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल. 

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प

या प्रकल्पात यावर्षी 964.10 दलघमी (100%) पाणी उपलब्ध झाले आहे. यातून प्रकल्पातील गाळ व बाष्पीभवन 169.90 दलघमी वजा जाता 794.22 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड जिल्हा, हिंगोली व यवतमाळ जिल्हयातील ग्रामीण भागासाठी 71.54 दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 722.66 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यातून 78000 हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात 3 पाणी पाळया व उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळयांचे नियोजन केले आहे. 

रब्बी हंगामासाठी 1 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 4 ते 24 जानेवारी 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन, दिनांक 1  ते 20 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तिसरे आवर्तन देण्यात येईल. 

उन्हाळी हंगामासाठी दिनांक 1 ते 24 मार्च 2022 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 27 मार्च ते 17 एप्रिल 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन तर तिसरे आवर्तन 23 एप्रिल ते 14 मे 2022 या कालावधीत तसरे आवर्तन सोडले जाईल. चौथे अवर्तन सोडण्याबाबत त्यावेळी धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा व संभाव्य पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल. 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प

विष्णुपूरी प्रकल्पात 100 टक्के (80.79 दलघमी) पाणी उपलब्ध आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले असून त्यातून 21.10 दलघमी व दिग्रस बंधाऱ्यातून 24.0 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. असे एकूण 125.95 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. यातून बाष्पीभवन 16.32 दलघमी वजा करता 109.63 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एम.आय.डी.सी. व ग्रामीण भागासाठी 39.37  दलघमी पाणी आरक्षीत केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी 70.26 दलघमी पाणी उपलब्ध झाले असून सुमारे 15000 हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळया दिल्या जाणार आहेत. 

रब्बी हंगामासाठी 27 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत पहिले आवर्तन, दिनांक 5 ते 30 जानेवारी 2022 या कालावधीत दुसरे आवर्तन, दिनांक 5  ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तिसरे आवर्तन देण्यात येईल. 

वरील तारखांमध्ये आपत्कालीन परस्थितीत बदल होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी नांदेड, परभणी, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व लाभधारक उपस्थित होते.

000000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...